भोसरी : भोसरीतील विविध चौकांत अनधिकृतपणे फ्लेक्स लावण्यात येत असल्याने परिसराचे विद्रूपीकरण होत आहे. तरीही महापालिकेद्वारे कडक कारवाई करण्यात येत नसल्याने नागरिकांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. या फ्लेक्समुळे व्यवसायावर परिणाम होत असल्याचे दुकानदारांचे म्हणणे आहे.
राजकीय नेत्यांचे वाढदिवस, सणांच्या शुभेच्छा, दुकाने, क्लास, व्यवसाय जाहिरात आदी विविध कारणांसाठी भोसरीतील पीएमटी चौक, संविधान चौक, चांदणी चौक, भोसरी-आळंदी रस्ता चौक, पुणे-नाशिक महामार्गाचा सेवा रस्ता, पीसीएमसी चौक, लांडेवाडी चौक, कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृह परिसर, दिघी रस्ता, आळंदी रस्ता आदी भागांत अनधिकृत फ्लेक्स लावण्यात येत आहेत. त्यामुळे, परिसराचे विद्रूपीकरण होत आहे.
राजमाता जिजाऊ उड्डाणपुलाखाली पिंपरी चिंचवड महापालिकेने लावलेल्या सूचना फलक, वाहतूक नियंत्रक दिव्यांचे खांब यांनाही अनधिकृत फ्लेक्स लावण्यात येत आहेत. पीएमटी चौक, चांदणी चौक आदी भागांत फ्लेक्स लावण्यासाठी उभारलेले सांगाडे कित्येक महिने एकाच जागी असलेले पाहायला मिळतात. काही दुकानांपुढे हे फ्लेक्स लावण्यात येत असल्याने त्यांच्या व्यवसायावरही परिणाम होत असल्याचे दुकानदारांचे म्हणणे आहे.
मंगळवारी (ता. १६) भोसरी परिसरातील काही ठिकाणच्या अनधिकृत फ्लेक्सवर कारवाई करत ते काढून टाकण्यात आले. अनधिकृत फ्लेक्स विरोधात कारवाई सुरूच आहे. यापुढेही कारवाई सुरू राहील.
- तानाजी नरळे,
‘इ’ प्रभाग क्षेत्रीय अधिकारी
Pimpri Chinchwad News : पिंपरी-चिंचवडमध्ये अनधिकृत केबल्सचा विळखा; अपघाताचा धोका वाढलामहापालिकेच्या निवडणुका लवकरच होणार असल्याने अनधिकृत फ्लेक्सचे प्रमाण अधिक प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे भोसरी परिसराचे विद्रूपीकरण थांबविण्यासाठी महापालिकेने अनधिकृत फ्लेक्स लावणाऱ्यांवर कडक कारवाई करणे गरजेचे आहे.
- सुमेध भोसले, नागरिक, भोसरी