श्रीलंकेतली रामायणाचा वारसा सांगणारी ही पर्यटनस्थळं तुम्हाला माहित आहेत का?
BBC Marathi October 16, 2025 09:45 PM
Getty Images

श्रीलंका हा देश आशिया खंडातील पर्यटकांमध्ये सर्वात लोकप्रिय असलेल्या पर्यटन स्थळांपैकी एक आहे. हे बेट म्हणजे समुद्रातील पाचू आहे. निसर्गसौंदर्यानं नटलेला हा देश पर्यटकांना नेहमीच आकर्षित करत आला आहे.

श्रीलंकेचं वैशिष्ट्यं म्हणजे या देशात सर्वप्रकारचं हवामान आहे. तिथे उष्ण प्रदेश आहे, थंड प्रदेश आहेत आणि यामधलं हवामान असलेले प्रदेशदेखील आहेत.

या देशातील हवामान असं आहे की तिथे एका प्रकारचं हवामान असलेल्या प्रदेशातून दुसऱ्या प्रकारचं हवामान असलेल्या प्रदेशात फक्त दोन तासात जातं येतं.

निसर्गाचा वरदहस्त लाभलेल्या या बेटावर सौंदर्याची उधळण देखील वैविध्यपूर्ण आहे. तिथे समुद्र-समुद्रकिनारे आहेत, नद्या, पर्वत, सरोवरं, जंगलं आणि धबधबे आहेत.

वन्यजीव आणि प्राणीसंपदेच्या बाबतीतदेखील हा देश अतिशय समृद्ध आहे. श्रीलंकेत हत्ती, बिबट्या आणि इतर अनेक दुर्मिळ प्राण्यांचं वास्तव्य आहे.

अर्थात श्रीलंकेत पर्यटकांना फक्त निसर्गाचं सौंदर्यंच पाहायला मिळत नाही, तर तिथे भेट देण्यासाठी ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाची ठिकाणंदेखील आहेत. निसर्ग सौंदर्य आणि ऐतिहासिक ठिकाणं यामुळे श्रीलंका म्हणजे पर्यटकांसाठी दुहेरी पर्वणी ठरतो.

श्रीलंका हा भेट देण्यासाठीच्या अनेक उत्तम स्थळांचा एक संग्रहच आहे.

सिगिरिया

सिगिरियाचा समावेश युनेस्को जागतिक वारसा स्थळांमध्ये करण्यात आलेला आहे. ते श्रीलंकेतील मटाले जिल्ह्यात दांबुलाजवळ आहे.

सिगिरियाची रचना राजा कश्यप्पानं केल्याचं म्हटलं जातं. पाचव्या शतकात श्रीलंकेवर राजा कश्यप्पाचं राज्य होतं. हे ठिकाण सिंहाच्या आकाराच्या एक प्रचंड खडकावर आहे. तो एक किल्लाच आहे. तो एका 1,114 फूट उंच टेकडीवर आहे.

Getty Images

हा वैशिष्ट्यपूर्ण किल्ला पारंपारिक चित्रांनी सजलेला आहे. विशेषकरून मेणाचा वापर करून तयार करण्यात आलेली सुंदर चित्र सिगिरियावर आहेत. तिथे विविध महिलांची चित्रं आहे. ती पर्यटकांचं लक्ष वेधून घेतात.

या उंच टेकडीवर असलेल्या चित्रांवरून त्याचं महत्त्व दिसून येतं. श्रीलंकेतील प्रतिकांमध्ये सिगिरियाचं स्थान खूप महत्त्वाचं आहे. सिगिरियाचा किल्ला हा रावणाचाच किल्ला आहे, असं अजूनही काहीजणांना वाटतं.

रामायणाची कहाणी सांगणारी श्रीलंकेतील पर्यटन स्थळं

श्रीलंकेत अनेक पर्यटनस्थळं आहेत जी रामायणाचा वारसा सांगतात किंवा त्याचं प्रतिबिंब या स्थळांमध्ये उमटलेलं आहे.

राम आणि रावणाच्या नावाचा उल्लेख असलेले फलक, ठिकाणं या देशात अनेक ठिकाणी आढळतात. यात उत्तरेकडील प्रांत, पूर्वेकडील प्रांत आणि डोंगराळ प्रदेशाचा समावेश आहे. याच प्रदेशांमध्ये तामिळ लोक मोठ्या प्रमाणात वास्तव्यास आहेत.

