निरगुडसर, ता. १९ : दिवाळी सुट्टी म्हटली की लहान मुलांचा आनंद गगनात मावत नाही. सुट्टी कधी सुरू होईल आणि मनसोक्त बागडायला कधी मिळेल याची वाट पाहत असतात; परंतु बिबट्याची संख्या वाढल्याने चिमुकल्यांच्या बाहेर फिरण्यांवर बंधन आले आहे, परंतु बिबट्यांनो मनसोक्त फिरा आणि लहान चिमुकल्यांनो घरात बंदिस्त व्हा, असाच संदेश एक प्रकारे बिबट प्रवणक्षेत्रात मिळत आहे. त्यामुळे सरकारला नक्की माणूस हवा आहे की बिबट्या, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
शिरूर तालुक्यातील पिंपरखेड आणि जुन्नर तालुक्यातील कुमशेत या दोन घटनेत बिबट्याने हल्ला करून चिमुकल्यांचा जीव घेतला यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. जुन्नर वनविभागात बिबट्यांची संख्या वाढल्याने जुन्नर वनविभागाकडून दक्षता म्हणून काही नियमावली दिल्या आहेत, याबाबत संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे. दिवाळीची सुट्टी लागली आहे आता मुलांनो बाहेर फिरू नका, ऊसशेती असेल तर ओट्यावर सुद्धा बसू नका,आई वडिलांसोबत शेतात जाऊ नका यामुळे मुलांनी करायचं तरी काय? मातीचे किल्ले काय घरात बनवायचे का?असा सवाल उपस्थित होत आहे. बिबट मादीला वर्षातून पाच ते सहा पिल्ले होतात आणि एक/दीड वर्षात शिकारी साठी देखील तयार होतात या वाढत्या संख्येमुळे कुत्र्यांपेक्षा बिबटे अधिक झाले आहे. त्यामुळे बिबट्या हवाय की माणूस, हे सरकारने स्पष्ट करावे.
निर्णय कधी, माणूस मेल्यावर?
मुख्यतः बिबट्या हा उसामधीलच प्राणी आहे, त्याला भक्ष आणि पाणी जवळच मिळू लागल्याने बिबट्याचे आश्रयस्थान ऊसशेती बनली आहे. वाढत्या बिबट संख्येमुळे मनुष्य जीव मुठीत धरून जगत आहे; पण वाढत्या बिबट संख्येवर नियंत्रण आणणे गरजेचे आहे हे का कळत नाही, केंद्र सरकारला प्रस्ताव पाठवला, राज्य सरकारला पाठवला अहो कधी निर्णय होणार माणूस मेल्यावर?
दूध, पिकांना हमीभाव द्या मग...
ऊसशेतीमुळे बिबट्यांची संख्या वाढली असे बोलले जातंय पण ही ऊसशेती वाढली हा काय शेतकऱ्यांचा दोष आहे का0 हे एकमेव पीक आहे की त्या पिकाला हमीभाव मिळतो दोन पैसे शेतकऱ्यांच्या हातात शिल्लक तरी राहतात. ऊस सोडून दूध, कांदा आदी तरकारी पिकांना हमीभाव आहे का? अनेक वेळा मजुरीही हाती उरत नाही,कर्ज काढून भांडवली खर्च भागवावा लागतो,तरकारी पिकांना हमीभाव द्या आजही शेतकरी ऊस पिकावर नांगर फिरवायला तयार आहे.
बिबट्याला मुक्त फिरू द्या आणि लहान मुलांना घरात कोंडून ठेवा हा निर्णय जनतेच्या सुरक्षेशी खेळणारा आणि अमानुष आहे. या निर्णयाचा तीव्र निषेध करत आहे.वनविभागाचे काम म्हणजे नागरिकांचे संरक्षण आणि वन्यजीवांचा तोल राखणे, पण येथे नागरिकांनाच घरात कोंडून ठेवण्याचे आदेश दिले जात आहेत. ग्रामीण भागातील जनतेला दररोज शेतात कामे, जनावरांची काळजी, मुलांच्या शिक्षणासाठी बाहेर पडावे लागते. अशा परिस्थितीत बिबट्यांना मोकळे सोडून जनतेला भीतीत जगायला लावणे हा प्रशासनाचा गंभीर निष्काळजीपणा आहे. वनविभागाने तत्काळ बिबट्यांचा बंदोबस्त करावा, पिंजरे लावावेत, आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी ठोस उपाययोजना कराव्यात.
- भाऊसाहेब वळसे पाटील ग्रामपंचायत सदस्य, निरगुडसर (ता.आंबेगाव)