वैभव सूर्यवंशी याने गेल्या काही महिन्यात सातत्याने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. वैभवने वयाच्या अवघ्या 14 व्या वर्षी विस्फोटक शतक केलं. वैभवने आयपीएल स्पर्धेत सर्वात वेगवान शतक करणारा भारतीय हा बहुमान मिळवला. त्यानंतर वैभवने मागे वळून पाहिलं नाही. वैभवने अंडर 19 टीम इंडियासाठीही चाबूक कामगिरी केली. विशेष म्हणजे वैभवला रणजी ट्रॉफी 2025 स्पर्धेत बिहार संघाच्या उपकर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यानंतर लवकरच वैभव सूर्यवंशी आता अफगाणिस्तान विरुद्ध 2 हात करताना दिसणार आहे.
अफगाणिस्तानचा 19 वर्षांखालील संघ लवकरच भारत दौऱ्यावर येणार आहे. अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने या दौऱ्याचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. अफगाणिस्तान अंडर 19 संघ भारत दौऱ्यात इंडिया ए आणि इंडिया बी विरुद्ध एकूण 4 सामने खेळणार आहे. या यूथ वनडे ट्राय सीरिजमध्ये वैभव सूर्यवंशी, आयुष म्हात्रे आणि इतर स्टार खेळाडू खेळताना दिसणार आहेत. अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने या वनडे ट्राय सीरिजचं वेळापत्रक जाहीर केलं आहे.
अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने दिलेल्या माहितीनुसार, या ट्राय सीरिजमध्ये 3 संघात एकूण 7 सामने होणार आहेत. सर्व सामने हे बंगळुरुतील सीओईमध्ये पार पडणार आहेत. मालिकेचं आयोजन हे 17 ते 30 नोव्हेंबर दरम्यान करण्यात आलं आहे.
ही ट्राय सीरिज राउंड रॉबिन फॉर्मेटने होणार आहे. या मालिकेतील प्रत्येक संघाला 4 सामने खेळण्याची संधी मिळणार आहे. सर्वाधिक सामने जिंकणारे 2 संघ अंतिम फेरीत पोहचतील. अफगाणिस्तान व्यतिरिक्त या मालिकेत भारताचे 2 संघही या स्पर्धेत खेळणार असल्याने चाहत्यांना चांगलीच चुरस पाहायला मिळणार आहे.
पहिला सामना, 17 नोव्हेंबर, इंडिया ए विरुद्ध इंडिया बी
दुसरा सामना, 19 नोव्हेंबर, अफगाणिस्तान विरुद्ध इंडिया बी
तिसरा सामना, 21 नोव्हेंबर, अफगाणिस्तान विरुद्ध इंडिया ए
चौथा सामना, 23 नोव्हेंबर, इंडिया ए विरुद्ध इंडिया बी
पाचवा सामना, 25 नोव्हेंबर, अफगाणिस्तान विरुद्ध इंडिया बी
सहावा सामना, 27 नोव्हेंबर, अफगाणिस्तान विरुद्ध इंडिया ए
अंतिम सामना, 30 नोव्हेंबर
U19 अफगाणिस्तान भारत दौऱ्यासाठी सज्ज
दरम्यान या ट्राय सीरिजमधील एकूण 7 सामने हे एकाच ठिकाणी होणार आहे. बंगळुरुतील सीओइमध्ये हे सामने होणार आहेत.त्यामुळे खेळाडूंचा प्रवासाचा वेळ आणि त्रास वाचणार आहे. या ट्राय सीरिजमधील तिन्ही युवा संघ कशी कामगिरी करतात? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.