ठाण्यात गोपीचंद पडळकरांची प्रतिमा जाळली
esakal September 22, 2025 12:45 AM

ठाण्यात गोपीचंद पडळकरांची प्रतिमा जाळली
जयंत पाटील यांच्याबाबत आक्षेपार्ह विधानाचा जोरदार निषेध
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २१ : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या गोपीचंद पडळकरांची प्रतिमा राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डाॅ. जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनानुसार जाळण्यात आली. या वेळी कार्यकर्त्यांनी पडळकर यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याबाबत अत्यंत खालच्या दर्जाची टीका केली होती. त्याचा निषेध करण्यासाठी तसेच पडळकर यांच्यावर कारवाई करावी, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे ठाणे जिल्हाध्यक्ष सुहास देसाई, कार्याध्यक्ष प्रकाश पाटील, महिलाध्यक्षा सुजाता घाग, महिला कार्याध्यक्षा साबिया मेमन यांच्या नेतृत्वाखाली जोरदार आंदोलन करण्यात आले. चोर गोपीचंदचे करायचे काय, खाली डोके वर पाय; मंगळसूत्र चोराला जेरबंद करा; पडळकर मुर्दाबाद; तोंडाने विष्ठा ओकतो कोण, पडळकरशिवाय दुसरा कोण, अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी पडळकरांच्या प्रतिमेला जोडे मारले तसेच त्यांच्या प्रतिमा जाळल्या. या आंदोलनात शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते. पडळकर हा वारंवार आमच्या नेत्यांवर आक्षेपार्ह टीका करीत आहे. अधिवेशनादरम्यान त्याने डाॅ. जितेंद्र आव्हाड यांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला होता. पडळकर हा विकृत माणूस आहे अन् अशी विकृती महाराष्ट्र कधीच खपवून घेत नाही. या पडळकर नावाचा साप आता ठेवण्याची वेळ आली आहे. आम्ही पडळकर याला खुले आव्हान देतो की, त्याने ठाण्यात येऊन दाखवावे; त्याला पळता भुई थोडी करू. हा पडळकर महाराष्ट्राच्या राजकारणाला लागलेली कीड आहे. आज आम्ही त्याची फक्त प्रतिमा जाळली आहे. पुढे काय करू, हे त्याने समजून जावे, असा इशारा दिला.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.