वुमन्स वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील 20वा सामना इंग्लंड आणि भारत यांच्यात पार पडला. या सामन्यात खरं तर भारताची बाजू भक्कम होती. भारत हा सामना सहज जिंकेल अशी स्थिती होती. मात्र स्मृती मंधानाची विकेट पडली आणि या सामन्याचं चित्र पालटलं. त्यात मधल्या फळीतील फलंदाज काही खास करू शकले नाहीत. त्यामुळे क्रीडाप्रेमींना जेमिमा रॉड्रिग्सची आठवण आली. या सामन्यात प्लेइंग 11 मध्ये बदल करण्यात आला होता जेमिमा रॉड्रिग्स ऐवजी रेणुका सिंह ठाकुरला संधी देण्यात आली. अचानक केलेल्या बदलामुळे मधली फळी कमकुवत झाल्याची आता चर्चा होत आहे. पण महत्त्वाच्या सामन्यात जेमिमाला आराम देण्याचं कारण काय? या प्रश्नावर उपकर्णधार स्मृती मंधानाने उत्तर दिलं आहे. सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत तिने याबाबतचा खुलासा केला.
स्मृती मंधानाने सांगितलं की, ‘मागच्या दोन सामन्यात आम्ही निश्चितपणे खूप विचार केला होता. पाच गोलंदाजांचे पर्याय या सामन्यासाठी खूप नाहीत. खासकरून इंदुरसारख्या पाटा विकेटवर.. यासाठी आम्ही विचार केला की पाच गोलंदाजांसह मैदानात उतरणं आमच्यासाठी नुकसानीचं असेल.’ त्यानंतर जेमिमाबाबत सांगितलं की, ‘जेमी सारख्या खेळाडूला बाहेर बसवणं एक कठीण निर्णय होता. पण कधी कधी सामन्यात बॅलन्स करण्यासाठी तुम्हाला असे निर्णय घेणं भाग पडतं. असं नाही की आम्ही पुढेही असंच करू. आम्ही परिस्थितीचं आकलन करून निर्णय घेऊ.’ आता न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात भारताची प्लेइंग 11 कशी असेल याबाबत उत्सुकता आहे. जेमिमाला डावलणार की आणखी बदल हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
भारताला अजूनही उपांत्य फेरीची संधी आहे. पण उर्वरित दोन्ही सामन्यात काहीही करून विजय मिळवावा लागणार आहे. खासकरून न्यूझीलंडविरुद्धचा सामना काहीही करून जिंकावाच लागणार आहे. या सामन्यावर भारताचं गणित अवलंबून आहे. हा सामना 23 ऑक्टोबरला होणार आहे. भारताचा शेवटचा सामना बांगलादेशसोबत होईल. हा सामना 26 ऑक्टोबरला होईल. भारताने या दोन्ही सामन्यात विजय मिळवला तर उपांत्य फेरीचं तिकीटं पक्क होईल.