Maharashtra Crime : ती असुरक्षितच; साताऱ्यामध्ये महिला डॉक्टरने संपवली जीवनयात्रा, मुंबईमध्ये प्रेयसीला मारत प्रियकराने जीवन संपविले
esakal October 25, 2025 10:45 AM

सातारा- मुंबई : अवघ्या राज्याची मान आज पुन्हा एकदा शरमेने खाली गेली. महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढत होत असताना खाकी वर्दीवरही डाग लागला आहे. सातारा जिल्ह्यातील फलटण येथील शासकीय रुग्णालयामध्ये कार्यरत एका महिला डॉक्टरने गुरुवारी येथील एका हॉटेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलिस उपनिरीक्षक व घरमालकाच्या मुलाने शारीरिक व मानसिक छळ करून बलात्कार केल्याचे तिने हातावर लिहून ठेवल्याचे निदर्शनास आले आहे. दुसरीकडे मुंबईतील काळाचौकी येथे प्रेयसीची हत्या करून तरुणाने स्वतःला संपविल्याने खळबळ उडाली. या दोन्ही घटनांमुळे राज्यात ‘ती’ असुरक्षित असल्याचे स्पष्ट झाले.

फलटण येथील शासकीय रुग्णालयामध्ये कार्यरत असलेल्या एका महिला डॉक्टरने काल फलटण येथील एका हॉटेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार काल रात्री समोर आला. दरम्यान, पोलिस उपनिरीक्षक व घरमालकाच्या मुलाने शारीरिक व मानसिक छळ करून बलात्कार केल्याची चिठ्ठी तिने हातावर लिहिल्याचे निदर्शनास आल्यानंतर जिल्ह्यासह राज्यात खळबळ उडाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याची गंभीर दखल घेत कारवाई करण्याचे निर्देश दिल्यानंतर प्रशासन हलले. त्यानंतर संबंधित उपनिरीक्षकासह दोघांवर फलटण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

उपनिरीक्षक गोपाल बदने व घरमालकाचा मुलगा प्रशांत बनकर (रा. फलटण) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत अतिरिक्त पोलिस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित महिला ही फलटण तालुक्यातील एका शासकीय रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून सेवेत होती. ती संशयित बनकर याच्या घरात राहात होती. काल पहाटे दीडच्या सुमारास तिने फलटण येथील एका हॉटेलमध्ये दोन दिवसांसाठी रूम बुक केली होती. सकाळी सात वाजता हॉटेल कर्मचाऱ्यांनी चहा, नाश्त्यासाठी रूमचा दरवाजा ठोठावला; परंतु त्यांना प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर दुपारी दोन वाजता जेवणासाठी कर्मचाऱ्यांनी दरवाजा ठोठावला. तेव्हाही प्रतिसाद न मिळाल्यामुळे हॉटेल प्रशासनाने पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर फलटण शहर पोलिस निरीक्षक अरविंद काळे व कर्मचाऱ्यांनी तातडीने हॉटेलला भेट दिली. दरवाजा उघडला जात नसल्यामुळे पोलिसांनी हॉटेल प्रशासनाच्या मदतीने दरवाजा उघडला. या वेळी महिला डॉक्टरने गळफास घेतल्याचे आढळून आले. फलटण शहर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पंचनामा केला. त्यानंतर नातेवाइकांना याबाबतची माहिती दिली. त्यांच्या मागणीनुसार मृतदेह जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय महाविद्यालयाच्या फॉरेन्सिक विभागाच्या तज्ज्ञ डॉक्टरांकडून शवविच्छेदन करण्यात आले.

दरम्यान, मृतदेहाची पाहणी करताना हातावर काही तरी लिहिले असल्याचे समोर आले. त्यामध्ये उपनिरीक्षक गोपाल बदने व प्रशांत बनकर यांचे नाव होते, तसेच त्यांनी गेल्या चार महिन्यांपासून शारीरिक व मानसिक छळ, तसेच अत्याचार केल्याचे लिहिल्याचे समोर आले. हा प्रकार समोर आल्यानंतर जिल्ह्यासह राज्यात तीव्र पडसाद उमटू लागले. या गंभीर व संवेदनशील प्रकाराची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेतली. या प्रकरणी संबंधितावर तातडीने गुन्हे दाखल करत कडक कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी पोलिस प्रशासनाला दिले. त्यानंतर हालचालींना वेग वाढला. महिला डॉक्टरच्या भावाच्या फिर्यादीनुसार, बदने व बनकर यांच्यावर अत्याचार व आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा फलटण शहर पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला, तसेच संशयितांच्या शोधासाठी तपास पथकेही रवाना करण्यात आली. गंभीर गुन्हा असल्यामुळे डॉ. कडूकर या तातडीने फलटणला दाखल झाल्या. त्यांनी घटनास्थळाची पाहणी करून तपासाबाबत सूचना दिल्या. गुन्ह्याचा तपास फलटणचे पोलिस उपअधीक्षक विशाल खांबे यांच्याकडे देण्यात आला आहे.

वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार

महिला वैद्यकीय अधिकाऱ्याने चार महिन्यांपूर्वी कामांमध्ये वैद्यकीय तपासणीत अपात्र ठरलेल्या एका संशयित व्यक्तीला पात्र ठरविण्यासाठी पोलिस उपनिरीक्षक गोपाल बदने, पोलिस उपनिरीक्षक मच्छिंद्र पाटील, साहाय्यक पोलिस निरीक्षक शिवाजी जायपत्रे या पोलिस अधिकाऱ्याकडून वारंवार दबाव येत असल्याची लेखी तक्रार फलटणच्या पोलिस उपअधीक्षकांकडे केल्याचे समोर आले आहे.

पीएम अहवाल बदलण्यासाठी दबाव

बहीण दोन वर्षांपासून कार्यरत आहे. एक वर्षापासून शवविच्छेदन अहवाल बदलण्यासाठी, चुकीचा देण्यासाठी तिच्यावर राजकीय व पोलिसांचा दबाव येत होता. याबाबत तिने तिच्या डॉक्टर असलेल्या बहिणीला सांगितले होते; परंतु एवढा गंभीर त्रास असेल असे वाटले नव्हते. या त्रासाबाबत तिने वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडे तक्रारही केली होती; परंतु त्यावर कारवाई झाली नाही. माहिती अधिकारात तिने माहिती मागूनही दिली गेलेली नाही. तिने हातावर संशयितांची नावे लिहिली आहेत.

- डॉक्टर महिलेचा भाऊ

Satara Crime : PSI चं नाव हातावर लिहून महिला डॉक्टरनं स्वत:ला संपवलं, 'तो' पोलिस अधिकारी निलंबित, आणखी धक्कादायक माहिती समोर येणार!

फलटण येथे रुग्णसेवेत असलेल्या बीड जिल्ह्यातील महिला डॉक्टर यांच्याबाबत घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे. या संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र एसआयटी नेमून चौकशी करण्यात यावी, तसेच हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालविले जावे. यातील दोषींना कडक शासन व्हावे, याबाबत उद्या (ता.२५) मुख्यमंत्र्यांना पत्र देणार आहे. त्या डॉक्टर भगिनीला भावपूर्ण श्रद्धांजली, तसेच तिच्या अकाली निधनाने कुटुंबीयांवर कोसळलेल्या दुःखात मी सहभागी आहे.

- धनंजय मुंडे,माजी कृषिमंत्री

आज सकाळी ही घटना माझ्या निदर्शनास आली. मी लगेचच पोलिस अधीक्षक व अतिरिक्त पोलिस अधीक्षकांना योग्य त्या सूचना दिल्या आहेत. त्रास देणाऱ्यांची नावे महिला डॉक्टरांनी हातावर लिहिली आहेत, तसेच तिला यापूर्वीही त्रास देण्यात आल्याचे नातेवाइकांचे म्हणणे आहे. या गुन्ह्याचा तपास वरिष्ठ महिला पोलिस अधिकाऱ्याकडे देण्यात आला आहे. त्यांनी पुरावे हस्तगत केले आहेत. संशयित पसार आहेत. त्यांना शोधण्यासाठी पाच पथके रवाना करण्यात आली आहेत. कुठल्या परिस्थितीत सर्व कसब पणाला लावून सातारा पोलिस संशयितांना अटक करतील.

- शंभूराज देसाई,पालकमंत्री

मुख्यमंत्र्यांचे निर्देश

महिला डॉक्टरने आत्महत्या केल्याचे व हातावर पोलिस अधिकाऱ्यांसह दोघांची नावे लिहून बलात्कारासारखा गंभीर आरोप केला असल्याचे समोर आले. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याची गंभीर दखल घेतली. संशयितांवर तातडीने गुन्हे दाखल करण्याचे, तसेच पोलिस अधिकाऱ्यांना निलंबित करण्याचे आदेश त्यांनी दिले. त्यानंतर पोलिस अधीक्षकांनी गोपाल बदने याला निलंबित केले.

