पिंपरी, ता. २० : रावेत येथील चंद्रभागा कॉर्नरजवळील स्वस्तिक ड्रीम्स सोसायटीतील एका बंद सदनिकेला आग लागली. अग्निशमन दलाच्या जवानांनी सदनिकेचे कुलूप तोडून आगीवर नियंत्रण मिळविले. या घटनेत सदनिकेतील साहित्याचे नुकसान झाले.
सोसायटीच्या तिसऱ्या मजल्यावरील सदनिकेत आग लागली असून येथील रहिवासी गावी गेल्याची माहिती प्राधिकरण उप अग्निशमन केंद्राला मिळाली. त्यानुसार अग्निशमन दलाच्या जवानांनी तेथील वीज पुरवठा बंद करीत पाण्याचा मारा करून आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यानंतरही सदनिकेतून धूर दिसून येत होता. त्यामुळे सदनिकेच्या मालकाची परवानगी घेऊन पोलिसांच्या उपस्थितीत कुलूप तोडण्यात आले. त्यानंतर जवानांनी सदनिकेत जाऊन आग विझविली.