नुवारा इलिया हे श्रीलंकेतील असंच एक महत्त्वाचं ठिकाण. रामायणानुसार नुवारा इलिया हेच अशोक वन किंवा अशोक वाटिकेचं ठिकाण मानलं जातं. रावणानं सीतेचं अपहरण केल्यानंतर याच ठिकाणी तिला बंदिवासात ठेवलं होतं, असं म्हटलं जातं.

BBC

नुवारा इलिया शहरातून बदुल्लाकडे जाणाऱ्या रस्त्यावर हे ठिकाण आहे. नुवारा इलिया शहरापासून साधारणपणे 5 किलोमीटर अंतरावर हा परिसर आहे.

रामायणानुसार, हनुमानानं सीतेला लपवून ठेवण्यात आलेल्या याच ठिकाणी भेट दिली होती. याच ठिकाणी हनुमानानं सीतेला पाहिलं होतं असं म्हटलं जातं.

हे जगातील एकमेव ठिकाण आहे जिथे सीतेचं मंदिर बांधण्यात आलं होतं. या मंदिराच्या अवतीभोवती अशोक वृक्ष दिसतात. अगदी आजदेखील तिथे एका अशोक वृक्षाची पूजा केली जाते. याच झाडाखाली सीता बसल्याचं सांगितलं जातं.

सीतेच्या मंदिराच्या जवळ असणाऱ्या एका खडकावर एक पावलाचा ठसा सापडला आहे. काहीजणांना वाटतं की हा हनुमानाच्याच पावलाचाच ठसा किंवा खूण आहे. तर काहींना वाटतं की तो रावणाच्या पावलाचा ठसा आहे.

Getty Images रावण बॉर्डर धबधबा

श्रीलंकेतील असंच एक ठिकाण आहे रावण बॉर्डर धबधबा. ते श्रीलंकेतील उवा प्रांतात आहे. रावण बॉर्डर हे ठिकाण बॉर्डर-वेल्लावाया मुख्य रस्त्याच्या दरम्यान आहे. ते मुख्य रस्त्यावरून पाहता येतं.

या धबधब्याचा संबंध थेट रामायणाशी असल्याचं सांगितलं जातं. असंही सांगितलं जातं की रावणानं सीतेचं अपहरण केल्यानंतर तिला याच धबधब्याच्या मागे असलेल्या गुहेत लपवून ठेवलं होतं. श्रीलंकेतील पर्यटन स्थळांमध्ये हा धबधबा हे खूप महत्त्वाचं ठिकाण आहे.

त्याचप्रमाणे, रावणाच्या जमिनीवरील किल्लादेखील इथंच आहे असं म्हटलं जातं.

थिरुकोनेश्वरम मंदिर हे आणखी एक महत्त्वाचं ठिकाण आहे. ते श्रीलंकेतील त्रिंकोमाली जिल्ह्यातील त्रिंकोमाली शहरात आहे. त्याचा थेट संबंध रामायणाशी असल्याचं म्हटलं जातं.

Getty Images थिरुकोनेश्वरम मंदिर

या मंदिराच्या तिन्ही बाजूंना समुद्र आहे, तर त्याच्या मध्यभागी एक प्रचंड पर्वत आहे. थिरुकोनेश्वरम मंदिर याच पर्वतावर आहे.

रावणानं श्रीलंकेवर राज्य केलं होतं. त्याचा या मंदिराशी थेट संबंध असल्याचं मानलं जातं.

रामायणातील रावणाचं पुष्पक विमान प्रसिद्ध आहे. या पुष्पक विमानाशी संबंधित देखील अतिशय महत्त्वाची पर्यटन स्थळं मानली जातात. पुष्पक विमानाचा वापर करून रावणानं सीतेचं अपहरण केलं होतं असं मानलं जातं. हे पुष्पक विमान जिथे उतरलं होतं, अशी ही काही ठिकाणं आहेत.

ही ठिकाणं विशेषतः टेकड्यांमध्ये आहेत. तसंच अशी ठिकाणं दक्षिण भागातदेखील आहेत.

