प्रभागरचना राष्ट्रवादीच्या पथ्यावर
खालापुरात भाजप, शिंदे गटाची दमछाक होणार
खालापूर, ता. १५ (बातमीदार)ः तालुक्यात जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकांची रणधुमाळी रंगणार आहे. प्रभागरचना जाहीर झाल्याने इच्छुकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे, पण ही रचना राष्ट्रवादीला अनुकूल असून, भाजप, शिंदे गटाची दमछाक होणार आहे.
खालापूर तालुक्यात २०१७ ला झालेल्या निवडणुकीत चार जिल्हा परिषद गटांपैकी तीन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने तर एक जागा शिवसेनेने जिंकली होती. चौक जिल्हा परिषदेची जागा त्या वेळी शिवसेनेच्या आणि सध्या भाजपमध्ये असलेल्या मोतीराम ठोंबरे यांनी मोठ्या फरकाने जिंकली होती, तर वडगाव जिल्हा परिषदेची जागा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पद्मा पाटील यांनी जिंकली होती. वासंबे गटात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उमा मुंडे यांनी बाजी मारली होती, तर साजगाव जिल्हा परिषद गटामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आणि सध्या भाजपमध्ये असलेले नरेश पाटील यांनी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष भाई शिंदे यांचा पराभव करत निवडणूक जिंकली होती. आठ वर्षांत राज्यातील राजकीय घडामोडीचा गाव पातळीवर परिणाम झाला आहे.
--------------------------
सध्याची राजकीय परिस्थिती
- राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिंदे शिवसेना जरी एकत्र असले तरी खालापूर तालुक्यात मात्र शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे रायगड जिल्हाध्यक्ष सुधाकर घारेंमधील संघर्षामुळे महायुती दुभंगली आहे. तालुक्यात प्रमुख पक्ष स्वबळावर निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पूर्वीच्या तिन्ही जागेवर दावा करणार असल्याचे जवळपास निश्चित आहे.
- पूर्वीचा वडगाव आणि आत्ताचा सावरोली गटातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सुरेश पाटील वासंबे गटातून राष्ट्रवादीचे संदीप मुंडे आणि पूर्वीचा साजगाव आणि आता आत्करगाव जिल्हा परिषद गटातून माजी पंचायत समिती सभापती राष्ट्रवादी काँग्रेसच्या श्रद्धा साखरे यांची उमेदवारी पक्की समजली जात आहे. या ठिकाणी प्रतिष्ठा राखण्यासाठी आमदार महेंद्र थोरवे यांना तुल्यबळ उमेदवार उभे करावे लागणार आहेत.
- सावरोली आणि वासांबे, चौक जिल्हा परिषद गटाचा काही भाग उरण विधानसभा तर काही भाग कर्जत विधानसभा मतदारसंघात येतो. उरणचे भाजप आमदार महेश बालदी यांचे संदीप मुंडे आणि सुरेश पाटील यांच्याशी सलोख्याचे संबंध आहेत. त्यामुळे सावरोली आणि वासांबे गटात सुरेश पाटील आणि संदिप मुंडे यांचा मार्ग सुकर झाला आहे.