कनेडी प्रशालेत कौशल्य
विकास प्रशिक्षण वर्ग
कनेडी, ता. १५ ः येथील माध्यमिक विद्यामंदिर संस्थेतर्फे कौशल्य विकासअंतर्गत ‘मिनिस्ट्री ऑफ स्किल डेव्हलपमेंट इंडिया’ या केंद्र सरकारच्या योजनेंतर्गत ब्युटी पार्लर, जूट क्राफ्ट मेकर्स आणि हेल्पर वायरमन प्रशिक्षण कोर्स वर्गाचे उद्घाटन करण्यात आले. यासाठी ज्युनिअर कॉलेजमधील ४० विद्यार्थिनींनी ब्युटी पार्लर व जूट क्राफ्ट मेकर्ससाठी प्रवेश घेतला, तर हेल्पर वायरमनसाठी २० विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे.
प्रशिक्षण आठवड्यातील मंगळवार, गुरुवार व शनिवार या दिवशी सकाळी अकरा ते दुपारी एकपर्यंत दिले जाणार आहे. तीन महिने कालावधीचा परिपूर्ण कोर्स असेल. या प्रशिक्षण वर्गाच्या उद्घाटनास प्रमुख पाहुणे डी. ए. सावंत यांनी विज्ञान विभागाकडे शिक्षण घेत असलेल्या पाच गरीब व होतकरू विद्यार्थ्यांसाठी दत्तक योजनेतून प्रत्येकी सात हजार, असे एकूण ३५ हजारांचा धनादेश प्रशालेला सुपूर्द केला. या कार्यक्रमासाठी जन शिक्षण संस्था सिंधुदुर्गचे सुधीर पालव, शालेय समिती चेअरमन आर.एच. सावंत, खजिनदार गणपत सावंत, गांधीनगरचे सरपंच मंगेश बोभाटे, मुख्याध्यापक तथा प्राचार्य सुमंत दळवी, पर्यवेक्षक बयाजी बुराण आदींनी शुभेच्छा दिल्या.