पिंपरी, ता. १९ ः ‘‘चित्रपट, नाटक, मालिका या तीनही क्षेत्रांत काम करायला आवडते. आजपर्यंतच्या प्रवासात सर्व क्षेत्रांत काम केले आहे. मात्र, नाटक अधिक जवळचे आहे. नाटकाला मोठी लाइफ (भवितव्य) आहे. वीस वर्षांपूर्वी नाटक पाहिलेला प्रेक्षक आजही भेटल्यानंतर त्या नाटकाची आठवण सांगतो, त्यावेळच्या कलाकृतीचे कौतुक करतो, ही खूप मोठी बाब आहे,’’ अशी भावना ‘तुझे आहे तुजपाशी’ नाटकातील ज्येष्ठ रंगकर्मी डॉ. गिरीश ओक यांनी व्यक्त केली.
‘सकाळ माध्यम समूहा’तर्फे आयोजित ‘सकाळ’ नाट्य महोत्सवात ‘तुझे आहे तुजपाशी’ या नाटकाचा प्रयोग गुरुवारी (ता. २३) चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात रात्री नऊ वाजता आयोजित केला आहे. या पार्श्वभूमीवर डॉ. ओक यांनी रविवारी (ता. १९) ‘सकाळ’च्या पिंपरी कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी ‘तुझे आहे तुजपाशी’ नाटकासह त्यांच्या अभिनय क्षेत्रातील जीवनप्रवास उलगडला. नाटकाचे निर्माते तथा अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे उपाध्यक्ष आणि पिंपरी-चिंचवड शाखाध्यक्ष भाऊसाहेब भोईर, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे प्रमुख कार्यवाह सुहास जोशी, कोषाध्यक्ष राजेंद्र बंग उपस्थित होते. डॉ. ओक म्हणाले, ‘‘आपल्या मुलांना काय हवे आहे, त्यांना काय जमू शकते, हे पालकांना समजायला हवे. यासाठी आई-वडिलांचे शिबिर घेणे गरजेचे आहे. ज्यात आवड आहे. तेच शिक्षण, प्रशिक्षण घेतल्यास थकवा येत नाही. कसलाही कंटाळा येणार नाही. आता मी डॉक्टर आहे. पण माझे मन तिकडे कधीही रमले नाही. दोन क्लिनिक उघडले मात्र, त्या क्षेत्रात कधीच रमलो नाही, यासाठी आपल्या आवडीचे क्षेत्र निवडणे महत्त्वाचे आहे. आवडीच्या क्षेत्राकडे फोकस केल्यास यश निश्चित मिळते.’’
नवीन पिढी खूप हुशार
सध्या नवीन पिढीचा संयम कमी झाला आहे. तीन तासांचे नाटक पाहणे ही खूप मोठी गोष्ट आहे. म्हणूनच आता छोटे एपिसोड आलेले आहेत. नवीन पिढी हुशार आहे. त्यांच्या अंगी कला आहे. त्यांच्यापुढे व्हिजन आहे. मात्र, कशाला प्राधान्य द्यायचे, कशाची अंमलबजावणी करायची हे त्यांनी ठरवायला हवे. मुलांना स्वावलंबी बनविणे आवश्यक आहे.’’ मी लिहिलेले एक बालनाटक लवकरच येत असून हा माझा लेखक म्हणून पहिलाच प्रयत्न असल्याचेही त्यांनी नमूद केले.
नाट्यगृहांची अवस्था वाईट
सध्या काही मोजके थिएटर (नाट्यगृह) सोडले तर बहुतांश ठिकाणचे थिएटर केवळ नावालाच उभारली आहेत. नाटकातील कलाकार आणि तंत्रज्ञ व सहाय्यकांची खूप मोठी गैरसोय होते. सर्व सुविधांयुक्त असे योग्य थिएटर उभे राहण्यासाठी नाट्य परिषदेची मान्यता हवी, असा नियमच असायला हवा, असे डॉ. गिरीश ओक यांनी स्पष्टपणे सांगितले.
‘‘शहरात काही वर्षांपूर्वी मी पहिला दिवाळी पहाटचा कार्यक्रम घेतला होता. त्या कार्यक्रमास अल्पप्रतिसाद मिळाला होता. नंतर हळूहळू मोठमोठे कार्यक्रम होत गेले. आज शहरातील गल्लीबोळात दिवाळी पहाटचे भव्य कार्यक्रम होत असून या कार्यक्रमांना मोठा प्रतिसाद मिळत आहे. शहरात ही संस्कृतिक चळवळ उभी करण्यात माझा मोठा वाटा आहे. याचा आनंद वाटतो. मला कलाकार होता आले नाही म्हणून नाट्य निर्माता झालो. रंगभूमीवरील खूप दिग्गज कलाकारांसमवेत राहिलो आहे. त्यांच्याकडून खूप काही शिकायला मिळाले. हे माझे भाग्य आहे.
- भाऊसाहेब भोईर, नाट्य निर्माते तथा उपाध्यक्ष, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद