जस्टिन टिंबरलेक आणि जस्टिन बीबर. दोघेही किशोरवयातच पॉप संगीताच्या क्षेत्रात जगप्रसिद्ध झाले.
पण जस्टिन या नावाव्यतिरिक्त दोघांमध्ये आणखी एक साम्य आहे— दोघेही अनेक वर्ष लाइम रोगाच्या दुष्परिणामांनी त्रस्त आहेत.
जुलै महिन्यात जस्टिन टिंबरलेकने त्याला या आजाराचे जे दीर्घकालीन परिणाम जाणवले, त्याविषयी सोशल मीडियावर पोस्ट केलं होतं. पाच वर्षांपूर्वी जस्टिन बीबरनेही तशी पोस्ट केली होती. त्यानंतर अमेरिकेत या आजाराचे अनेक नवीन रुग्ण समोर आले.
लाइम डिसिज किंवा लाइम आजार हा एक जीवाणूजन्य संसर्ग आहे. आणि वैज्ञानिकांना अजूनही त्याविषयी पूर्णपणे माहिती मिळालेली नाही.
हा आजार टिक (Tick) म्हणजे एक प्रकारची गोचिड चावल्यामुळे होतो.
तुम्ही पाळीव प्राण्यांना सांभाळलं असेल किंवा जवळून पहिलं असेल, तर त्यांच्या अंगाला लागणाऱ्या गोचिडविषयी तुम्हाला माहिती असेल. तर गोचिडच्या अनेक प्रजातींपैकी काही मोजक्या प्रजातींमुळेच हा आजार होतो आणि भारतातही त्याचा प्राद्रुभाव होत असल्याचं दिसून आलं आहे.
अलीकडेच हिमाचल प्रदेशात लाइम डिसीजचे रुग्ण आढळून आले. भारतात आजवर किमान पंधरा राज्यांत या आजाराचं अस्तित्व आढळून आलं आहे.
अलीकडच्या काळात जगभरात या आजाराचा प्रसार का वाढलवा आहे आणि इतक्या मोठ्या प्रमाणावर लोक लाइम रोगाचे बळी का ठरत आहेत?
लाइम रोगाची लक्षणंडॉ. सॅली मेविन स्कॉटलंडच्या रॅगमोर हॉस्पिटलमध्ये शास्त्रज्ञ आहेत आणि गोचिड चावल्यानं होणाऱ्या आजारांच्या विशेषज्ञ आहेत.
त्या सांगतात, की जस्टिन टिंबरलेकच्या घोषणेनंतर लाइम डिसीजविषयी पुन्हा चर्चा होते आहे.
"एखादी प्रसिद्ध व्यक्ती लाइम रोगाबद्दल बोलते, तेव्हा आमच्या लॅबमध्ये तपासणीसाठी येणाऱ्या नमुन्यांची संख्या वाढते आणि गुगलवर लाइम रोगाबद्दल माहिती शोधणाऱ्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढते."
गोचिडसारख्या कीटकांचा दंश होणं, ही नवी गोष्ट नाही. पण त्यातून होणाऱ्या आजाराविषयी आधी फारशी माहिती नव्हती.
1970 च्या दशकात अमेरिकेतील कनेक्टिकट राज्यातल्या ओल्ड लाइम शहरात अनेक मुलांमध्ये सांधेदुखी आर्थरायटिसची लक्षणं दिसून आली.
आजारी पडलेल्या सर्व मुलांना गोचिड चावली होती आणि त्यानंतर त्यांच्या शरीरावर गोलाकार पुरळ दिसू लागलं, असं सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अर्थात सीडीसी या संस्थेनं केलेल्या तपासात आढळून आलं.
आजाराचा गोचिडीशी संबंध जोडला गेला, पण आजार नेमका कसा होतो, याचं कारण तेव्हा स्पष्ट नव्हतं.
