Nashik News : वडपे-भिवंडी महामार्गावर रस्त्याच्या दुरुस्तीमुळे वाहतूक ठप्प; रुग्णवाहिका अडकल्या
esakal September 21, 2025 02:45 PM

सटाणा: मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील वडपे-भिवंडी रस्त्यावर (शंग्रिला रिसॉर्टजवळ) शुक्रवारी (ता. १९) दुपारपासून वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. तब्बल चार ते पाच तासांच्या अडथळ्यामुळे सात-आठ किलोमीटर लांबीच्या वाहनांच्या रांगा लागल्या. त्यामुळे प्रवासी त्रस्त झाले असून, काही रुग्णवाहिका कोंडीत अडकून रुग्णांचे हाल झाले.

उष्णतेत तासन्तास थांबून प्रवाशांचा त्रास वाढला असून, त्यांचा संताप अनावर झाला आहे. पोलिस प्रशासन प्रयत्न करत असले तरी सुरू असलेल्या रस्त्याच्या कामांमुळे मार्ग अपुरा ठरत आहे. दरम्यान, समृद्धी महामार्गामुळे नाशिक-वडपे प्रवास दीड तासात होतो; पण त्यानंतर वडपे-ठाणे या अवघ्या काही किलोमीटरच्या प्रवासाला तीन ते चार तास लागतात. त्यामुळे ‘समृद्धी महामार्गाने खरेतर प्रवाशांची सुटका न होता, वडपे-ठाणे हा दररोजचा ‘दु:खमार्ग’ ठरत आहे,’ अशी प्रतिक्रिया प्रवासी वर्गातून व्यक्त होत आहे.

Jobs In Kolhapur : कोल्हापूरच्या पोरांना जॉब मिळणार, ‘इंडोनेशिया’ गुंतवणूक करण्याच्या तयारीत; महाराष्ट्राला १२०० कोटींच्या ऑर्डर्स

रुग्णवाहिका थांबलेल्या आहेत, प्राण धोक्यात आहेत. तरीही प्रशासनाचे डोळे मिटले आहेत. रोज कोंडी होणार असेल तर या रस्त्याला ‘महामार्ग’ नव्हे तर ‘मृत्यूमार्ग’ म्हणावे लागेल.

-मनीषा बोरसे, कल्याण

आजारी वडिलांना मुंबईत उपचारासाठी नेले आणि परतीच्या प्रवासात आम्ही चार तास कोंडीत अडकलो. रुग्णाची मोठी हालअपेष्टा झाली. हा महामार्ग जनतेसाठी जीवघेणा ठरत आहे. उपाययोजना न झाल्यास आंदोलन करावे लागेल.

-हेमंत पाटील, नाशिक

ठाणे-वडपे हा महामार्ग राहिलेला नाही, तर प्रवाशांच्या सहनशीलतेची परीक्षा बनली आहे. दोन तासांत पोहोचायचे अंतर आम्हाला चार-पाच तासांत गाठावे लागते. ही सरळसरळ प्रवाशांची पिळवणूक आहे.

-प्रशांत कांबळे, कल्याण

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.