दुचाकीच्या धडकेत पाचवर्षीय चिमुरडी जखमी
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २४ : रस्ता ओलांडताना भरधाव आलेल्या एका दुचाकीस्वाराने पाचवर्षीय नाजमा खातून या चिमुरडीला जोरदार धडक दिल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत ती चिमुरडी गंभीररीत्या जखमी झाली असून, पसार दुचाकीस्वाराविरोधात गुन्हा दाखल झाल्याची माहिती कासारवडवली पोलिसांनी दिली. कासारवडवली येथे राहणाऱ्या तक्रारदार सानोनारा खातून अली शेख (३२) आणि त्यांची मुलगी नाजमा अशा दोघी २३ सप्टेंबर रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास घरातून पायी तक्रारदाराचे पती हातगाडी लावत असलेल्या ठिकाणी जात होते. त्या दोघी महालक्ष्मी टॉवर सोसायटीच्या जवळ रस्ता ओलांडताना कासारवडवली गावाकडून नाक्याकडे भरधाव आलेल्या अनोळखी दुचाकीने नाजमा हिला डाव्या बाजूने जोरात धडक दिली. यामध्ये तिचे डोके, नाक, पोट आणि हनुवटीला जखम झाली. तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. अपघातानंतर दुचाकीस्वार पसार झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक निवृत्ती कोल्हटकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.