Mokhada ST Bus : ऐण सणात भंगारात निघालेल्या बस प्रवाशांच्या सेवेला, जव्हार आगाराचा गलथान कारभार, प्रवासी त्रस्त
esakal October 20, 2025 12:45 PM

मोखाडा : जव्हार आगाराच्या बहुतांश एस टी बस ची दुरावस्था झाली आहे. अनेक बस गळक्या, खिडकीच्या तुटलेल्या काचा, मोडलेली आसन व्यवस्था, तुटलेले पत्र्यामुळे या गाड्या भंगारात निघाल्या आहेत. त्याच अवस्थेत या गाड्या ग्रामीण भागातील विद्यार्थी व प्रवाशांच्या सेवेसाठी रस्त्यावर धावत आहे. त्यामुळे विद्यार्थी व प्रवासी त्रस्त झाले आहेत. ऐण दिवाळी सणात प्रवाशांमध्ये असंतोष निर्माण झाला असून त्यांनी एस टी बसच्या प्रवासाकडे पाठ फिरवली आहे.

जव्हार एसटी आगारात 56 बस आहेत. यामध्ये नव्याने काही बस दाखल झाल्या आहेत. बहुतांश बस ची डागडुजी न केल्याने त्यांची अवस्था दयनीय झाली आहे. अनेक बसचे पत्रे तुटलेले आहेत. बसला गळती लागली आहे, खिडक्यांच्या काचा तुटलेल्या आहेत, गाडीतील सीट तुटल्याने या गाड्या भंगारात निघाल्या आहेत. त्याच अवस्थेत प्रवाशांना ऊभ्याने प्रवास करावा लागतो आहे. यामध्ये बहुतांश बस या " मानव विकास कार्यक्रमांतर्गत" विद्यार्थी वाहतुकीस रस्त्यावर धावत आहेत. अशा भंगारात निघालेल्या बस मधुन विद्यार्थी आणि प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो आहे.

Satara Crime: 'साताऱ्यात दोन टोळ्यांत राडा; ४० जणांवर गुन्हे'; जुन्या भांडणाच्या वादातून प्रकार; कोयते, दांडकी नाचवत पसरवली दहशत

जव्हारहुन संध्याकाळी चार वाजता मोखाडा तालुक्यातील केवनाळा या अतिदुर्गम गावा कडे जाणारी बस विद्यार्थी व प्रवाशांसाठी अति महत्त्वाची आहे. ग्रामीण भागाच्या गाव खेड्यातून तालुक्यासाठी विविध कामांकरिता आलेले परतीचा प्रवास या बस फेरीने करतात. यात विद्यार्थी, वृद्ध, रुग्ण, महिला व शासकीय चाकरमानी प्रवासी असतात. मात्र, जव्हार बस आगारातुन भंगारात निघालेली एमएच 20 बीएल 3503 या क्रमांकाची बस शुक्रवारी 17 ऑक्टोबर ऐण सणासुदीत प्रवाशांच्या सेवेसाठी पाठवल्याने, प्रवाशांमध्ये प्रचंड संताप आहे. दिवाळी सणात अशा बस व्यवस्थापनाकडून पाठवल्या जात असल्याने, प्रवाशांची मोठी कुचंबना होत असुन त्यांनी संताप व्यक्त केला आहे. या बाबत जव्हार आगाराशी संपर्क साधला असता कोणीही प्रतिसाद दिला नाही.

दरम्यान या बस मध्ये प्रवास करणारे ज्येष्ठ नागरिक देवराम कामडी यांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली असून ग्रामीण भागातील विद्यार्थी व प्रवासासाठी अशी बस पाठवून आदिवासी नागरिकांना तुच्छ समजून प्रवास करण्यास भाग पाडत आहेत ? इतर शहरी लांब पल्ल्याच्या प्रवाशांसाठी लक्झरी व सुसज्ज बसची सोयीसुविधा देत आहे ? भाडे आकारणी मात्र त्यांच्या आणि आमच्या मध्ये सारखी असताना, आम्हाला मोडकळीस बसमधून प्रवास का ? असा सवाल त्यांनी एसटी महामंडळ प्रशासनास केला आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.