आधी टॅरिफचा बॉम्ब फोडणाऱ्या ट्रम्प प्रशासनाने नुकतीच आणखी एक धक्कादायक घोषणा केली. H1B व्हिसाच्या तरतुदींमध्ये केलेले बदल आणि लावलेली फी हाच सध्या सगळीकडे चर्चेचा विषय आहे. त्याअंतर्गत आता H1B व्हिसाटी फी 1 लाख डॉल्रस म्हणजे तब्बल 88 लाख रुपये झाली आहे. या नवीन नियमांचा भारतावर सर्वाधिक परिणाम होईल असे बोलले जात आहे. ट्रम्पचा हा निर्णय दुधारी तलवारीसारखा आहे. यामुळे भारताला तर फटका बसेलच पण अमेरिकेचंही कमी नुकसान होणार नाही, असं माजी राजनयिक महेश सचदेव या मुद्द्यावर बोलताना म्हणाले.
माजी राजनयिक महेश सचदेव हे एका वृत्तसंस्थेशी बोलत होते, ते म्हणाले की, “अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एच1बी व्हिसाबद्दल जारी केलेल्या नवीन आदेशाचा थेट परिणाम भारतावर होईल, कारण ए1बी व्हिसाचा वापर बहुतांश भारतीय नागरिक करतात. गेल्या वर्षी, H-1B व्हिसाधारकांपैकी 71 टक्के लोक भारतीय होते, ज्यात बहुतेक आयटी कामगार होते. त्यांनी अमेरिकेच्या आयटी क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे, परंतु ट्रम्प म्हणतात की हे लोक अमेरिकेतील त्यांच्या नागरिकांची जागा घेत आहेत. याच कारणामुळे त्यांनी एच1बी व्हिसासाठी 1 लाख डॉलर्सची ( सुमारे 88 लाख रुपये) फी लावण्याचा निर्णय घेतला आहे. ‘असं ते म्हणाले.
ही तर दुधारी तलवार
“या निर्णयाचा भारतीय आयटी क्षेत्र आणि कंपन्यांवर परिणाम होईल. या निर्णयामुळे भारतीयांना अमेरिकेत जाण्यापासून प्रतिबंधित केले जाईल आणि त्यांची संख्या कमी होईल असं ते म्हणाले. तर दुसरीकडे भारतीय कंपन्यांना अमेरिकन नागरिकांचा वापर करावा लागेल. आता, आयटी कंपन्यांना त्यांचे बॅक ऑफिस भारतातून चालवावे लागतील, कारण यावर अद्याप कोणतेही निर्बंध नाहीत. हा निर्णय दुधारी तलवार आहे; यामुळे केवळ भारताचेच नव्हे तर अमेरिकेचेही नुकसान होईल” अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
अमेरिका सध्या चीनशी अशा स्पर्धेत गुंतलेली आहे ज्यासाठी मोठ्या प्रमाणात नाविन्यपूर्णतेची म्हणजेच इनोव्हेशनची आवश्यकता आहे. म्हणूनच, जर अमेरिकेने परदेशी पर्यटकांवर निर्बंध लादले तर इनोव्हेशनला फटका बसेल आणि अमेरिका चीनशी स्पर्धेत मागे पडू शकेल. अमेरिकेला नेहमीच फायदा झाला आहे कारण तो देश प्रतिभावान परदेशी लोकांना येथे येऊन काम करण्याची परवानगी देतो. उदाहरणार्थ, सिलिकॉन व्हॅलीमधील अर्ध्याहून अधिक स्टार्टअप्स भारतीय वंशाच्या लोकांकडे आहेत. पण आता नव्या व्हिसा नियमांचा मोठा फटका बसू शकतो, असं ते म्हणाले.