मग काही वर्षांनी लाइम रोग निर्माण करणाऱ्या गोलाकार जीवाणूची ओळख पटली. त्याला बोरेलिया बर्गदोर्फेरी (Borrelia burgdorferi) असं नाव ठेवण्यात आले. काही विशिष्ठ प्रजातींच्या गोचिडीच्या चाव्यातून हा विषाणू माणसात पोहोचतो, असंही स्पष्ट झालं.
जगात गोचिडीच्या 900 पेक्षा अधिक प्रजाती आहेत, पण त्यापैकी फक्त 4 प्रजातींमध्ये लाइम रोग पसरवणारा जीवाणू आढळतो.
"गोचिड किंवा टिक हा परजीवी प्राणी दुसऱ्या जीवांचे रक्त पिऊन जगतो. त्यांचं जीवनचक्र चार टप्प्यांचं असतं : अंड्यांपासून लार्वा, लार्वामधून गोचिड, आणि मग प्रौढ अवस्था. प्रौढ मादी गोचिड रक्त मिळाल्यावर अंडी घालते. प्रत्येक टप्प्यात गोचिडींना भरपूर रक्ताची गरज असते," अशी माहिती डॉ. मेविन देतात.
गोचिड गुरेढोरे, पक्षी, डुकरं आणि इतर प्राण्यांच्या रक्तावर जगते. मानवी रक्त हा काही गोचिडीचा नैसर्गिक आहार नाही.
पण जर गोचिडीनं एखाद्या रोगानं संक्रमित प्राण्याचे रक्त प्यायले असेल, तर ती स्वतः संक्रमित होते आणि त्यानंतर जेव्हा माणसाला चावते, तेव्हा त्यातून ते जीवाणू दुसरीकडे पसरतात.
डॉ. मेविन माहिती देतात, "एखादी गोचिड माणसाच्या शरीरावर चढल्यावर अशा रक्तवाहिनीजवळ जाते जिथून सहज रक्त शोषता येईल.
"गोचिड चावते, म्हणजे तिची सोंड शरीरात शिरते, तेव्हा त्यातून तिची लाळ बाहेर पडते ज्यात वेदनाशामक गुण असतात. त्यामुळे वेदना जाणवत नाहीत आणि गोचिड चावल्याचे अनेकदा कळतही नाही. गोचिडीच्या लाळेतल्या रसायनामुळे हे रक्त गोठत नाही."
संक्रमित गोचिडीच्या चाव्यातून Lyme रोगाचे जीवाणू माणसातही पसरू शकतात. पण सुरुवातीला या रोगाची लक्षणे लगेच दिसून येत नाहीत, अशी माहिती डॉ. मेविन देतात.
रक्ताद्वारे हा जीवाणू शरीराच्या इतर भागांमध्ये पसरतो. त्यानंतर सांधेदुखी किंवा ताप सुरू होतो. जिथे गोचिड चावली असेल तिथे गोलाकार पुरळ दिसू लागते.
लाइम रोगाची अनेक लक्षणे इतर आजारांसारखी असतात—जसे की मज्जातंतूंमध्ये तणाव, चेहऱ्यावर लकवा, किंवा मेंदूज्वर, तीव्र डोकेदुखी.
हा जीवाणू शरीरात अनेक वर्षे जिवंत राहू शकतो आणि हृदयावरही परिणाम करू शकतो.
यापासून बचावाचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे गोचिड त्वरीत शरीरापासून काढून टाकणे. एखाद्या हूक किंवा चिमट्याच्या मदतीने गोचिड सहज काढता येते.
उष्णकटिबंधीय प्रदेशात गोचिड मोठ्या प्रमाणात आढळून येतात. पण अलीकडच्या काळात त्यांचा प्रादुर्भाव वाढला आहे. सोबतच लाइम रोगाचा संसर्गही वाढला आहे.
डॉ. सॅली मेविन सांगतात की आजकाल लाइम रोग उत्तर ध्रुवाजवळील अनेक देशांमध्येही पसरतोय. अमेरिका आणि यूकेमध्ये हा एक सामान्य आजार झाला आहे.
सीडीसीच्या मते 2023 मध्ये अमेरिकेत लाइम रोगाची 23,000 प्रकरणं नोंदवली गेले, पण प्रत्यक्षात ही संख्या सुमारे 4.5 लाख असू शकते.
