आशिया कप 2025 स्पर्धेच्या सुपर 4 फेरीत पाकिस्तान आणि श्रीलंका हे दोन संघ आमनेसामने येणार आहेत. हा सामना दोन्ही संघांसाठी खूपच महत्त्वाचा आहे. कारण या सामन्यात पराभव झाला तर स्पर्धेतून पत्ता कापला जाणार आहे. विजय मिळाल्यानंतर इतर संघाच्या कामगिरीवर लक्ष ठेवावं लागणार आहे. अशा स्थितीत हा सामना असल्याने दोन्ही संघ विजयासाठी प्रयत्नशील असणार आहेत. हा 23 सप्टेंबरला अबू धाबी येथे होणार आहे. सुपर 4 फेरीत प्रत्येक संघाला एकूण 3 सामने खेळायचे आहेत. त्यापैकी 2 सामन्यात काहीही करून विजय मिळवणं भाग आहे. तसेच नेट रनरेटही महत्त्वाचा ठरणार आहे. श्रीलंका आणि पाकिस्तान या दोन्ही संघांनी सुपर 4 फेरीतील पहिला सामना गमावला आहे. त्यामुळे आता हा सामना जिंकणं दोन्ही संघांना गरजेचा आहे. करो या मरोची स्थिती असलेल्या या सामन्यात पराभूत होणारा संघ स्पर्धेतून बाद होणार आहे.
श्रीलंका आणि पाकिस्तान य महत्त्वपूर्ण सामन्यापूर्वी संघात बदल करणार यात काही शंका नाही. श्रीलंकेला मागच्या सामन्यात बांगलादेशकडून पराभवाचं तोंड पाहावं लागलं होतं. शेवटच्या षटकात श्रीलंकेचा तोंडातला घास बांगलादेशने हिरावून नेला होता. त्यामुळे पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात मथिसा पथिराना किंवा महिश तीक्षणा यांच्यापैकी एकाची निवड होऊ शकते. या दोघांपैकी एकाला दुनिथ वेलालागेच्या जागी संघात सहभागी केलं जाऊ शकतं. तर पाकिस्तान संघातही उलथापालथ होऊ शकते. साहिबजादा फरहान सोडला तर कोणीच चांगली फलंदाजी करू शकलं नाही. यामुळे फलंदाजीत काही बदल केले जाऊ शकता. हुसैन तलतला संधी दिली जाण्याची शक्यता आहे. पण कोणाला काढणार हे काही सांगता येत नाही.
श्रीलंकेची संभाव्य प्लेइंग इलेव्हन: पाथुम निसांका, कुसल मेंडिस (यष्टीरक्षक), कामिल मिश्रा, कुसल परेरा, चारिथ असलंका (कर्णधार), दासून शनाका, कामिंदू मेंडिस, वानिंदू हसरंगा, मथिसा पाथिराना/महिश थिक्षाना, दुष्मांता चमीरा, नुवान तुषारा.
पाकिस्तानची संभाव्य प्लेइंग इलेव्हन: सैम अयुब, साहिबजादा फरहान, फखर जमान, सलमान आगा (कर्णधार), हसन नवाज, मोहम्मद हारिस (यष्टीरक्षक), मोहम्मद नवाज, फहीम अश्रफ, शाहीन आफ्रिदी, हरिस रौफ, अबरार अहमद.