वाघोली, ता. २० : घरफोड्या करणाऱ्या सराईतास गुन्हे शाखेच्या युनिट सहाच्या पथकाने वाघोलीतून अटक केली आहे. त्याच्याकडून चोरीची मोटार, घरफोडीतील सोन्याचे दागिने असा २१ लाख ४० हजारांचा ऐवज हस्तगत केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वाघोली येथील चोखी ढाणीजवळ सापळा रचून सराईत गुन्हेगार बिरजू राजपूतसिंग दुधानी (वय ४०, रा. रामटेकडी) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून चोरीची मोटार आणि विविध घरफोडी प्रकरणांतील सोन्याचे दागिने जप्त केले. दुधानी हा ‘मकोका’ गुन्ह्यातील आरोपी असून, जामिनावर बाहेर आला आहे. त्याच्यावर मुंढवा, येरवडा, चिखली, भोसरी एमआयडीसी आणि संत तुकारामनगर पोलिस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्याकडून पाच वेगवेगळे गुन्हे उघडकीस आले असून, त्याच्या साथीदारांचा शोध पोलिस घेत आहेत. युनिट सहाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक वाहिद पठाण यांच्या पथकाने ही कामगिरी केली.