देवाचे टाक, मूर्ती सासूला द्याव्यात
esakal September 24, 2025 10:45 PM

पुणे, ता. २३ : ‘घटस्थापनेसाठी देवाचे टाक आणि मूर्ती मिळाव्यात,’ यासाठी न्यायालयात धाव घेणाऱ्या सासूला मोठा दिलासा मिळाला आहे. ‘देवाचे टाक व मूर्ती त्वरित सासूला द्याव्यात’, असा अंतरिम आदेश न्यायालयाने सुनेला दिला आहे. तसेच सून राहत असलेल्या घरात सासू, पती यांसह कुटुंबीयांचे कपडे व इतर वस्तू आहेत, त्या त्यांना परत कशा दिल्या जाणार याचे नियोजन न्यायालयात सादर करावे, असेदेखील आदेशात नमूद आहे.
कँटोन्मेंट न्यायालयातील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी वाय. एस. कवडे यांनी हा आदेश दिला. या प्रकरणात सासू सुलभा यांनी सून सुभद्रा यांच्याविरोधात मनार्इचा आदेश मिळण्यासाठी न्यायालयात दावा दाखल केला आहे. सुभद्रा आणि पती विजय (सर्व नावे बदललेली) यांच्यात वाद झाल्यानंतर सुभद्रा हिने पती आणि सासू यांना घराबाहेर काढले. त्यामुळे हे दोघेही आता दुसऱ्या ठिकाणी राहत आहेत. त्यामुळे सासूने दावा दाखल करत आपणास घराबाहेर काढण्यास, घरात येऊ न देण्यास, तसेच सुनेला घराच्या २०० मीटर परिसरात येण्यास प्रतिबंध करावा, अशी मागणी न्यायालयात केली होती. तसेच मूळ दावा निश्चित होर्इपर्यंत घटस्थापनेसाठी सुनेने ताबा घेतलेल्या घरातील टाक व देवांच्या मूर्ती मिळाव्यात, असा अर्ज ॲड. जान्हवी भोसले आणि ॲड. भालचंद्र धापटे यांच्यामार्फत केला होता. त्यावर सुनेने ‘सासूने घरी येऊन घटाची स्थापना करावी’, अशी बाजू मांडली.

१० दिवसांत अर्ज निकाली
टाक व देवांची मूर्ती मिळण्याचा अर्ज सासूने १० सप्टेंबरला दाखल केला होता. त्यावर शनिवारी (ता. २०) न्यायालयाने आदेश दिला. न्यायालयाने केवळ तीन तारखा आणि १० दिवसांत हा अर्ज निकाली काढला.

सुनेने सासू आणि मुलाला त्रास देऊन घरातून बाहेर काढले असून, घरावर ताबा मिळवला आहे. या प्रकरणात सासूने त्यांना त्यांच्या लग्नात आणि वारसाने मिळालेल्या देवाच्या मूर्ती व टाक मिळण्याची मागणी केली होती. सासू या गेल्या ४० वर्षांपासून घटस्थापना करत आहेत. तसेच लग्न झाल्यापासून त्या देवांची पूजा करत आहेत. त्यामुळे यंदादेखील त्यांना टाक व मूर्तीच्या जवळ घटस्थापना करायची आहे, असे म्हणणे न्यायालयात मांडले. न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेत सासूचा अर्ज मंजूर केला.
- ॲड. जान्हवी भोसले, अर्जदार सासूच्या वकील

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.