प्रेमातून टोकाचे पाऊल

मुंबई : प्रेमसंबंध तोडल्याने अस्वस्थ झालेल्या तरुणाने रागाच्या भरात प्रेयसीची दिवसाढवळ्या भरवस्तीत चाकूचे असंख्य वार करीत हत्या केली. पुढे तोच चाकू स्वतःच्या गळ्यावर फिरवत आयुष्य संपविले. ही धक्कादायक घटना शुक्रवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास काळाचौकी येथील ‘आशा मॅटर्निटी अँड सर्जिकल नर्सिंग होम’जवळ घडली. या घटनेत तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर गंभीर जखमी झालेल्या तरुणीने संध्याकाळी जे. जे. रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.

काळाचौकी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनू बराय (वय २४) आणि मनीषा यादव (वय २४) अशी या घटनेत मरण पावलेल्या दोघांची नावे आहेत. सोनू आणि मनीषा काळाचौकीच्या आंबेवाडीत राहत होते. गेल्या आठ ते दहा वर्षांपासून दोघांमध्ये प्रेमसंबंध होते; मात्र काही महिन्यांपासून त्यांच्यात वाद सुरू झाले. मनीषाचे दुसऱ्या व्यक्तीवर प्रेम असावे, त्यामुळे ती आपल्याकडे दुर्लक्ष करते, असा संशय सोनूला होता. काही दिवसांपूर्वी मनीषाने सोनूकडून सतत व्यक्त होणारा संशय आणि त्यातून घडणाऱ्या वादाला कंटाळून हे नाते तोडण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय सोनूच्या जिव्हारी लागला. रागाच्या भरात त्याने शुक्रवारी तिला भेटण्यासाठी बोलाविले. चाकू सोबत घेऊनच तो भेटायला निघाला होता, अशी माहिती प्राथमिक तपासातून प्राप्त झाल्याचे पोलिसांनी सांगितले. सोनू एका केटरिंग व्यावसायिकाकडे मजुरी करत होता. त्याचे वडील परिसरात पानटपरी चालवितात.

नर्सिंग होममधील थरार

काळाचौकी परिसरात शुक्रवारी सकाळी भेट झाल्यावर दोघे येथील दत्ताराम लाड मार्गावर फेऱ्या मारत होते. नात्याबाबत दोघांमध्ये वाद सुरू होता. आशा नर्सिंग होमजवळ येताच सोनूने अचानक चाकू काढला आणि मनीषावर सपासप वार केले. जीव वाचविण्यासाठी तिने नर्सिंग होममध्ये धाव घेतली. सोनूने पाठलाग करत नर्सिंग होममध्ये तिला गाठून तिच्यावर अनेक वार केले. हा थरार डोळ्यांनी पाहणाऱ्या वाहतूक पोलिस शिपाई किरण सूर्यवंशी यांच्यासह स्थानिक नागरिकांनी लाठ्या, काठ्या, बांबू, दगड आदी हाती मिळेल ते घेऊन त्याच्या तावडीतून मनीषाला सोडविण्याचा प्रयत्न केला; मात्र त्याआधीच सोनूने स्वतःच्या गळ्यावर चाकू फिरवून घेतला. त्यानंतर सूर्यवंशी व नागरिकांनी मनीषाला रुग्णालयाबाहेर आणले व सोनूवर लाठ्याकाठ्या बरसल्या.

उपचारादरम्यान मृत्यू

मनीषाला भायखळा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे प्रथमोपचार करून लागलीच पुढील उपचारांसाठी तिला जे. जे. रुग्णालयात हलविण्यात आले; मात्र संध्याकाळी उपचारांदरम्यान तिचा मृत्यू झाला. सोनूला केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले, अशी माहिती पोलिस उपआयुक्त आर. रागसुधा यांनी दिली.

नर्सिंग होममध्ये रक्ताचा सडा

जखमी सोनू आणि मनीषाला रुग्णालयात नेल्यानंतर आशा नर्सिंग होममध्ये आणि बाहेरील रस्त्यावर रक्ताचा सडा पसरला होता. त्यावरून सोनूने मनीषावर किती भयंकर हल्ला केला, हे कळत होते. मनीषाची प्रकृती स्थिर झाल्यानंतर पोलिस तिचा जबाब नोंदविणार होते. त्यातून या घटनेचा नेमका उलगडा झाला असता; पण त्याआधीच तिचा मृत्यू झाला.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.