बदललेलं अंगण अन् हरवलेले क्षण! पुण्यात शिरल्यावर लेखिकेला जाणवलेली पूर्वीच्या दिवाळीची ओढ
esakal October 16, 2025 09:45 PM

राधिका देशपांडे (रानी)

Maharashtrian festivals and travel : हलकंसं कोवळं ऊन पडायला लागलं आहे सगळीकडे. माझ्या आप्तेष्टांना फोन करून विचारलं, तर सबंध महाराष्ट्रात उन्हाची कोवळी तिरीप सकाळी स्पर्श करून जाते आहे आणि झुळझुळ वारा मनाचा ठाव घेऊन पुढे जातो आहे.

मुंबईहून पहाटे निघाले पुण्याकडे, तेव्हा लोह गोल आकाशात डौलतो आहे, असं वाटत होतं. कविकल्पना, दुसरं काय! सूर्याच्या तेजानं संपूर्ण मुंबई-पुणे महामार्ग तेजाळलेला होता. मी माझं आवडतं मोगरा आणि केवडा कार परफ्युम शिंपडलं. मॉलमध्ये चहा घेण्यासाठी थांबले तेव्हा पाहिलं, अनेक दुकानांत फराळ विकायला होता.

चकली, चिवडा, करंजी, शेव आणि लाडू असे अनेक चविष्ट पदार्थ. तेवढ्यात लाऊड स्पीकरवर रेडिओ जॉकीचा आवाज ऐकू आला...‘‘काय मग! कशी चालली आहे दिवाळीची खरेदी?’’. मी थोडी खरेदी केली आणि गाणी लावली. बोगद्यातून निघाले, तेवढ्यात फटाक्यांचा आवाज असतो तसा आवाज आला. माझ्या उजवीकडे रस्त्याचं काम सुरू होतं.

धूळ उडत होती आणि मी माझी गाडी त्या धुक्यातून प्रतिबंधित वेगात आकाशातल्या कंदिलाकडे बघत पुढे नेली. समोरच टोल नावाचं तोरण आलं, माझ्या गाडीची चाकं मंदावली, डोळ्यासमोर रांगोळी होती नेत्यांच्या चेहऱ्यांची. दिवे, रांगोळी, भगवा रंगाचं होर्डिंग झळकत होतें. वाटेत डावी, उजवीकडे जाहिराती होत्या, गृहप्रवेश करतानाचा फोटो दाखवत कोणी घर विकत होतं, तर एका ठिकाणी तरुण तुर्क मुलगा कोऱ्या करकरीत कारमध्ये बसलेला देखणा दिसत होता.

मी त्यांच्याकडे पाहत राहणं टाळलं- कारण ‘नजर हटी दुर्घटना घटी’. माझी गाडी पुढे सरकत होती, आशाताई गात होत्या... ‘केव्हा तरी पहाटे उलटून रात्र गेली...’ पण ब्लॅक अँड व्हाइट सिनेमा बघावा तसं माझं बालपण डोळ्यासमोर येऊन गेलं. पूर्वीसारखं काहीच राहिलं नाही, ना ते आंगण, ना ते एकत्र येणं, ना गप्पा मारत, पत्ते खेळत पडीक राहणं. रस्त्यांचे महामार्ग झाले, आणि महामार्गांवर पळत सुटणारे आपण झालो.

Diwali Travel Pune: दिवाळीच्या सुट्टीत फिरायला जायचंय? मग पुण्यातल्या 'या' सुंदर ठिकाणी जा आणि परदेशासारखा अनुभव घ्या!

मी गाडी हळू केली- कारण पुण्यात शिरले. सुगंधी, सौम्य दिवे, आरती आणि फुलासारखे फुललेले क्षण म्हणजे दिवाळी पहाट. आजकाल सगळे सण लवकर येतात असं वाटतं. गणपती येण्याअगोदर ढोलची प्रॅक्टिस, नवरात्र येण्याअगोदर गरबाचे क्लासेस. सगळं वाजत गाजत सुरू झालं आहे. ‘‘खूप काम आहे रे बाबा!’’ असा साखर विचार सांगून गेला आणि घरी पोहोचले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.