Mumbai Metro - 2B : मुहूर्त ठरला! 'मुंबई मेट्रो -२ ब' या दिवशी धावणार, मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून होणार सुटका
Saam TV October 23, 2025 02:45 AM

अंधेरी पश्चिम–मंडाले मेट्रो 2B मार्गिकेच्या पहिल्या टप्प्याला सुरक्षा प्रमाणपत्र मिळाले आहे

डायमंड गार्डन–मंडाले टप्प्याचे लोकार्पण ऑक्टोबरअखेरीस होण्याची शक्यता आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे

लोकार्पणानंतर मुंबईकरांना या मार्गिकेवर मेट्रो प्रवासाचा नवा अनुभव मिळणार आहे

प्रवाशांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. अंधेरी पश्चिम - मंडाले मेट्रो २ ब मार्गिकेतील डायमंड गार्डन - मंडाले दरम्यानच्या पहिल्या टप्प्याच्या लोकार्पणाची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. या टप्प्याच्या संचलनाचा मार्ग आता मोकाळा झाला आहे. या टप्प्यासाठी मेट्रो आयुक्त, मेट्रो रेल्वे सुरक्षा यांच्याकडून नुकतेच सुरक्षा प्रमाणपत्र प्राप्त झाले असून ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात या मार्गिकेच्या लोकार्पणाची शक्यता आहे. राज्य सरकार आणि मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) त्यादृष्टीने तयारी करीत आहे. लवकरच लोकार्पणाची तारीख जाहीर होण्याची शक्यता असून हा पहिला टप्पा सेवेत दाखल झाल्यास मुंबईकरांना मेट्रोतून डायमंड गार्डन - मंडाले दरम्यान प्रवास करता येणार आहे.

‘दहिसर - अंधेरी पश्चिम मेट्रो २ अ’चा विस्तार ‘अंधेरी पश्चिम - मंडाले मेट्रो २ ब’ मार्गिकेच्या माध्यमातून करण्यात येत आहे. २२ किमी लांबीच्या आणि २२ मेट्रो स्थानकांचा समावेश असलेल्या या मार्गिकेचे काम दोन टप्प्यात करण्यात येत आहे. मंडाले - डायमंड गार्डन आणि डायमंड गार्डन - अंधेरी पश्चिम असे हे दोन टप्पे आहेत. यापैकी डायमंड गार्डन - मंडाले टप्पा डिसेंबरअखेरीस वाहतूक सेवेत दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला. यानंतर या टप्प्यातील मार्गिकेच्या कामाला वेग देऊन एप्रिल २०२५ मध्ये डायमंड गार्डन - मंडालेदरम्यान मेट्रो गाड्यांच्या आणि विविध यंत्रणांच्या चाचणीला सुरुवात करण्यात आली आहे.

Scholarship Exam 2025-26 : शिक्षण विभागाचा ऐतिहासिक निर्णय; शिष्यवृत्ती परीक्षा आता पूर्वीप्रमाणे ४ थी आणि ७ वीच्या विद्यार्थ्यांसाठी

आता चाचण्या अंतिम टप्प्यात असल्याने ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात मेट्रो आयुक्त, मेट्रो रेल्वे सुरक्षा (सीएमआरएस) यांच्याकडून सुरक्षा प्रमाणपत्र प्राप्त होईल अशी अपेक्षा सरकार आणि एमएमआरडीएला होती. त्यामुळेच नवी मुंबई विमानतळ आणि मेट्रो ३ मार्गिकेतील शेवटच्या टप्प्याच्या लोकार्पणाच्या दिवशीच ८ ऑक्टोबर रोजी डायमंड गार्डन – मंडाले टप्प्याचेही लोकार्पण करण्याची तयारी सुरू होती. मात्र या टप्प्यासाठी सुरक्षा प्रमाणपत्र प्राप्त न झाल्याने ८ ऑक्टोबरचा मुहूर्त चुकला. पण आता मात्र या टप्प्याच्या संचलनाचा मार्ग मोकळा झाला आहे.

Maharashtra Board Exam : दहावी- बारावीच्या परीक्षा शुल्कात वाढ! शाळा अन् महाविद्यालयांना ३० ऑक्टोबरपर्यंत मुदत, पालकांची नाराजी

डायमंड गार्डन – मंडाले टप्प्यासाठी नुकतेच सुरक्षा प्रमाणपत्र मिळाल्याची माहिती महानगर आयुक्त डाॅ. संजय मुखर्जी यांनी दिली. आता राज्य सरकारकडून वेळ मिळाल्यानंतर तात्काळ या टप्प्याचे लोकार्पण करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या टप्प्याचे लोकार्पण करण्याचे सरकारचे नियोजन आहे. त्यांची वेळ मिळविण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे समजते आहे. या टप्प्याचे लोकार्पण पंतप्रधानांच्या हस्ते ३० किंवा ३१ ऑक्टोबर रोजी करण्याचे प्रयत्न असल्याचे समजते. त्यामुळे आता सरकारकडून लोकार्पणाच्या तारखेच्या अधिकृत घोषणेची प्रतीक्षा आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.