पुणे, ता. १७ ः दिवाळीचा पहिला दिवस असणाऱ्या वसुबारसनिमित्त घरोघरी गाय आणि वासराची पूजा करण्यात आली. यावर्षी रमा एकादशी आणि वसुबारस शुक्रवारी एकत्र आल्याने या दिवशी पहिला दिवा लावून दिवाळीच्या मंगल पर्वाला उत्साहात प्रारंभ झाला.
वसुबारसनिमित्त शुक्रवारी शहरात विविध ठिकाणी गाय-वासराच्या पूजनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. गोमातेच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी वसुबारसेच्या दिवशी गाय आणि तिच्या वासराची पूजा नागरिकांनी केली. नागरिकांनी विशेषतः महिलांनी घराजवळील गोठ्यांमध्ये गोमातेच्या दर्शन आणि पूजेसाठी गर्दी केली होती.
शालेय विद्यार्थ्यांना वसुबारस या सणाचे महत्त्व समजावे, या उद्देशाने विविध शाळांमध्ये वसुबारस व दीपोत्सव साजरा करण्यात आला. यानिमित्त वात्सल्याचे, उदारतेचे, समृद्धीचे प्रतीक असणारे गाय-वासरू शाळेत आणण्यात आले. विद्यार्थी, पालक, शिक्षक यांनी हौसेने गाय-वासराची पूजा केली. शाळेत मुलांनी रंगवलेल्या पणत्या लावून आकर्षक रांगोळी काढून दिवाळी साजरी करण्यात आली.
साईनाथ मंडळ ट्रस्टनेही वसुबारसनिमित्त गोमाता पूजनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गोपालकृष्ण, राधा यांच्या वेशभूषेतील चिमुकल्यांनी गाय आणि वासराचे पूजन केले. त्यांना आपल्या हाताने गूळ आणि बाजरी खायला घालत चिमुकल्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. याप्रसंगी ट्रस्टचे अध्यक्ष पियुष शाह, अमिता दाते, गुलशन काळे, गंधाली शाह आदी उपस्थित होते.