जुन्नर, ता.२३ : यंदाच्या गळीत हंगामासाठी श्री विघ्नहर सहकारी साखर कारखाना सज्ज झाला आहे. कारखान्याच्या सर्व यंत्रसामुग्रीची देखभाल व दुरुस्तीची कामे पूर्ण झाली असल्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर यांनी सांगितले.
निवृत्तीनगर (ता.जुन्नर) विघ्नहर साखर कारखान्याच्या ४० व्या गळीत हंगामाचे बॉयलर अग्निप्रदीपन संचालक सुरेश गडगे व त्यांच्या पत्नी अमृता यांचे हस्ते सोमवार (ता.२२) पार पडले. यावेळी शेरकर बोलत होते. ते पुढे म्हणाले, की ऊस गाळप आढावा व हंगाम नियोजनाबाबत राज्यमंत्री समितीच्या बैठकीत गळीत हंगाम सुरू करण्याची तारीख जाहीर झाल्यानंतर यंदाचा गाळप हंगाम सुरू होईल. कारखान्याने १३ लाख टनांहून अधिक ऊस गाळप करण्यासाठी सर्व यंत्रणांमार्फत सुयोग्य नियोजन केले आहे. यामुळे प्रतिदिन आठ ते ८,५०० टन ऊसाचे गाळप होणार आहे. को-जन प्रकल्पांसह ६५ केएलपीडी क्षमतेचा डिस्टिलरी प्रकल्पही पूर्ण क्षमतेने चालणार आहे.
यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष अशोक घोलप, सुमित्रा शेरकर, कार्यकारी संचालक भास्कर घुले, सर्व संचालक, अधिकारी, कामगार युनियन, सेवक पतसंस्था, सांस्कृतिक मंडळाचे पदाधिकारी सदस्य व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी उत्पादन वाढीसाठी कारखान्याच्या ऊस विकास विभागाचे मार्गदर्शन तसेच कारखान्यामार्फत देण्यात येणारी खते व अन्य सर्व सुविधांचा लाभ घ्यावा तसेच जास्तीत जास्त ऊस गाळपास देवून सहकार्य करावे, असे आवाहन शेरकर यांनी केले.
09209