वाल्मिक कराडचा कट्टर समर्थक असलेल्या रघुनाथ फड गँगवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. परळी तालुक्यातल्या सहदेव सातभाई यांच्यावर हल्ला करत खुनाचा प्रयत्न केल्या प्रकरणी बीड पोलिसांनी ७ जणांवर मकोका अंतर्गत कारवाई केली होती. मात्र यातून आता पाच जणांना दिलासा मिळाला आहे. त्यांच्यावरील मकोका रद्द केला आहे.
रघुनाथ फड गँगमधील पाच जणांवरील मकोका रद्द केला आहे. यात वाल्मिक कराडचा राइट हँड अशी ओलख असलेला गोट्या गित्ते, जगन्नाथ फड,, संदीप सोनवणे, बालाजी दहिफळे, विलास गिते यांचा समावेश आहे. दरम्यान, पाच जणांना दिलासा मिळाला असला तरी टोळीप्रमुख रघुनाथ फड आणि त्याचा साथीदार धनराज उर्फ राजाभाऊ फड यांच्यावर मकोका कायम आहे. दोघांचाही संघटित गुन्हेगारीचा इतिहास असल्याचं पोलिसांनी याआधीच स्पष्ट केलं होतं.
Sangli Politics : आमदार, कलेक्टरांपेक्षाही तुम्हाला जास्त काम आहे का?, निवांत काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना आयुष्यमान भारत मिशन राज्य प्रमुखांनी झापलंमस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात अटकेत असलेल्या वाल्मिक कराडसह त्याच्या टोळीवर मकोका अंतर्गत गुन्हे दाखल केले होते. यानंतर जिल्ह्यातील इतर चार टोळ्यांवरही मकोकाअंतर्गत कारवाई केली गेली. यात फड गँगचाही समावेश होता. मात्र फड गँगमधील पाच आरोपींवर मकोका रद्द केल्यानं अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
गोट्या गित्ते हा वाल्मिक कराडचा राइट हँड असून तो अद्याप फरार आहे. त्याला अटक न करताच, चौकशी करण्याआधीच मकोकातून दिलासा मिळाल्यानं सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. आता या प्रकरणी पुढे काय होणार याकडे लक्ष लागून राहिलं आहे.
बीडमध्ये दोन वर्षांपूर्वी १८ ऑक्टोबरला सहदेव सातभाई यांच्यावर हल्ला झाला होता. लोखंडी रॉड, फरशी आणि काठीने मारहाण करून त्यांच्या खिशातले २ लाख ७० हजार रुपये काढून घेतले होते. या प्रकरणी गोट्या गितेसह सात जणांवर मकोकाअंतर्गत कारवाई केली होती.