मुंबई : मुंबईतील कांदिवली येथे भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. सकाळच्या सुमारास ही घटना घडली असून यामध्ये सात जण भाजले आहेत. कांदिवली (पूर्व) येथील ईएसआयसी रुग्णालयाजवळील राम किसन मेस्त्री चाळ येथे आगीची घटना घडली. या आगीने अवघ्या काही क्षणात रौद्र रूप घेतल्यामुळे यामध्ये सात जण मोठ्या प्रमाणात भाजले आहेत. दरम्यान आगीचे कारण अद्याप समोर आले नसून आगीत जखमी झाल्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. शिवानी गांधी (५१) ७०% भाजली, नितू गुप्ता (३१) ८०% भाजली, जानकी गुप्ता (३९) ७०% भाजली आहे. तर मनराम कुमकट (५५) ४०% भाजली आहे. या चौघांना ईएसआयसी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर रक्षा जोशी (४७), दुर्गा गुप्ता (३०) आणि पूनम (२८) या तिघी ८५-९०% भाजल्या आहेत आणि त्यांना पुढील उपचारांसाठी बीडीबीए रुग्णालयातून कस्तुरबा रुग्णालयात हलवण्यात आले आहे.