कॉलनी फोरमने रस्ते दुरुस्तीचे काम पाडले बंद
खारघर, ता. १५ (बातमीदार) ः उत्सव चौकाकडून टाटा रुग्णालय रस्त्यावर पालिकेकडून खड्डे दुरुस्तीचे सुरू असलेले काम कॉलनी फोरमकडून बंद पाडले आहे. पालिकेने खड्डे दुरुस्तीऐवजी नव्याने डांबरीकरण करण्यात यावे, अशी मागणी कॉलनी फोरमकडून केली जात आहे.
खारघरमधील रस्ते खड्डेमय झाले असून, याचा नाहक त्रास वाहनचालकांना सहन करावा लागत आहे. खारघर पालिकेने चार ठेकेदारांच्या माध्यमातून रस्त्याचे डांबरीकरण केले, मात्र पहिल्याच पावसात रस्ते वाहून गेल्यामुळे रहिवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर पालिका दरवर्षी खड्डे दुरुस्तीच्या नावाखाली नागरिकांचे कोट्यवधी रुपये धूळधाण करीत आहे, असे कॉलनी फोरमने म्हटले. यावर खारघरमधील निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई केली जाईल, असे पालिकेकडून सांगण्यात आले होते, मात्र कोणतीही कारवाई केली जात नसल्यामुळे मंगळवार (ता. १४) कॉलनी फोरमच्या पदाधिकारी जे. जे. रसोई हॉटेलसमोरील रस्त्यावर सुरू असलेले काम बंद पाडले. या वेळी लीना गरड, बालेश भोजने, अनिता भोसले यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. पालिकेने खड्डे दुरुस्ती न करता नव्याने डांबरीकरण करण्याची मागणी या वेळी केली.