मलंगडवाडी बसथांब्यावर गांजासह आरोपीला अटक
उल्हासनगर, ता. २३ (वार्ताहर) ः उल्हासनगर पोलिसांनी अवैध अमली पदार्थांच्या विक्रीवर मोठी कारवाई करीत मलंगडवाडी परिसरात धाडसी सापळा रचला. पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट कारमध्ये विक्रीसाठी आणलेला तब्बल ९९३ ग्रॅम गांजा पोलिसांच्या ताब्यात आला असून त्याची किंमत सुमारे एक लाख २० हजार रुपये आहे. या कारवाईत आरोपी शाहरुख ऊर्फ दाऊद अन्वर पठाण (वय २१) याला अटक करण्यात आली आहे.
हिललाइन पोलिस ठाण्याचे पोलिस हवालदार संदीप बर्वे यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली, की मलंगडवाडी बसथांबा परिसरात एका पांढऱ्या स्विफ्ट गाडीतून गांजा विक्रीसाठी आणला जात आहे. या माहितीची खात्री करून पोलिस उपायुक्त सचिन गोरे यांच्या परवानगीने सहाय्यक पोलिस निरीक्षक योगेश बेंडकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने ठिकाणी सापळा रचला. संशयित गाडी बसथांब्यावर आल्यावर पोलिसांनी ताब्यात घेतली. तपासात कारमधून गांजा जप्त केला गेला. ही कारवाई पोलिस उपनिरीक्षक योगेश बेंडकुळे, पोलिस हवालदार संदीप बर्वे, पोलिस हवालदार अमीन तडवी, पोलिस नाईक नितीन पादिर, पोलिस शिपाई खरमाळे, सातपुते, तुषार गावडे आणि प्रशांत पाटील यांच्या सहकार्याने यशस्वी झाली. या धाडसी कारवाईमुळे शहरातील अमली पदार्थविक्री करणाऱ्या रॅकेटला मोठा फटका बसला असून नागरिकांनी पोलिसांचे कौतुक केले आहे. आरोपी आणि जप्त गांजा पुढील तपासासाठी पोलिस ठाण्यात ठेवण्यात आले आहेत.