आळेफाटा, ता. २० ः ‘‘जुन्नर तालुक्यात लवकरच सैनिक सहायता केंद्र लवकरच उभारण्यात येणार असून, सैनिक सहायता केंद्रामुळे माजी सैनिकांची अनेक कामे पुण्याला न जाता या केंद्रामार्फत करता येणार असल्याने माजी सैनिकांचा कष्ट वेळ आणि पैसा याची बचत होणार आहे,’’ असे प्रतिपादन लेफ्टनंट कर्नल साहेबराव शेळके यांनी आळे (ता. जुन्नर) या ठिकाणी केले.
आळे (ता. जुन्नर) येथील ज्ञानेश्वर महाराज देवस्थान ट्रस्टच्या सभागृहात शिवनेरी माजी सैनिक संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा, तसेच वर्धापन दिनाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमात तालुक्यातील उपस्थित आजी, माजी सैनिकांना मार्गदर्शन करताना शेळके बोलत होते.
याप्रसंगी पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रसन्न डोके, नारायणगावचे उपसरपंच योगेश पाटे, आळे गावचे सरपंच मुकुंद भंडलकर, कॅ. परशुराम शिंदे, माजी सैनिक संघाचे अध्यक्ष एकनाथ वाजगे, कार्याध्यक्ष लेफ्टनंट उमेश अवचट, सचिव शिवाजी पाटे, खजिनदार नीलेश शेळके, सावळेराम आहेर, शांताराम डावखर, संभाजी वाळुंज, दत्तात्रेय आरोटे, मंगल घोडे ,शरद बेळे, सोपान म्हेत्रे, होनाजी गुंजाळ, बी. एम. डोंगरे, किसन ढवळे, बी. टी. जुंदरे, रामदास मेहेर, डी. के. डोंगरे, विलास तांबे आदी, तसेच तालुक्यातील आजी-माजी सैनिक उपस्थित होते.
यावेळी शेळके यांनी माजी सैनिकांसाठी शासन ज्या विविध कल्याणकारी योजना राबवते याबाबत माहिती दिली. त्यात प्रामुख्याने माजी सैनिकांच्या मुलींच्या लग्नासाठी एक लाख रुपयांची मदत, तसेच मुलांच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत याबद्दल सविस्तर माहिती दिली.
यावेळी संघटनेच्या वतीने ज्ञानेश्वर महाराज देवस्थान ट्रस्ट साठी (रेडा समाधी मंदिराला) ११ हजार १११ रुपयांची देणगी देण्यात आली. उमेश अवचट यांनी प्रास्ताविक केले. एकनाथ वाजगे यांनी आभार मानले.
07208