सोमेश्वरनगर, ता. १९ : ‘‘गाणगापूरमधून विशेष मुलगी हरवते आणि कर्नाटकात पोचते. संवेदनशील आळंद पोलिस बालकल्याण विभागाच्या मदतीने एका संस्थेत सोय करतात. संस्था तिचे आधारकार्ड काढण्यासाठी धडपडते तेव्हा सुपे (ता. बारामती) येथील ‘प्राजक्ता’ संस्थेच्या पत्त्यावर तिचे आधीचेच आधार आढळते. ''प्राजक्ता''शी संपर्क होताच अहिल्यानगरच्या पालकांना बोलवितात आणि कर्नाटक बालविभाग सुपे येथे येऊन पालकांना मुलगी सुपूर्द करतात...’’
एखाद्या चित्रपटाची कथा वाटावी अशी ही घटना प्रत्यक्षात घडली. याबाबतची माहिती अशी की, कर्नाटकमधील एम. आर. गर्ल्स होम आणि सुपे येथील प्राजक्ता मतिमंद निवासी विद्यालय या दोन संवेदनशील संस्थांमुळे नऊ वर्षांनी विशेष मुलगी पालकांच्या कुशीत विसावली. सुपे येथील प्राजक्ता मतिमंद निवासी विद्यालयात अहिल्यानगरची परी (नाव बदलले आहे) ही विशेष मुलगी शिकत होती. त्यावेळी शाळेने तिचे आधारकार्ड काढले होते. दरम्यान पालकांनी २०१६ मध्ये मुलीला घरी घेऊन गेले. पालकांसोबत गाणगापूरला गेली असताना हरवली. ती प्रवासी वाहनाने थेट कर्नाटकमध्ये कलबुर्गी जिल्ह्यात पोचली. तेथील आळंद पोलिसांनी शासनाच्या बालकल्याण मंडळाच्या मदतीने एम. आर. गर्ल्स होममध्ये दाखल केले.
दरम्यान, गर्ल्स होम संस्थेने तिचे आधारकार्ड काढण्याचा प्रयत्न केला. अखेर बंगळुरूमध्ये मुख्य केंद्रावर जुने आधारकार्ड असल्याचे आढळून आले. त्या आधारवर प्राजक्ता शाळेचा पत्ता आणि मुख्याध्यापिका शुभांगी सुपेकर यांचा मोबाइल नंबर आढळला. सुपेकर यांना फोन आल्यावर त्यांनी नऊ वर्षांनी मुलीच्या पालकांचा शोध लावला. पालकांना पाचारण केले. परीचे वडील आणि नातेवाईक नुकतेच शाळेत आले. याचवेळी एम. आर. गर्ल्स होमच्या समुपदेशक सुमंगला एस. कोरे, काळजीवाहक संगीता, बालकल्याण विभागाचे सुंदरराज चंदनकेरा परीला घेऊन आले. प्राजक्ता विद्यालयाने समन्वय साधला. याप्रसंगी विठ्ठल ठोकळ, संजय धारकर, शुभांगी सुपेकर उपस्थित होते.
कर्नाटकच्या संस्थांची संवेदनशीलता
कर्नाटकमधील पोलिस, बालकल्याण विभाग आणि गर्ल्स होम हे तिन्ही संवेदनशील असल्याने परी ठणठणीत आणि आरोग्यदायी अवस्थेत पालकांपर्यंत पोहोचली. कलबुर्गीच्या एम. आर. गर्ल्स होमच्या समुपदेशक सुमंगला व संगीता म्हणाल्या, आम्हाला परी आळंद पोलिस ठाण्यात २०१६ ला भेटली. आमच्याकडे प्रेमाने राहिली. २०१८, २०२०, २०२५ असे तिन्ही वेळा आधारकार्ड काढण्याचा प्रयत्न केला पण निघत नव्हते. अखेर राजधानी बंगळूरच्या मुख्य कार्यालयात गेल्यावर प्राजक्ता शाळेचा पत्ता आढळला. पालकांची खात्री झाल्यावर आणून पोहोच केले. वडील म्हणाले, नऊ वर्ष परीला फार चांगले सांभाळले याबद्दल त्यांचे आणि प्राजक्ता संस्थेचेही खूप आभार.