Maharashtra Health Mission Controversy : आयुष्यमान भारत मिशनचे राज्याचे प्रमुख ओमप्रकाश शेटे यांनी आज वैद्यकीय सेवा-सुविधा आणि योजनांचा बैठकीत आढावा घेतला. बैठकीला मिरज वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रकाश गुरव उपस्थित नव्हते. श्री. शेटे यांनी त्यांना थेट फोन लावला आणि ‘आमदार, कलेक्टर इथे आले आहेत. तुम्हाला त्यांच्यापेक्षा जास्त काम आहे का,’ अशा शब्दांत त्यांची कानउघाडणी केली. डॉ. गुरव यांनी ‘माझी व्हीसी आहे,’ असे सांगितल्यानंतर ‘तुमची खरंच व्हीसी आहे की नाही, मी तपासू का?’ असे म्हणत त्यांच्यावर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत आमदार सर्वश्री सुधीर गाडगीळ, गोपीचंद पडळकर, सुहास बाबर, जिल्हाधिकारी अशोक काकडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजयकुमार वाघ उपस्थित होते.
‘वैद्यकीय शिक्षण विभागाला आपला आणि सामान्य माणसांचा संबंधच नाही, असे वाटते. हे चित्र बदलावे लागेल,’ अशा शब्दांत त्यांनी नाराजी व्यक्त केली. ‘आता पुढच्या आढावा बैठकीवेळी मी अधिष्ठातांना वेळ आहे का, हे पाहूनच येतो,’ असा टोलाही त्यांनी लगावला.
श्री. शेटे यांनी शासकीय योजनांच्या प्रस्तावांना मान्यता देताना होणाऱ्या दिरंगाईबाबत तीव्र शब्दांत संताप व्यक्त केला. काही शासकीय रुग्णालयातील प्रस्तावदेखील रखडले आहेत, त्यावर श्री. शेटे म्हणाले, ‘‘तुम्ही का अडवून ठेवले आहेत हे प्रस्ताव? शासकीय रुग्णालयात देखील ‘कटप्रॅक्टिस’ होते, असे तुम्हाला वाटते का?’’ त्यांच्या या रौद्रावतारावर यंत्रणा हादरून गेली. ते म्हणाले, ‘‘राज्य शासनाने वैद्यकीय सेवांसाठी पुरेसा निधी मंजूर केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अत्यंत संवेदनशील आहेत, त्यांनी ५ हजार ४०० कोटींची तरतूद केली आहे. तळागाळात योजना न्यायचे आपले उद्दिष्ट आहे.’’
Gopichand Padalkar Statement : पडळकरांच्या फोटोला थेट चप्पलांनी मारलं, सांगलीत गोपीचंद पडळकरांच्या वक्तव्याचे तीव्र पडसाद‘समर्थ’बाबत आग्रह
‘सांगली-मिरज रस्त्यावरील समर्थ न्यूरो सेंटर या रुग्णालयाला शासकीय योजनांच्या यादीत घेतलेच पाहिजे, अन्यथा अनेकांची गैरसोय होत आहे,’ अशी स्पष्ट भूमिका आमदार गोपीचंद पडळकर, सुहास बाबर यांनी मांडली. त्यावर, ‘शासनाच्या मदतीचे पॅकेज बदलले आहे, रक्कम वाढविली आहे. डॉ. रवींद्र पाटील यांना बोलवा, चर्चा करा आणि तातडीने निर्णय घ्या,’ अशा श्री. शेटे यांनी सूचना दिल्या.
सांगलीचे कौतुक
श्री. शेटे यांनी सांगलीतील हृदय शस्त्रक्रियांसाठी झालेले काम राज्यासाठी आदर्श आहे, अशा शब्दांत कौतुक केले. ही लक्षवेधी बाब आहे, असेही ते म्हणाले. जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी हाती घेतलेली घरेलू कामगार महिला आरोग्य योजना राज्यासाठी पथदर्शी असून ती सर्वत्र राबवली जाईल, असे जाहीर केले.