आठवणीतील वाचनालय------लोगो
हळुहळू ग्रंथालयाचे स्वरूप बदललं. तरुण कार्यकारणी आली. स्वच्छ व मन प्रसन्न करणारा कालखंड सुरू झाला. पुस्तकाना रॅक आली. नवीन आलेली पुस्तके रॅकवर दिसू लागली. साप्ताहिके, नियतकालिकांची संख्या वाढली. प्रसंगानुरूप ग्रंथ प्रदर्शने भरू लागली. दिवाळी अंकांची मेजवानी वाचकाना ताजी मिळू लागली. नवीन अद्ययावत सभागृह सुरू झाले आणि नवीन श्रवण सदस्यांचा एक वर्ग वाचनालयात दिसू लागला. टाइमपास म्हणून येणारा एक वर्ग तज्ज्ञांच्या व्याख्यानाकडे वळू लागला. एखाद्या प्रसिद्ध वक्त्यांचे व्याख्यान असेल तर सभागृह कमी पडू लागले. थोडक्यात नगर वाचनालयाचे स्वरूप बदलले.
- बापू गवाणकर, काळबादेवी
----
ज्येष्ठांचे वाचनालय तरुण होतेय
ग्रंथालयात गेल्यानंतर समोर कपाटात बंदिस्त असलेल्या प्रत्येक पुस्तकाला आपला हात लागला पाहिजे, असे प्रत्येक वाचकाला वाटते. तसे मलाही ते वाटणे स्वाभाविक आहे. साधारण १९८४-८५ ची घटना असावी त्या वेळी मी कॉलेजला होतो. बाकी सगळ्या उनाडक्या करत करत पुस्तकांसाठी महाविद्यालयाच्या ग्रंथालयात जायचो. बंदिस्त काउंटरच्या मागून तो लायब्ररीचा माणूस पुस्तक द्यायचा. ती बहुतेकशी अभ्यासक्रमाची, त्याहीपेक्षा वेगळी हवी असल्यास खूप घासाघीस, विनवण्या कराव्या लागत. समोर पुस्तकाने भरलेली प्रचंड ग्रंथ संपदा, पण तो माणूस काय करणार त्याला देखील बंधने. अभ्यासक्रमाव्यतिरिक्त एखादे पुस्तक मिळाले तर केवढा आनंद. आम्ही ग्रामीण भागातून आलेली मुलं, वाचनाची आवड, समोर प्रचंड ग्रंथसंपदा पण हाती काही लागत नव्हत. अशातच एक ग्रुप ग्रंथालयामध्ये ओपन एक्सेस हवा म्हणून प्राचार्याना निवेदन देण्यासाठी एक सह्यांचे पत्र फिरवत होते. माझ्यापर्यंत ते निवेदन आले, मी अत्यानंदाने त्यावर सही केली आणि त्यांच्याबरोबर काहीवेळ रेंगाळलो. प्रत्येकांबरोबरची त्यांची चर्चा ऐकत होतो. विषय मनातील आणि आवडीचा. त्यावेळी त्या ग्रुपचे नेतृत्व करत होते आताचे रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालयाचे अध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन. वाचक म्हणून तो विषय मनात होताच. कालांतराने मैत्री झाली आणि वाचनालयाची धुरा दीपक पटवर्धन यांनी सांभाळली. त्याचवेळी वाचनालयाला ऊर्जितावस्था येणार याची खात्री झाली.
नगर वाचनालयाचा मी १९८६ पूर्वी पासूनचा सभासद. त्या काळी एक पुस्तक आणि एक मासिक मिळत होते. विभावरी शिरूरकर यांचे कळ्यांचे निश्वास हे मी माझ्या नावावर घेतलेले पाहिले पुस्तक. सकाळी अथवा संध्याकाळी कधीतरी एक वेळ मी वाचनालयात जात असे. समोरच पेपर स्टँड दोन लोकल वर्तमान पत्रे लावलेली असायची. ती वाचायला वाचकांची संख्या अधिक. आजू बाजूला उभे असलेले वाचक वाकून वाकून पणे तिरकी करून वाचत असत. आत मध्ये अभ्यासिकेत बसायला मिळणे म्हणजे भाग्य होते. आदल्या दिवशीची वृत्तपत्रे, मासिके, साप्ताहिके वाचणाऱ्यांची संख्या अधिक. इंग्रजी न्यूज पेपर, इंग्रजी मासिक वाचणारे पाहील की त्यांचा खूप हेवा वाटे. ही लोकं स्पर्धा परीक्षांची तयारी करतात हे हळूहळू समजलं आणि आपला देखील कल तिकडे वाढू लागला. एखादा कॉलेजकुमारांचा ग्रुप तिकडे गडबड करायचा. मग शांतपणे सर्वांच्या नजरा त्यांच्याकडे वळायच्या किंवा एकदा लायब्ररीचा प्रमुख येऊन त्यांना गप्प करायचा.
सार्वजनिक वाचनालय हे काही फक्त पुस्तकांची देवघेव करणारी यंत्रणा न राहता सक्षम ‘वाचक’ तयार कसा करता येईल याचा ध्यास घेत नवीन इमारत बाधण्याचा संकल्प अॅड. पटवर्धन यांनी घेतलेला होता. सध्या नवीन इमारतीचे बांधकाम जोमाने सुरू आहे. पाडव्याच्या दिवशी ग्रंथपूजन करून वाचकाना नवीन दालन सुरू करून देण्यात आले. सध्याचा तरुणवर्ग हा मार्गदर्शन नसल्याने भरकटला आहे. त्यांना मोबाईल चॅटिंगमधून बाहेर काढून वाचन संस्कृतीत आणणे गरजेचे आहे.
थोडक्यात वाचनाचे मार्केटिंग ही संकल्पना अमलात आणता येईल. आपले वाचनालय द्विशतकाकडे वाटचाल करीत आहे. आपल्याकडे मोठी ग्रंथसंपदा व मोठा वाचक आहे. आणखी दोन वर्षांनी येणारे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे यजमान पद हे आपल्या नगर वाचनालयाने घेतले तर त्याचा तरुण वाचक, लेखक आणि कवी यांना होईल. तसेच त्यांचा वाचनालयाकडील ओढा वाढेल. सक्षम व अद्ययावत इमारतीत बाल विभाग निर्माण करून ठिकठिकाणच्या शाळेतील विद्यार्थ्यांना बोलावून तो पाहण्यासाठी ठेवावा. त्यामुळे भविष्यात एक वेगळा वाचक गट तयार होईल व तो विद्यार्थी हा चांगला नागरिक होईल. चांगले वाचक बनविण्याचे नवनवीन उद्दिष्ट असतीलच. सध्याचे युग डिजिटल आहे. पुस्तकांबरोबर ‘ई’ साहित्यामुळे एक वेगळा वर्ग वाचनालयाकडे वळू शकतो. आपले वाचनालय हे केवळ ग्रंथ संग्रहालय न राहता शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक आणि लोकशाही प्रगतीचा एक मजबूत स्तंभ तयार झाला पाहिजे. म्हणून भविष्यालाही आधुनिकतेची कास धरून नव्या पिढीसाठी द्विशतकाकडे वाटचाल करणारे रत्नागिरी नगर वाचनालय सर्वांचे प्रेरणास्थान होईल याची खात्री आहे.
---