वडगाव मावळ, ता. १९ : वडगाव नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यावर दाखल होणारे हरकतींचे अर्ज परिपूर्ण नसल्यास, तसेच रहिवासी पुरावे सादर केले नसल्यास असे अर्ज विनाकार्यवाही निकाली काढण्यात येणार आहेत.
याबाबतची माहिती नगर पंचायतीचे मुख्याधिकारी डॉ. प्रवीण निकम यांनी दिली. ‘‘वडगाव नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. वडगाव शहरातील बऱ्याच प्रमाणात तक्रारकर्ते हे नमुना ‘अ’ व ‘ब’ मध्ये हरकत अर्ज या कार्यालयाकडे सादर करत आहेत. या अर्जाची प्राथमिक पाहणी केली असता अर्जासोबत हरकतीसंदर्भात रहिवासी पुरावे सादर केले नसल्याचे दिसून येत आहे. हरकत अर्ज सादर करताना ते परिपूर्ण माहितीसह व सोबत रहिवासीचे पुरावे सादर करणे गरजेचे आहे. त्यामुळे त्या अर्जावर योग्य ती कार्यवाही करणे शक्य होईल,’’ असे डॉ. निकम यांनी सांगितले.