पिंपरी, ता. १७ ः पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्तपदाचा अतिरिक्त कारभार महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांच्याकडे आहे. नवीन आयुक्त कोण येणार? याची उत्सुकता अधिकारी, राजकीय व्यक्तींसह सामान्य नागरिकांनाही आहे. मात्र, पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महापालिका निवडणुकीनंतरच नवीन आयुक्त येणार, असे सूतोवाच दोन दिवसांपूर्वी केले आहे. त्यामुळे महापालिका निवडणूक हर्डीकर यांच्या कार्यकाळातच होणार, अशी सद्यःस्थिती आहे.
कोविड प्रतिबंधक नियम, तत्कालीन बदलती राजकीय परिस्थिती आणि इतर मागासवर्गीयांच्या आरक्षणाचे न्यायप्रविष्ट प्रकरण आदी कारणांमुळे महापालिका निवडणूक वेळेत होऊ शकली नाही. २०१७ मध्ये लोकनियुक्त पदाधिकाऱ्यांची मुदत १३ मार्च २०२२ रोजी संपली आहे. त्यामुळे १४ मार्च २०२२ पासून आयुक्तांच्याच हाती प्रशासकीय कारभार आहे. राजेश पाटील, शेखर सिंह यांनी प्रशासक म्हणून काम पाहिले आहे. सिंह यांच्या बदलीमुळे आणि नवीन आयुक्त नियुक्त न केल्याने महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक हर्डीकर यांच्याकडे महापालिकेचा अतिरिक्त कारभार सोपवला आहे. त्यांनीही महापालिका कामकाजाकडे लक्ष घातले असून, स्थायी समिती सभाही घेतली आहे. शिवाय, अजित पवार यांनी बुधवारी (ता. १५) रहाटणीत घेतलेल्या जनसंवाद सभेदरम्यान वार्तालाप करताना आयुक्त नियुक्तीबाबत ‘महापालिका निवडणुकीनंतरच’ असे विधान केले होते. त्यामुळे निवडणूक होईपर्यंत हर्डीकर यांच्याकडेच कारभार राहणार असल्याचे दिसत आहे.
निवडणुकीनंतर नियुक्ती का?
सध्या बिहार विधानसभा निवडणूक कार्यक्रम सुरू आहे. बहुतांश अधिकाऱ्यांची नियुक्ती बिहारच्या निवडणुकीसाठी केली आहे. शिवाय, महापालिका निवडणूकही ३१ जानेवारी २०२६ पूर्वी होणार आहे. शिवाय, सध्याचा श्रावण हर्डीकर यांनी सुमारे चार वर्ष महापालिका आयुक्तपदाचा कारभार पाहिला आहे. त्यांना शहराची माहिती आहे. त्यामुळे नवीन आयुक्तांची नियुक्त निवडणुकीनंतरच होऊ शकते, अशी चर्चा आहे.
अद्याप आचारसंहिता नाही
शहरी आणि ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अद्याप जाहीर झालेल्या नाही. मात्र, प्रभाग रचनेसह तयारी झाली आहे. महापालिकेपूर्वी जिल्हा परिषद, पंचायत समित्या यांच्या निवडणुका होतील. त्यांचीही अद्याप घोषणा नाही. त्यामुळे आचारसंहिता लागू होण्यापूर्वी सरकारकडून नवीन आयुक्तांची नियुक्त होऊ शकते, अशी चर्चा महापालिका व राजकीय वर्तुळात आहे.