आशिया कप 2025 स्पर्धेचं साखळी फेरीचे सामने संपले असून 21 सप्टेंबरपासून सुपर 4 फेरीला सुरुवात होणार आहे. सुपर 4 फेरीत अ गटातून भारत, पाकिस्तान आणि ब गटातून श्रीलंका, बांग्लादेश यांनी जागा मिळवली आहे. आता या चार संघात टॉप 2 स्थानांसाठी लढत होणार आहे. प्रत्येक संघ एकूण तीन सामने खेळणार आहे. भारताचा पहिला सामना पाकिस्तानसोबत 21 सप्टेंबरला होणार आहे. त्यानंतर श्रीलंका आणि बांगलादेशशी लढत होईल. पण भारताचा सुपर 4 फेरीतील टी20 आंतरराष्ट्रीय रेकॉर्ड पाहिला तर चाहत्यांची धाकधूक वाढली आहे. कारण भारताचा आशिया कप सुपर 4 फेरीतील इतिहास काही खास राहिला नाही. यापूर्वी आशिया कप टी20 फॉर्मेटमध्ये दोनदा खेळला गेला. यात एकदा सुपर 4 फेरी खेळवली गेली.
2022 मध्ये पहिल्यांदा खेळवल्या गेलेल्या या फॉर्मेटमध्ये भारताला सुपर 4 फेरीतच गाशा गुंडाळावा लागला होता. तेव्हा भारत, पाकिस्तान, श्रीलंका आणि अफगाणिस्तान हे संघ सुपर 4 फेरीत होते. भारताचा पहिला सामना पाकिस्तानशी झाला होता. तेव्हा भारताने 20 षटकात 7 गडी गमवून 181 धावांचं आव्हान दिलं होतं. हे आव्हान पाकिस्तानने 19.5 षटकात 5 गडी गमवून पूर्ण केलं होतं. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात श्रीलंकेने भारताला मात दिली होती. तेव्हा भारताने 173 धावांचं आव्हान दिलं होतं. हे आव्हान श्रीलंकेने 4 गडी गमवून 19.5 षटकात पूर्ण केलं होते. अफगाणिस्तानविरुद्धचा तिसरा सामना भारताने जिंकला होता. तेव्हा 212 धावांचं आव्हान दिलं होतं. तसेच अफगाणिस्तानला 111 धावांवर रोखलं होतं.
आशिया कप 2025 स्पर्धेत पुन्हा एकदा सुपर 4 फेरीत भारताला पाकिस्तान, श्रीलंका आणि बांगलादेशशी सामना करायचा आहे. भारताला स्पर्धेतील आव्हान कायम ठेवायचं असेल तर पहिल्याच सामन्यात विजय मिळवणं आवश्यक आहे. अन्यथा भारताचा प्रवास खडतर होऊ शकतो. दरम्यान, टी20 फॉर्मेटमध्ये भारताने 2024 वर्ल्डकपनंतर एकूण 22 सामने खेळले आहेत. त्यापैकी 19 सामने जिंकले आहेत. सध्या टीम इंडिया फॉर्मात आहे. त्यामुळे सुपर 4 फेरीत भारताचं पारडं जड दिसत आहे. सूर्यकुमार यादवच्या पुढे कशी कामगिरी होते हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.