भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri on Rohit Sharma & Virat Kohli) यांचे मत आहे की, येणारी ऑस्ट्रेलिया वनडे मालिका विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या करिअरच्या पुढील टप्प्याचा मार्ग ठरवेल. शास्त्री म्हणाले की, जर हे दोन्ही अनुभवी खेळाडू 2027 विश्वचषक खेळायचा विचार करत असतील, तर या मालिकेत त्यांना फिटनेस आणि कामगिरीच्या जोरावर निवडकर्त्यांना प्रभावित करावे लागेल.
भारत 19 ऑक्टोबरपासून पर्थ येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध 3 सामन्यांची वनडे मालिका खेळणार आहे. कोहली आणि रोहित, ज्यांनी आधीच कसोटी आणि टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे, त्यांना या दौऱ्यासाठी संघात स्थान मिळाले आहे. ही मालिका त्यांच्या दृष्टीने 2027 विश्वचषकाआधी स्वतःला सिद्ध करण्याची मोठी संधी मानली जात आहे.
शास्त्री म्हणाले, ते संघाचा भाग आहेत कारण ही मालिका त्यांच्या दृष्टीने एका परीक्षेसारखी आहे. पुढे सर्व काही त्यांच्या फिटनेस, कामगिरी आणि फॉर्मवर अवलंबून आहे. या दौऱ्यानंतर त्यांनाही जाणवेल की पुढील दोन वर्ष खेळण्याच्या स्थितीत आहेत की नाही.
त्यांनी पुढे सांगितले की, वय वाढले तरी खेळाडूमध्ये जर जिद्द आणि आवड कायम असेल, तर तो संघासाठी अमूल्य ठरतो. शास्त्री म्हणाले, मोठ्या सामन्यांत अनुभवाला पर्याय नसतो. अशा लढतींमध्ये नेहमी दिग्गजच पुढे येतात. अलीकडेच झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीत आपण हे पाहिले आहे.
रिपोर्ट्सनुसार, रोहित शर्मा (Rohit Sharma) अलीकडेच बंगळुरूमधील BCCI सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये आपली फलंदाजी आणि फिटनेसवर मेहनत घेत होता, तर विराट कोहली (Virat Kohli) लंडनमध्ये आपली तयारी करताना दिसत आहे.
भारताचा मर्यादित षटकांचा हा दौरा 19 ऑक्टोबरला पर्थ स्टेडियमवर सुरू होईल. त्यानंतर दुसरा वनडे 23 ऑक्टोबरला अॅडलेड ओव्हलवर आणि तिसरा वनडे 25 ऑक्टोबरला सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर खेळवला जाईल. त्यानंतर 29 ऑक्टोबरपासून 5 सामन्यांची टी20 मालिका सुरू होईल.
2020-21 मध्ये जेव्हा भारताने ऑस्ट्रेलिया दौरा केला होता, तेव्हा टीम इंडियाला (Team india) वनडे मालिकेत 2-1 अशी हार पत्करावी लागली होती, पण टी20 मालिकेत मात्र भारताने 2-1 अशी मालिका जिंकली होती.