शेंदूरजनाघाट : मलकापूर आठवडी बाजार चौकात उसनवारीच्या पैशांवरून एका व्यक्तीवर चाकूने वार करून त्याला गंभीर जखमी करण्यात आले. ही घटना २१ ऑक्टोबरला सायंकाळच्या सुमारास घडली.
रोशन नामदेव कळंबे (वय ३९, रा. मलकापूर) हा संत्रातोडीचे काम करतो. त्याच्या सोबत हेमंत चौकडे (वय ४५) हा देखील संत्रातोडीच्या कामाकरिता जात होता. रोशनकडून हेमंतने १५ दिवसांआगोदर ३०० रुपये उधार घेतले होते. त्यापैकी ५० रुपये रोशनला परत केले व आणि बाकीचे पैसे हेमंत कडे होते.
२१ ऑक्टोबरला सायंकाळी ७.१५ वाजताच्या दरम्यान रोशन मलकापूर आठवडी बाजार चौकात चहाच्या गाडीजवळ बसला असता तिथे हेमंत चौकडे हा आला. तेव्हा उधार दिलेले २५० रुपये मागितले असता त्याने जा देत नाही, काय करायचे ते करून घे, असे म्हणून रोशनला ओढताण करून शिवीगाळ केली आणि हातातील चाकूने रोशनच्या गळ्यावर, उजवे हाताच्या मनगटावर, दंडावर, उजव्या कुशीजवळ व डाव्या कानावर चाकूने हल्ला करून हत्या करण्याचा प्रयत्न केला.
चौकातील नागरिकांनी हेमंतला पकडून त्याच्या तावडीतून रोशनला वाचविले. प्रकरणी जखमी रोशन कळंबे याने शेंदूरजनाघाट पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार दिली. त्यावरून संशयित आरोपी हेमंत चौकडे याच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतले.
Raigad Crime: रायगडमध्ये बनावट नोटा! मोठे रॅकेट सक्रिय असल्याचा संशय; आतापर्यंत तिघांना अटकजखमी रोशन कळंबे यांच्यावर २१ ऑक्टोबरला शेंदूरजनाघाट येथील प्राथमिक आरोग्यकेंद्रात उपचार करून पुढील उपचाराकरिता अमरावती येथे रेफर करण्यात आले होते. २२ ऑक्टोबरला अमरावती येथील फॉरेन्सिक लॅबच्या चमूने घटनास्थळाचे निरीक्षण करून पुरावे गोळा केले. हेमंत चौकडे याला २२ ऑक्टोबरला न्यायालयात दाखल केले असता न्यायालयाने त्याला २४ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. पुढील तपास ठाणेदार दीपक महाडिक, मोहन महाजन, सागर लेवलकर करीत आहेत.