आशिया कप 2025 स्पर्धेत पाकिस्तान क्रिकेट टीमला आतापर्यंत काही खास करता आलेलं नाही. पाकिस्तानने सुपर 4 मध्ये प्रवेश मिळवला. मात्र सुपर 4 मधील पहिल्याच सामन्यात भारताने पाकिस्तानला पराभूत केलं. टीम इंडियाने पाकिस्तानवर विजय मिळवला आणि अंतिम फेरीसाठी दावा ठोकला. तर पाकिस्तानला या पराभवानंतर स्पर्धेतील आव्हान कायम राखण्यासाठी कोणत्याही स्थितीत उर्वरित 2 सामने जिंकावे लागणार आहेत. पाकिस्तान या स्पर्धेनंतर मायदेशात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टेस्ट, टी 20i आणि वनडे अशा एकूण 3 मालिका खेळणार आहे.
दक्षिण आफ्रिकेच्या पाकिस्तान दौऱ्याची सुरुवात कसोटी मालिकेने होणार आहे. उभयसंघात एकूण 2 कसोटी सामने होणार आहेत. दक्षिण आफ्रिकेने पाकिस्तान दौऱ्यातील तिन्ही मालिकांसाठी संघाची घोषणा केली. दक्षिण आफ्रिकेने या दौऱ्यातील कसोटी मालिकेसाठी कर्णधार बदलला आहे. दक्षिण आफ्रिकेचा नियमित कसोटी कर्णधार टेम्बा बावुमा याचा समावेश करण्यात आलेला नाही.
टेम्बाचा दुखापतीमुळे या मालिकेत समावेश करण्यात आलेला नाही. टेम्बाला इंग्लंड विरूद्धच्या कसोटी मालिकेदरम्यान दुखापत झाली होती. टेम्बा या दुखापतीतून पूर्णपणे बरा झाला नाही. त्यामुळे टेम्बाच्या जागी आता एडन मारक्रम दक्षिण आफ्रिकेचं कसोटी मालिकेत नेतृत्व करणार आहे. तसेच दक्षिण आफ्रिकेचा फिरकीपटू केशव महाराज यालाही दुखापतीचा सामना करावा लागत आहे. केशवला दुखापतीतून बरं होण्यासाठी आणखी काही दिवस लागू शकतात. मात्र तो लवकरच बरा होईल, असा विश्वास निवड समिताीला आहे. त्यामुळे केशवला दुसऱ्या आणि अंतिम सामन्यात संधी दिली आहे.
दरम्यान वर्ल्ड चॅम्पियन दक्षिण आफ्रिकेची wtc 2025-2027 या साखळीतील ही पहिलीच मालिका असणार आहे. दक्षिण आफ्रिकेने गेल्या साखळीतील अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाचा पराभव करत टेस्ट वर्ल्ड कप जिंकला होता. त्यामुळे आता वर्ल्ड चॅम्पियन दक्षिण आफ्रिका पाकिस्तान विरुद्ध विजयी सुरुवात करणार का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
पहिला सामना, 12 ते 16 ऑक्टोबर, गद्दाफी स्टेडियम, लाहोर
दुसरा सामना, 20 ते 24 ऑक्टोबर, रावळपिंडी स्टेडियम
कसोटी मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेचा संघ : एडन मार्करम (कॅप्टन), डेविड बेडिंघम, कॉर्बिन बॉश, डेवाल्ड ब्रेविस, केशव महाराज (फक्त दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी) टोनी डी झॉर्जी, जुबैर हामजा, सायमन हार्मर, मार्को यान्सन, वियान मुल्डर, कगिसो रबाडा, रायन रिकल्टन, ट्रिस्टन स्टब्स, प्रेनेलन सुब्रायन, कायल वेरेना आणि सेन्युरन मुथुसामी.