पाकिस्तान क्रिकेटला मोठा धक्का, 'या' दिग्गज खेळाडूचे झाले निधन
Marathi October 14, 2025 12:25 AM

क्रिकेट जगतातून एक दुःखद बातमी समोर आली आहे. पाकिस्तानचे सर्वात ज्येष्ठ क्रिकेटपटू वजीर मोहम्मद यांचे सोमवारी 95 व्या वर्षी निधन झाले आहे. त्यांनी इंग्लंडमधील बर्मिंगहॅम येथे अखेरचा श्वास घेतला. वजीर मोहम्मद यांच्या निधनावर पाकिस्तान क्रिकेट बोर्डचे प्रमुख मोहसिन नकवी यांनी शोक व्यक्त केला आहे.

कसोटी खेळाडू हनीफ मोहम्मद, मुश्ताक मोहम्मद आणि सादिक मोहम्मद यांचे मोठे बंधू वजीर मोहम्मद यांनी 1952 ते 1959 दरम्यान पाकिस्तानकडून 20 कसोटी सामने खेळले होते. 1952 मध्ये पहिल्यांदा कसोटी मालिका खेळणाऱ्या पाकिस्तानी संघातील ते सर्वात ज्येष्ठ जिवंत सदस्य होते.

प्रसिद्ध मोहम्मद बंधूंच्या परिवारातील ज्येष्ठ वजीर मोहम्मद यांनी निवृत्तीनंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (पीसीबी) चे सल्लागार म्हणूनही काम केले होते. त्यानंतर ते ब्रिटनमध्ये गेले आणि तिथेच त्यांचे निधन झाले. पीसीबीचे अध्यक्ष मोहसिन नकवी यांनी दुःखग्रस्त परिवाराबद्दल संवेदना व्यक्त केली आणि पाकिस्तान क्रिकेटमध्ये वजीर मोहम्मद यांच्या महत्त्वपूर्ण योगदानाचे कौतुक केले.

आपल्या इतर भावांप्रमाणेच कलात्मक फलंदाज असलेल्या वजीर मोहम्मद यांनी पाकिस्तानच्या सुरुवातीच्या कसोटी विजयांमध्ये काही अविस्मरणीय खेळी केल्या होत्या. त्यामध्ये 1957-58 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध पोर्ट ऑफ स्पेन येथे खेळलेली 189 धावांची मॅरेथॉन खेळी विशेष उल्लेखनीय आहे, ज्यामुळे पाकिस्तानला विजय मिळवण्यात मोठी मदत झाली होती. तसेच 1954 मध्ये ओव्हल कसोटीत विजय मिळवणाऱ्या पाकिस्तान संघात त्यांनी 42 धावांसह सर्वाधिक धावा केल्या होत्या.

आपल्या कसोटी कारकिर्दीत वजीर मोहम्मद यांनी 1952 ते 1959 या कालावधीत पाकिस्तानकडून 20 कसोटी सामने खेळले. या दरम्यान त्यांनी 27.62 च्या सरासरीने एकूण 801 धावा केल्या. वजीर यांनी 1957-58 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध 189 धावांची संस्मरणीय खेळी साकारली होती.

वजीर मोहम्मद यांनी फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली होती. त्यांनी 105 सामन्यांत 40.40 च्या प्रभावी सरासरीने धावा केल्या. तसेच 11 शतके आणि 26 अर्धशतके झळकावली. क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (पीसीबी) मध्ये सल्लागार म्हणून काम केले. त्यानंतर त्यांनी नॅशनल बँक ऑफ पाकिस्तानमध्ये बँकर म्हणून कार्यभार सांभाळला. पुढे ते युनायटेड किंगडममध्ये गेले, जिथे त्यांचे निधन झाले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.