युरोपतल्या 20 देशांमध्ये वर्षाला सुमारे 1.25 लाख प्रकरणं समोर येत आहेत. तर भारतासह आशियातही हा आजार वेगानं पसरत आहे.
उपचारातील अडचणीडॉ. आर्मिन अलेदिनी हे गोचिडमुळे होणाऱ्या आजारांवर संशोधन करणाऱ्या संस्थेचे म्हणजे ग्लोबल लाइम अलायन्सचे मुख्य वैज्ञानिक अधिकारी आहेत.
ते माहिती देतात की लाइम रोगाच्या रुग्णाला तोंडावाटे अँटीबायोटिक औषधं देऊन उपचार केला जातो.
"औषधांमुळे लक्षणे नाहीशी होतात किंवा फार काळ टिकत नाहीत. पण अँटीबायोटिक औषधे फक्त लाइम रोगाचे जीवाणू नष्ट करत नाहीत, तर आपल्या पोटात असणारे काही उपयुक्त जीवाणूही नष्ट करतात. दीर्घकाळ यांचा वापर केल्यास आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो."
गोचिड चावल्याचं निदान करणंही अनेकदा कठीण जातं, कारण एकतर हा कीटक फार छोटा असतो. तसंच त्याच्या लाळेतील रसायनामुळे अनेकांना टिकबाईट म्हणजे गोचिडदंश झाल्याचं कळतही नाही.
"असा रुग्ण डॉक्टरकडे जातो, तेव्हा गोचिड चावल्याचं अनेकदा सांगू शकत नाही.
"त्यामुळे डॉक्टरांचं लक्षही लाइम रोगाच्या तपासणीकडे जात नाही. कारण लाइम रोगाची सुरुवातीची लक्षणे फ्लू सारखी असतात. त्यामुळे डॉक्टरांना वाटतं की रुग्णाला फ्लू झाला आहे."
लाइम रोगाची तपासणी ही एक सेरॉलॉजी टेस्ट म्हणजे रक्ततपासणी आहे. ती खूप गुंतागुंतीची असतो आणि दोन टप्प्यांमध्ये केली जाते.
पहिल्या टप्प्यात रक्तात लाइम रोगाच्या अँटीजेन ची बोरेलिया जीवाणूची उपस्थिती शोधली जाते.
टेस्टच्या दुसऱ्या टप्प्यात या अँटीजेनशी लढणाऱ्या antibodies ची उपस्थिती तपासली जाते. पण अनेकदा या टेस्टद्वारेही वेळेवर लाइम रोगाचे निदान होत नाही.
डॉ. आर्मिन अलेदिनी पुढे सांगतात, "शरीरात अँटीबॉडी तयार होण्याआधी टेस्ट केली, तर ती फॉल्स निगेटिव्ह येते. म्हणजेच गोचिड चावल्यावर लगेच तपासणी केली, तर लाइम रोगाचे निदान होत नाही कारण त्या वेळी शरीरात अँटीबॉडी तयार झालेल्या नसतात.
"शरिरावर पुरळ दिसलं किंवा काही काळानं पुन्हा टेस्ट केली, तरच या रोगाचे निदान होते.
"लाइम रोगाचे निदान करण्याच्या पद्धतींमध्ये अजूनही त्रुटी आहेत. मेडिकल कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना या रोगाबद्दल अधिक माहिती देणं गरजेचं आहे.
"कारण हवामान बदलासह अनेक कारणांमुळे लाइम रोग आता अशा भागांमध्येही पसरत आहे जिथे पूर्वी तो आढळत नव्हता."
गोचिडपासून बचावडॉ. गाबोर फोल्डवारी हे हंगेरीची राजधानी बुडापेस्ट शहरातील इन्स्टिट्यूट ऑफ इव्होल्युशनच्या सेंटर फॉर इकॉलॉजिकल रिसर्च चे ग्रुप लीडर आहेत.
