दखल----------लोगो
चिपळूण शहरात झालेला राडा, हाणामारी अल्पवयीन मुलांची गुंडगिरी एवढेच नाही, त्या पलीकडे जाऊन त्याकडे पाहिले पाहिजे. कायद्याने सज्ञान नसलेली ही मुले अशी बेफाम का वागतात, याचा विचार प्रामुख्याने व्हायला हवा. असे प्रकार छोट्या प्रमाणात वेगवेगळ्या रूपात समाजात वाढू लागले आहेत. राड्यावर संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. या मुलांना फटकावून काढा, त्यांची धिंड काढा, असा आततायीपणा नको; मात्र त्याचबरोबर या मुलांच्या आयुष्याचे नुकसान होता कामा नये असाही सूर नको. हे दोन्ही सूर म्हणजे कायद्याच्या प्रक्रियेबद्दल अज्ञान ठरते. कायद्याचे राज्य या संकल्पनेलाच या भूमिका छेद देणाऱ्या आहेत.
- शिरीष दामले, रत्नागिरी
---
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची मजा की माज?
चिपळूणमधील मारहाणीच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओत जे दिसते त्यावरून दोन अल्पवयीन मुलांना त्यांच्याच वयोगटातील इतर मुलांनी बेदम मारले याशिवाय एका मुलाला उठाबशा काढायला सांगत त्याची पद्धतशीर जाहीरपणे महामार्गावर मानहानी करण्याचा प्रयत्न दिसतो. मानहानी सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या बाजूने उभ्या राहिलेल्या विद्यार्थ्यालाही मारहाण झालेली दिसते.
या प्रकरणी जमावाने पोलिस ठाण्यात अरेरावी करण्यापेक्षा कायदेशीर मार्ग चोखाळला पाहिजे. मारहाण झालेल्या मुलाने अथवा त्याच्या पालकांनी पोलिसात तक्रार करावी. यावर पोलिस कायदेशीर कारवाई करतील. संबंधित संशयित मुलांना बाल न्यायमंडळासमोर हजर करतील. १८ वर्षाखालील अज्ञान मुलांना गुन्हेगार म्हणत नाहीत. या मुलांवर गुन्हेगार, असा शिक्का बसणार नाही. त्यांची कारकीर्द कोठेही अडचणीत येणार नाही; मात्र आपण गैरकृत्य केले, बेकायदेशीर वागलो तर आपल्यावरही कारवाई होऊ शकते हा धडा मिळेल. मारहाण प्रकरणात आरोप असलेल्यांबाबत बाल न्यायमंडळ निर्णय करेल. मुलांना शिक्षा दिली गेलीच तर ती इतर शिक्षेपेक्षा वेगळी असू शकते. मुलांचे समुपदेशन आवश्यक ठरते. बाल न्यायमंडळामार्फत असे समुपदेशनाचे आदेशही निघू शकतात. या मुलांवर या पद्धतीची कारवाई होणे आवश्यक आहे. यातून समाजात अशा पद्धतीची वागणूक करण्यास धजावणाऱ्या मुलांसाठी एक संदेशही जाईल. याबाबतची कायदेशीर प्रक्रिया पाळली जाणे हे कायद्याचे राज्य हे तत्त्व पोचवण्यासाठीही आवश्यक आहे. याबाबत स्वतः कायदा हातात घेऊन या मुलांवर कारवाई करण्याची भाषाही चुकीची.
सध्याच्या वातावरणात उन्माद निर्माण करणे म्हणजे काही विशेष अशी समजूत झाली आहे. संगीतापासून उत्सवापर्यंत क्रीडांगणापासून कलांगणापर्यंत सर्वत्र उन्मादी वातावरण निर्माण करण्यावर भर दिला जातो. या वातावरणात मने बहकण्याची शक्यता जास्त. तशी ती बहकली की, स्वतःबद्दलच्या भ्रामक कल्पना तयार होतात. यातूनच संघटितपणे गुन्हेगारी प्रवृत्तीला साजेशा कृती घडतात. असे वागणाऱ्याला पुढारी, तथाकथित नेते पाठीशी घालत असतात. मग ना कायद्याचा धाक ना समाजाचा ना शिक्षकांचा ना पालकांचा अशी अवस्था होते. चिपळूणमध्ये जे घडले ते आणि तसे प्रकार हे या साऱ्याचे अपत्य.
आज या प्रकरणात मार खाणारी आणि मारणारी मुले आपली नसतीलही; पण याला वेळीच पायबंद घातला नाही तर या प्रकारच्या किंवा इतर कृत्यात सामील असणारी मुले आपली नसतीलच, याची खात्री देता येणार नाही. त्यामुळे विवेकाचे बोल ही आजची गरज आहे. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी मजा करणे अगदी स्वाभाविक आहे; मात्र चिपळुणात व्हिडिओद्वारे जे पुढे आले आहे ते पाहिल्यावर विद्यार्थ्यांची ही मजा आहे की, माज असा प्रश्न पडतो. झालेला प्रकार त्यांना मजा वाटत असेल तर ही पद्धत नव्हे, हे त्यांना समजवावे लागेल आणि माज असेल तर कायद्याने तो उतरवावा लागेल.
---
चौकट
समाजमाध्यमांवरील उमाळे नकोत
या साऱ्या प्रकरणात तक्रार देऊन कायदेशीर प्रक्रिया करण्यापेक्षा ते मिटवण्यात, तथाकथित माफी घेण्यात उत्साह का दाखवला गेला हा प्रश्नच आहे. एक व्यवस्था निर्माण करून त्या योगे सामाजिक नियंत्रण करण्यापेक्षा हा असा सोयीचा, अविवेकाचा मार्ग स्वीकारणे चूकच. ज्यांना मारहाण झाली ती मुले आणि त्यांचे पालक भीतीपोटी तक्रार देण्यास पुढे येत नसतील तर त्यांच्या मागे समाजाने बळ उभे केले पाहिजे तसे ते न करता फक्त समाजमाध्यमावर उमाळे काढण्याला काहीही अर्थ नाही.