पुणे, ता. २० : मुंबई आणि बंगळूरमध्ये वैविध्यपूर्ण स्थानासह पुण्यातील बांधकाम क्षेत्रातील कंपनी ‘कोलते-पाटील डेव्हलपर्स लिमिटेड’ कंपनीने पुण्यातील भूगाव येथे सुमारे ७.५ एकर जमिनीचे संपादन केल्याचे जाहीर केले आहे. त्यामध्ये सुमारे १.९ दशलक्ष चौरस फूट विक्रीयोग्य क्षेत्र आणि सुमारे एक हजार ४०० कोटी रुपयांचे एकूण विकासमूल्य आहे.
भूगाव हा भाग नैसर्गिक वातावरण आणि उत्कृष्ट नागरी दळणवळण संपर्क सेवा यांचा मिलाफ असलेले एक आकर्षक निवासी ठिकाण म्हणून उदयास येत आहे. ही जमीन बावधन आणि कोथरूडसारख्या प्रीमिअम भागांनी वेढलेली असून मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेच्या शेजारी आणि शिवाजीनगर रेल्वे स्थानकाजवळ आहे. याशिवाय, प्रमुख रोजगार केंद्रे जवळच असल्यामुळे हे गृहखरेदीदारांसाठी एक आकर्षक ठिकाण बनत आहे. हा प्रकल्प शाळा, रुग्णालये, शॉपिंग मॉल्स आणि मनोरंजन केंद्रांचा समावेश असलेल्या सामाजिक पायाभूत सुविधांच्या जवळ स्थित आहे.
याबाबत ‘कोलते-पाटील डेव्हलपर्स लिमिटेड’चे व्यवस्थापकीय संचालक राजेश पाटील म्हणाले, ‘‘भूगावमधील या भौगोलिकदृष्ट्या महत्त्वाच्या जमिनीच्या थेट खरेदीद्वारे उच्च संभाव्य मायक्रो-मार्केटमध्ये प्रवेश केल्यामुळे पुण्यातील आमचे स्थान अधिक मजबूत होत आहे.’’