त्यांच्या मते गोचिडीचा प्रादुर्भाव होण्यात हवामान बदलाची भूमिका काय आहे याचं नेमकं उत्तर देता येत नाही, पण उपलब्ध डेटानुसार काही अंदाज नक्कीच लावता येतो.
डॉ. गाबोर फोल्डवारी सांगतात, "हवामान बदलामुळे ज्या भागांत गोचिड वाढीसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होते, तिथे हा प्राणी वेगाने पसरतो आहे."
ते पुढे सांगतात, "उदाहरणार्थ, स्कॅन्डिनेव्हियन देशांमध्ये पूर्वी खूप थंडी पडायची, पण गेल्या 20–30 वर्षांपासून हवामानात बदल झाल्यामुळे थंडी कमी झाली आहे आणि उष्णता वाढली आहे, जी गोचिडच्या प्रादुर्भावासाठी अतिशय अनुकूल आहे."
"आमच्या माहितीनुसार नॉर्वेच्या ध्रुवीय भागात दोन–तीन वर्षांपूर्वीपर्यंत गोचिड आढळत नसे. पण आता तिथे Borrelia जीवाणू पसरवणाऱ्या गोचिडी वाढू लागल्या आहेत.
"स्लोव्हाकियाच्या टेट्रा पर्वतरांगांमध्ये 20–30 वर्षांपूर्वी फक्त खालच्या भागांमध्ये गोचिड आढळायची, पण आता हळूहळू 1200 मीटर उंचीवरसुद्धा गोचिड दिसू लागल्या आहेत."
लाइम रोगाच्या प्रसारामध्ये हवामान बदलाची भूमिका नेमकी किती आहे हे अजून स्पष्ट नाही. पण गोचिड एका भागातून दुसरीकडे जाण्यासाठी इतर प्राण्यांवर अवलंबून असते, हे लक्षात घ्यायला हवं.
"गोचिड हा फार संथ चालणारा कीटक आहे, तरीही तो दूरच्या भागांपर्यंत पोहोचू शकतो. उदाहरणार्थ, जर गोचिड पक्ष्यावर चढली तर शेकडो किलोमीटर दूर जाऊ शकते. भूमध्यसागरी भागातून गोचिड पक्ष्यांच्या मदतीने मध्य युरोपमध्ये पोहोचल्याचं आढळून आलं आहे.
"लाइम रोगाच्या प्रसारामागे आणखी एक कारण म्हणजे गेल्या काही दशकांमध्ये लोक निसर्गाजवळ राहण्याच्या इच्छेनं शहरांबाहेर राहू लागले आहेत किंवा पर्वत आणि जंगलांमध्ये भटकंतीसाठी जाऊ लागले आहेत. लोक गोचिडच्या अधिक संपर्कात अधिक येऊ लागल्यानं लाइम रोगाचे प्रमाणही वाढले आहे.
आव्हानात्मक काळडॉ. अलेझांड्रा लुचिनी या अमेरिकेतील फेअरफॅक्स इथल्या जॉर्ज मेसन विद्यापीठातल्या स्कूल ऑफ सिस्टिम्स बायॉलॉजीमध्ये प्राध्यापक आहेत.
त्या सांगतात की सध्या अनेक वैज्ञानिक लाइम रोगाचे वेळेवर निदान करण्यासाठी एक विश्वासार्ह टेस्ट विकसित करण्याचा प्रयत्न करत आहेत, पण त्यांना अनेक आव्हानांचा सामना करावा लागत आहे.
"सध्या ज्या टेस्ट वापरात आहेत, त्यातून रुग्ण लाइम रोगाच्या संपर्कात आला आहे की नाही, हे समजण्याचा प्रयत्न केला जातो. पण ही पद्धत फारशी विश्वासार्ह नाही. डायरेक्ट टेस्टद्वारे Borrelia जीवाणूने सोडलेले रेणू ओळखता येऊ शकतात आणि रुग्णाला लाइम रोग आहे की नाही, हे निश्चित सांगता येईल. पण सध्या अशी कोणताही डायरेक्ट टेस्ट उपलब्ध नाही."