श्रीलंकेच्या पर्यटन विभागाच्या आकडेवारीतून असं दिसतं की, श्रीलंकेवर राज्य केलेल्या शक्तीशाली रावणाची कहाणी सांगणाऱ्या 50 हून ठिकाणांचं जतन करण्यात आलं आहे.

चोल साम्राज्याच्या ऐतिहासिक खुणा

दक्षिण भारतातील अतिशय महत्त्वाच्या चोल साम्राज्याचा विस्तार श्रीलंकेतदेखील झालेला होता. श्रीलंकेतील चोल राजवटीच्या खुणा दाखवणारी ऐतिहासिक ठिकाणं आज श्रीलंकेतील महत्त्वाची पर्यटन स्थळं झाली आहेत. श्रीलंकेतील अनुराधापुरा आणि पोलोन्नरुवाच्या भागात चोल राजवटीच्या खुणा प्रामुख्यानं दिसून येतात.

विशेषकरून चोल राजांनी बांधलेली शिवमंदिर खूप महत्त्वाची ठिकाणं आहेत. त्याचप्रमाणे बौद्ध मंदिर आणि त्याच्याशी संबंधित वास्तू यांचं आजदेखील श्रीलंकेत महत्त्वाच्या खुणा म्हणून जतन केलं जातं.

श्रीलंकेत येणारे पर्यटक, चोल राजवटीशी जाणून घेण्यासाठी बऱ्याचवेळा पोलोन्नरुवा आणिअनुराधापुरा या ठिकाणांना भेट देतात.

Getty Images अनुराधापुरा

इतिहासानुसार चोलांनी श्रीलंकेवर आक्रमण करून अनुराधापुरा ताब्यात घेतलं होतं. नंतर त्यांनी पोलोन्नरुवाला त्यांच्या राजधानीचं ठिकाण केलं होतं. श्रीलंकेच्या पुरातत्व खात्याकडून अशा ऐतिहासिक पुराव्यांचं अजूनही जतन केलं जातं आहे आणि ती पर्यटकांसाठी आकर्षणाची ठिकाणं ठरत आहेत.

हे झालं ऐतिहासिक स्थळांबद्दल. मात्र श्रीलंकेत पर्यटन स्थळांचं मोठं वैविध्य आहे. या स्थळांव्यतिरिक्त श्रीलंकेच्या पर्यटन उद्योगात वन्यजीव आणि अभयारण्यंदेखील खूप महत्त्वाची आहेत.

पर्यटक सफारी वाहनांमधून अभयारण्यांमध्ये फेरफटका मारतात. ते हत्तींना अगदी जवळून पाहू शकतात. याशिवाय तिथे बिबट्याची दुर्मिळ प्रजातीदेखील पाहता येते. ते श्रीलंकेच्या जंगलांचं वैशिष्ट्यं आहे.

श्रीलंकेतील उत्तर, पूर्व आणि डोंगराळ प्रदेशात तामिळ लोकांची ओळख दाखवणारी अनेक पर्यटन स्थळं आहेत. श्रीलंकेतील तामिळ प्रदेशांच्या पलीकडेदेखील तामिळांच्या ऐतिहासिक खुणा दाखवणारी स्थळं आहेत. हे तिथलं एक वैशिष्ट्यं आहे.

श्रीलंकेत दहशतवादी हल्ले आणि कोरोनाच्या संकटाच्या काळात यासारख्या घटनांमुळे तिथला पर्यटन उद्योग जवळपास ठप्प झाला आहे. मात्र पुढील काही महिन्यांमध्ये या उद्योगाला पुन्हा चालना मिळण्याची अपेक्षा आहे.

आर्थिक संकटातून बाहेर पडून स्थिती पूर्ववत होण्यामध्ये श्रीलंकेतील पर्यटन उद्योगाची भूमिका आणि योगदान अतिशय महत्त्वाचं आणि मोठं आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)

  • पहलगाम हे भारताचं स्वित्झर्लंड म्हणून का ओळखलं जातं?
  • व्हिसा नाही? टेन्शन नाही; भारतीयांना फक्त पासपोर्टवर 'या' देशांमध्ये मिळणार खुला प्रवेश
  • आता व्हिसाविना दुबई प्रवास, भारतीय प्रवाशांसाठी खास सुविधा, जाणून घ्या प्रक्रिया
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.