Pune Police Recruitment : पुणे पोलिसांच्या हातांना बळ; १७०० पदे भरणार; उच्चाधिकार समितीकडून लवकरच शिक्कामोर्तब
esakal September 20, 2025 06:45 PM

पुणे : शहराचा वाढता विस्तार आणि लोकसंख्येमुळे नागरिकांच्या सुरक्षेची गरज लक्षात घेत पुणे शहर पोलिस दलात लवकरच मोठ्या प्रमाणावर भरती होणार आहे. शहरात नवीन पाच पोलिस ठाण्यांच्या निर्मितीस नुकतीच मंजुरी मिळाली आहे. या पार्श्वभूमीवर मोठे मनुष्यबळ लागणार आहे. त्यासाठी एक हजार ७२० पोलिसांची पदे भरण्याच्या प्रस्तावावर मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील उच्चाधिकार समितीकडून लवकरच अंतिम शिक्कामोर्तब होणार आहे. ही भरती मागील काही वर्षांतील सर्वांत मोठी मेगा भरती ठरणार आहे.

शहराच्या विस्तारासह वाढते आव्हान

पुणे महापालिकेत नवीन गावे समाविष्ट झाल्यानंतर शहराचा भौगोलिक विस्तार झपाट्याने वाढला आहे. पुणे शहर केवळ शैक्षणिकच नव्हे तर औद्योगिकदृष्ट्या आयटी, ऑटोमोबाईल हब म्हणूनही ओळखले जात आहे. शहराची लोकसंख्या तब्बल ७० लाखांच्या घरात पोहोचली आहे. याउलट पोलिस दलात फक्त साडेआठ हजारांच्या आसपास अधिकारी आणि कर्मचारी कार्यरत आहेत. त्यामुळे स्ट्रीट क्राइम, गुन्हेगारीतील वाढ, वाहतूक कोंडी, नागरिकांच्या सुरक्षेसंबंधी प्रश्न या सर्वांचा ताण सध्याच्या मनुष्यबळावर पडत आहे.

Pune News : पैशांसाठी केले ‘इमोशनल ब्लॅकमेल’! नोकरीत कायम होण्याच्या आशेने मंगळसूत्र विकले अन् ७५ हजार भरले

नवीन पाच पोलिस ठाणी

शहरात गुन्हेगारी नियंत्रण अधिक प्रभावी करण्यासाठी आणि कायदा-सुव्यवस्था मजबूत ठेवण्यासाठी पुणे पोलिस आयुक्तालयाने पाच नवीन पोलिस ठाण्यांचा प्रस्ताव पाठविला होता. यासंदर्भात पोलिस आयुक्त अमितेश कुमार, पोलिस सहआयुक्त रंजनकुमार शर्मा, अतिरिक्त पोलिस आयुक्त (प्रशासन) संजय पाटील, पोलिस उपायुक्त राजलक्ष्मी शिवणकर यांनी राज्य सरकारकडे पाठपुरावा केला होता. या प्रस्तावास गृह विभागाकडून नुकतीच मंजुरी मिळाली आहे. विद्यमान पाच पोलिस ठाण्यांचे विभाजन करून नवीन पोलिस ठाण्यांची निर्मिती होणार आहे.

नवीन पोलिस ठाणी

  • नऱ्हे पोलिस ठाणे- सिंहगड रस्ता पोलिस ठाण्याचे विभाजन

  • लक्ष्मीनगर पोलिस ठाणे- येरवडा पोलिस ठाण्याचे विभाजन

  • येवलेवाडी पोलिस ठाणे- कोंढवा पोलिस ठाण्याचे विभाजन

  • लोहगाव पोलिस ठाणे- विमानतळ पोलिस ठाण्याचे विभाजन

  • मांजरी पोलिस ठाणे- हडपसर पोलिस ठाण्याचे विभाजन

पोलिसांची मेगा भरती ही नवीन पोलिस ठाणी आणि उर्वरित रिक्त जागा भरण्यासाठी एकूण एक हजार ७२० पोलिसांची पदे भरण्यात येणार आहेत. यामध्ये ८३० नवीन पदांचा समावेश आहे. उर्वरित पदे विद्यमान रिक्त जागांमधून भरली जाणार आहेत. या भरतीला मंत्रिमंडळाची तत्त्वतः मंजुरी मिळाली आहे. मात्र, उच्चाधिकार समितीकडून अंतिम शिक्कामोर्तब होणे बाकी असून, त्याला लवकरच मान्यता मिळणे अपेक्षित आहे.

दोन स्वतंत्र परिमंडळे

शहरात सध्या पाच पोलिस परिमंडळे आहेत. नवीन पोलिस ठाण्यांमुळे मनुष्यबळाची गरज लक्षात घेऊन दोन स्वतंत्र परिमंडळांना मान्यता मिळाली आहे. त्यामुळे आणखी दोन पोलिस उपायुक्त, चार सहाय्यक पोलिस आयुक्त, पाच वरिष्ठ पोलिस निरीक्षक, पाच पोलिस निरीक्षक, तसेच सहाय्यक निरीक्षक, हवालदार आणि अंमलदारांचीही नेमणूक केली जाणार आहे.

वाढत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर या निर्णयामुळे पुणे पोलिस दलाला कायदा-सुव्यवस्था राखण्यास आवश्यक बळकटी मिळणार आहे. नवीन पोलिस ठाणी लवकरच कार्यान्वित होणार असून, त्यामुळे गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण आणि वाहतूक व्यवस्थापनात सुधारणा होण्यास मदत होणार आहे.

- अमितेश कुमार, पोलिस आयुक्त, पुणे

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.