प्रचलित टेस्टमध्ये रक्ताची तपासणी केली जाते. पण बोरेलिया जीवाणू रक्तात फार काळ राहत नाही, तर तो सांधे आणि इतर अवयवांमध्ये लपतो, त्यामुळे त्याचे निदान करणे कठीण होऊन बसते..
" आता आम्ही टेस्टसाठी रुग्णाच्या मूत्राचा वापर करतो आहोत. कारण बोरेलिया जीवाणू रक्तात फार कमी रेणू सोडतो आणि तेही काही मिनिटांत फिल्टर होऊन बाहेर पडतात. रक्त जेव्हा किडनीत जाऊन फिल्टर होते, तेव्हा जीवाणूचे रेणू मूत्रात मोठ्या प्रमाणात मिसळतात आणि त्यांचं निदान करणं सोपं जातं."
दहा वर्षांपूर्वी ही टेस्ट विकसित झाली, तेव्हापासून हजारो रुग्णांच्या मूत्राची तपासणी करण्यात आली. हा जीवाणू कोणते प्रोटीन्स सोडतो याचा अभ्यास झाला.
जगात बोरेलिया जीवाणूच्या शेकडो प्रजाती आहेत आणि त्या सर्वांच्या प्रोटीनची ओळख पटवण्यासाठी संशोधन सुरू आहे.
कदाचित त्यापैकी फक्त 10–20 प्रजातीच लाइम रोगाचं कारण ठरतात. पण त्या हुडकून काढणं, हे एक मोठं आव्हान आहे.
या आजाराचे निदान करण्यासाठी डायरेक्ट टेस्ट विकसित झाल्यास रुग्णांच्या उपचारांवर मोठा परिणाम होईल, असं डॉ. लुचिनी यांना वाटतं.
1998 मध्ये लाइम रोगापासून बचावासाठी एक लस मंजूर झाली होती, पण त्याचे काही गंभीर साइड इफेक्ट्स नंतर समोर आले.
काही लोकांमध्ये त्यामुळे संधीवाताची लक्षणं दिसू लागली. मग काही वर्षांतच ती लस बनवणाऱ्या कंपनीने उत्पादन बंद केले.
पण आता लाइम रोगापासून बचावासाठी दोन कंपन्या नवीन लशी विकसित करत आहेत, ज्यामध्ये फायझर या कंपनीचाही समावेश आहे.
डॉ. अलेझांड्रा लुचिनी माहिती देतात, "नवीन लस ही जुन्या लशीच्या प्रोटीनवर आधारित आहे, पण त्यात सुधारणा करून साइड इफेक्ट्स निर्माण करणारे घटक काढून टाकले आहेत. या लशीच्या क्लिनिकल ट्रायलचे दोन टप्पे पूर्ण झाले आहेत. ही लस अनेकदा घ्यावी लागेल, पण त्यामुळे लाइम रोगापासून संरक्षण मिळू शकतं."
आपल्या मुख्य प्रश्नाकडे वळूयात —जगभरात इतक्या मोठ्या प्रमाणावर लोक लाइम रोगाचे बळी का ठरत आहेत?
याचे उत्तर हा रोग आणि त्याला पसरवणाऱ्या गोचिडींच्या एवढेच गुंतागुंतीचे आहे.
पृथ्वीच्या वाढत्या तापमानामुळे गोचिड पूर्वीपेक्षा अधिक काळ जिवंत राहू शकतात, त्यामुळे त्यांना प्राण्यांना किंवा माणसांना चावण्यासाठी अधिक वेळ मिळतो.
पक्षी आणि इतर प्राणी यांच्या शरीरावर चढून गोचिड दूरच्या भागांमध्ये पोहोचू शकते.
प्रसिद्ध व्यक्तींनी लाइम रोगाबद्दल आपले अनुभव शेअर केल्यामुळे जनजागृती तर वाढली आहे.
पण या रोगाची अनेक लक्षणे इतर आजारांसारखी असल्यानं सुरुवातीच्या टप्प्यात याचे निदान करणे अजूनही कठीण जाते आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)