Chh. Sambhajinagar Rain: पावसाने शहराला धो डाला! तासभर धुवाधार, अनेक वसाहती जलमय, घरांमध्ये पाणी
esakal September 20, 2025 09:45 PM

छत्रपती संभाजीनगर : शहर परिसराला शुक्रवारी (ता. १९) सायंकाळी पावसाने झोडपले. वादळी वाऱ्यामुळे अनेक भागात रस्त्यावर झाडे पडल्याच्या तर काही भागात घरांत पाणी शिरल्याचे प्रकार घडले. यामुळे मुख्य रस्त्यावर वाहतुकीचा खोळंबा झाला. महापालिकेच्या अग्निशमन विभागाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य केले.

शहर परिसरात शुक्रवारी सायंकाळी सहा-साडेसहाच्या दरम्यान जोराचा पाऊस सुरू झाला. पावसाचा एवढा जोर होता की, रस्त्यावरील काही फुटावरची वाहने, माणसेही दिसत नव्हती. त्यामुळे वाहनांचा वेगही मंदावला. काही वेळातच रस्त्यांवर पाणीच पाणी झाले. सुमारे अर्धातास पावसाचा जोर कायम होता. रेल्वे स्थानक परिसर, बन्सीलालनगर, उस्मानपुरा, श्रेयनगर, जवाहर कॉलनी, पैठण गेट, खडकेशवर, औरंगपुरा, आमखास मैदान, बुढी लेन, शाहगंज, सिडको-हडको, छावणी, पाडेगाव, बेगमपुरा, मुकुंदवाडी-चिकलठाणा अशा सर्वच भागांत पावसाने अक्षरशः: दाणादाण उडवली. रस्त्यांचे पाहता पाहता तलाव झाले. उतारावरून येणारे पाणी लगतच्या इमारती आणि घरांमध्ये घुसले. पावसाचा जोरच एवढा होता की, दुचाकीस्वारांनी वाहने थांबवत सुरक्षित जागा शोधणे पसंत केले. काही काळ पावसामुळे वाहतूक थांबल्यासारखीच झाली.

पडेगावात १०५ मिमी पाऊस

भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) दिलेल्या माहितीनुसार, सायंकाळी ५ वाजल्यापर्यंत ०.६ मिमी पावसाची नोंद झाली होती. मात्र, त्यानंतर दणक्यात कोसळल्या पावसामुळे ही नोंद रात्री ९ वाजता १६.६ मिमी नोंदवली गेली. एमजीएमच्या पर्जन्य मापकांनी दाखवलेल्या नोंदीनुसार एमजीएम परिसरात २४ मिमी, गांधेली परिसरात २ मिमी तर पडेगावात सर्वाधिक १०५ मिमी पाऊस नोंदला गेला. पाडेगाव भागात एका तासात ८५ मिमी पाऊस पडल्याचे डॉ. श्रीनिवास औंधकर यांनी सांगितले.

वाहतुकीचा बोजवारा

पावसाचा जोर कमी झाल्यानंतर मात्र शहराला वाहतुकीकोंडीच्या समस्येला तोंड द्यावे लागले. शिवाजीनगरच्या भूमिगत पुलाचा पुन्हा एकदा तलाव बनला. बायपासला जाणाऱ्या वाहनांनी शहानूर मियाँ दर्गा चौकाचा मार्ग पत्करला आणि शेकडो वाहने अडकून पडली. दर्गा चौक ते महानुभाव चौकापर्यंत यायला वाहनांना एक तास लागत होता. तिकडे रेल्वे स्थानक ते कांचनवाडी हा मार्गदेखील प्रचंड कोंडीचा शिकार बनला. शहरातील प्रत्येक सखल भागाचीही हीच अवस्था झाली होती. परिणामी, पर्यायी मार्गांवरही वाहतूक कोंडी झाली.

वीजपुरवठा खंडित

वादळी वारा, विजांच्या कडकडासह जोरदार पावसाने हजेरी लावल्याने सातारा परिसर, छावणी, नक्षत्रवाडी, देवळाई, एसबीएसच कॉलनी, गारखेड्यातील काही भाग, औरंगपुरा, रेल्वेस्टेशन परिसर, भीमनगर भावसिंगपुरा, पेठेनगर, समर्थनगर, बसस्थानक रोड, सिडकोतील काही भागांचा वीज पुरवठा खंडित झाला. दोन ते तीन तास अंधार होता. पावसाचा जोर ओसरल्यानंतर काही भागांत वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला. काही भागांतील वीजपुरवठा सुरळीत करण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते.

विद्युत वाहिनी तुटली

एसबीएच कॉलनीत विद्युत वाहिनी तुटल्याने या भागातील वीजपुरवठा खंडित झाला होता. ही वाहिनी पूर्ववत केल्यानंतर या परिसरातील वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला. पावसामुळे हर्सूल उपकेंद्र, सातरा १३२ केव्ही उपकेंद्र, पावर हाऊस उपकेंद्रातील वीज पुरवठा बंद पडला होता. शहरातील अनेक ठिकाणी फिडर बंद पडल्याने काही भागांतील वीजपुरवठा खंडित झाला होता.

Nagpur Rain Update : नागपूरात पावसाचा हाहाकार! 'झाडांची पडझड, एकाचा मृत्यू'; झोपडपट्ट्यांमध्ये शिरले पाणी; नागरिकांची त्रेधातिरपीट

कुठे, काय झाले?

नगरनाका येथे झाड पडले. त्यामुळे वाहतूक मंदावली. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी झाड बाजूला करून वाहतूक सुरळीत केली.

बन्सीलालनगरमधील अपार्टमेंटमध्ये पाणी शिरले. तेथील रहिवासी काही काळ अडकून पडले. -पेठेनगमध्ये काही घरांमध्ये पाणी शिरले. या ठिकाणीदेखील अग्निशमन विभागाचे जवान मदतीसाठी रवाना करण्यात आले.

आमखास मैदानावर असलेल्या टीबी हॉस्पिटलमध्ये पावसाचे पाणी शिरल्यामुळे हॉस्पिटलमध्ये सगळीकडे पाणीच पाणी झाले.

क्रांतीनगरातील घरांमध्येही पावसाचे पाणी शिरले. गारखेडा भागातील विजयनगरमधील काही घरे पाण्याने वेढली. काही घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांची मोठी गैरसोय झाली. नंदनवन कॉलनी, भावसिंगपुरा, पेठेनगर. साकेत बौद्ध विहार परिसर आदी भागातील घरांमध्येही पावसाचे पाणी शिरल्याच्या तक्रारी अग्निशमन विभागाकडे आल्या.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.