महिलांमध्ये वाढतेय हार्मोनल असंतुलनाची समस्या
esakal September 24, 2025 11:45 AM

महिलांमध्ये वाढतेय हार्मोनल असंतुलनाची समस्या
मानसिक, भावनिक कारणे; स्त्रीरोगतज्ज्ञांची माहिती
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २३ ः हल्लीच्या धकाधकीच्या जीवनात मानसिक आणि भावनिक कारणांमुळे शरीरातील हार्मोन्सच्या स्रावात असमतोल झाल्याची समस्या महिलावर्गांत आढळून येते. अनेक महिला शरीरात होणाऱ्या असामान्य बदलांकडे दुर्लक्ष करतात, जसे की थकवा, अनियमित मासिक पाळी किंवा भावनांमध्ये होणारे जलद आणि अचानक बदल, त्यांना हेच माहीत नसते की या समस्या हार्मोनल असंतुलनामुळे उद्भवतात, अशी माहिती स्त्रीरोगतज्ज्ञांनी दिली.
महिलांनी संप्रेरक, अँटी-मुलेरियन हार्मोन (एएमएच), थायरॉईड हार्मोन्स आणि प्रोलॅक्टिनसारख्या या प्रमुख हार्मोन्सच्या पातळीचे निरीक्षण करणे आणि असामान्य लक्षणे आढळताच वेळीच मदत घेणे गरजेचे आहे. जर हार्मोन्सशी संबंधित प्रजननक्षमतेच्या कोणत्याही समस्या आढळून आल्या तर त्वरीत प्रजननतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा, असा सल्ला डॉक्टर देतात.
खारघर येथील मदरहूड रुग्णालयाच्या प्रसूती आणि स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. प्रतिमा थमके यांनी सांगितले, की या हार्मोनल असंतुलनाचा ठरावीक रक्तचाचण्यांद्वारेदेखील शोध घेता येऊ शकतो. जीवनशैलीत योग्य बदल, तज्ज्ञांच्या सल्ल्याने औषधोपचार किंवा हार्मोनल असंतुलनाच्या मूळ कारणावर आधारित उपचारांनी ही समस्या प्रभावीपणे व्यवस्थापित केली जाऊ शकते, असे त्या म्हणाल्या.
खारघरच्या मदरहुड फर्टिलिटी अँड आयव्हीएफ वरिष्ठ वंधत्व निवारणतज्ज्ञ डॉ. रीता मोदी यांनी स्पष्ट केले, की एका जरी हार्मोन्सची पातळी वर-खाली झाली तर आपल्या संपूर्ण शरीराचे चक्र बिघडते आणि त्याची काही चिंताजनक लक्षणेदेखील दिसू लागतात. थायरॉईडच्या समस्या असलेल्या महिलांना सतत थकवा जाणवू शकतो किंवा अचानक वजन वाढू शकते. एएमच पातळी कमी झाल्याने गर्भधारणेच अडचणी येऊ शकतात; मात्र वेळीच निदान व उपचाराने गर्भधारणेचे स्वप्न साकारता येते. हार्मोनल असंतुलनाचा एकूण आरोग्यावर परिणाम होतो. या समस्या वेळीच दूर केल्यास केवळ प्रजनन क्षमता सुधारत नाही तर जीवनाची एकूण गुणवत्तादेखील सुधारते.

महिलांनी मासिक पाळीचे चक्र, शारीरिक ऊर्जा आणि अचानक भावनांमधील बदलांकडे लक्ष दिले पाहिजे. संतुलित आहार, वजन नियंत्रित राखणे, चांगली झोप, ताणतणावाचे व्यवस्थापन यामुळे हार्मोन्सची पातळी संतुलित राखण्यास मदत होईल. हार्मोनल असंतुलनावर उपचारांसाठी आणि अचूक व्यवस्थापनासाठी नियमित तपासणी करणे गरजेचे आहे.
- डॉ. रीता मोदी, वंधत्व निवारणतज्ज्ञ

महिलांमध्ये मोठ्या संख्येने हार्मोनल असंतुलन दिसून येते. अनेकांना याविषयी माहिती नसते आणि ते निमूटपणे याचा त्रास सहन करतात. त्यामुळे महिलांनी आरोग्याकडे लक्ष दिले पाहिजे.
- डॉ. प्रतिमा थमके, स्त्रीरोगतज्ज्ञ

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.