टीम इंडियाच्या रोहित शर्माला ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यामध्ये काही खास करता आलं नाही. रोहित पर्थमधील सामन्यात अवघ्या 8 धावांवर बाद झाला. त्यामुळे हिटमॅनच्या चाहत्यांचा हिरमोड झाला. मात्र रोहितने एडलेडमध्ये चाहत्यांची निराशा केली नाही. रोहितने निर्णायक क्षणी श्रेयस अय्यर याच्यासह शतकी भागीदारी केली. रोहितने या भागीदारी दरम्यान एडलेडमध्ये दादागिरी संपवली. रोहितने टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरव गांगुली याचा रेकॉर्ड ब्रेक करत इतिहास घडवला. रोहित यासह टॉप 3 मध्ये एन्ट्री घेतली.
रोहितने सौरव गांगुली याचा एकदिवसीय क्रिकेटमधील धावांचा विक्रम मोडीत काढला आहे. रोहित गांगुलीला पछाडताच टीम इंडियासाठी सर्वाधिक एकदिवसीय धावा करणारा एकूण तिसरा तर दुसरा सक्रीय फलंदाज ठरला. तर गांगुलीची चौथ्या स्थानी घसरण झाली.
रोहितच्या नावावर एकदिवसीय क्रिकेटमध्ये 275 सामन्यांमधील 267 डावांमध्ये 11 हजार 249 धावा आहेत. तर गांगुलीने 308 सामन्यांमधील 297 डावांत 11 हजार 221 धावा केल्या होत्या. टीम इंडियासाठी सर्वाधिक धावांचा विक्रम हा सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर विराट कोहली विराजमान आहे. विराट टीम इंडियासाठी सर्वाधिक एकदिवसीय धावा करणारा सक्रीय फलंदाज आहे.
टीम इंडियाने झटपट 2 विकेट्स गमावल्यानंतर रोहितने श्रेयस अय्यर याच्यासह तिसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली. शुबमन गिल 9 आणि विराट कोहली 0 वर आऊट झाल्याने टीम इंडियाची स्थिती 2 आऊट 17 अशी स्थिती झाली. मात्र त्यानंतर रोहित शर्मा आणि श्रेयस अय्यर या मुंबईकर जोडीने टीम इंडियासाठी निर्णायक योगदान दिलं. या दोघांनी 118 धावांची भागीदारी केली. मात्र रोहित आऊट होताच ही जोडी फुटली.
सर्वाधिक एकदिवसीय धावा करणारे भारतीय
रोहित शर्मा याला ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क याने जोश हेझलवूड याच्या हाती कॅच आऊट केलं.रोहितने 97 बॉलमध्ये 75.26 च्या स्ट्राईक रेटने 73 रन्स केल्या. रोहितने या खेळीतील 73 पैकी 28 धावा या चौकार आणि षटकारांच्या मदतीने केल्या. रोहितने या खेळीत 2 सिक्स आणि 4 फोर लगावले. रोहितकडून चाहत्यांना शतकाची अपेक्षा होती. रोहित त्याप्रमाणेच खेळतही होता. मात्र रोहित शतकापर्यंत पोहचू शकला नाही. मात्र रोहितने निर्णायक क्षणी श्रेयससह चिवट आणि झुंजार भागीदारी करत भारताला चांगल्या स्थितीत आणून ठेवलं.