'विजयदुर्ग'ने अनुभवली धगधगत्या मशालींची रोषणाई
esakal October 25, 2025 10:45 AM

00282

‘विजयदुर्ग’ने अनुभवली धगधगत्या मशालींची रोषणाई

गडपूजनासह दीपोत्सव; ‘गड किल्ले संवर्धन’, महाराष्ट्र राज्य कोकण विभागाचा पुढाकार

सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. २४ ः तत्कालीन ऐतिहासिक काळातील रात्रीच्या धगधगत्या मशालींचा प्रकाश तालुक्यातील किल्ले विजयदुर्गने अनुभवला. मशालींच्या प्रकाशाने किल्याची तटबंदी उजळून निघाली. पारंपरिक वेशभूषेसह पेटत्या मशालींच्या प्रकाशाने किल्ला क्षणभर ऐतिहासिक काळातील पराक्रमाच्या आठवणीत रमला. निमित्त होते, दिवाळी पाडव्याला किल्ले विजयदुर्गवरील गडपूजन आणि दीपोत्सव सोहळ्याचे.
प्रतिवर्षाप्रमाणे गड किल्ले संवर्धन संस्था, महाराष्ट्र राज्य कोकण विभाग यांच्यावतीने बुधवारी (ता.२२) दिवाळी पाडवा या दिवशी किल्ले विजयदुर्गवर गडपूजन व दीपोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरूवात विजयदुर्ग आगारापासून शिवरायांच्या पालखी मिरवणुकीने झाली. लखलखत्या मशालींच्या प्रकाशात किल्यावरील श्री भवानी मंदिरापर्यंत ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढली होती. यावेळी विजयदुर्ग पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक संजय कातिवले, विजयदुर्ग ग्रामविकास मंडळ अध्यक्ष श्री. बिडये, सल्लागार राजेंद्र परुळेकर तसेच ग्रामस्थाच्या उपस्थितीत किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ गडपूजन करण्यात आले. किल्ल्यात असलेल्या श्री भवानी मंदिर, श्री हनुमान मंदिर, महाद्वार भागात रांगोळी काढून रंगीत फुलांनी सजवले होते. तसेच किल्ल्यावरील अन्य ठिकाणी दिवे प्रज्वलीत करण्यात आले. याप्रसंगी डॉ. यश वेलणकर, महेश कानेटकर, विद्याधर माळगावकर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीचे पुजन करून ध्येयमंत्र, प्रेरणा मंत्र, आरती व शिववंदना घेऊन कार्यक्रमाची सांगता केली. या कार्यक्रमाचे आयोजन कोकण विभाग अध्यक्ष शुभम राणम, संपर्क प्रमुख अभिजित तिर्लोटकर, समन्वयक यशपाल जैतापकर यांनी केले होते. या कार्यक्रमामध्ये पंकज पुजारी, नितीन नारकर, अनिरुद्ध तिर्लोटकर, समीर गुरव, रोहित गुरव, दुर्गेश गुरव, सूरज राणम, सतीश राणम, संदेश राणम, चेतन गुरव, श्रावणी पांचाळ, सायली पांचाळ, गौरी मणचेकर, अभिषेक गुरव, पार्थ सुतार, रामदास घारकर, अविनाश मोरे, आयूश सुतार, किशोर ठुकरूल, पुंडलिक घाडी, गौरव मणचेकर, पूनम मेस्त्री, संदेश नर, श्रीनाथ घाडी यांच्यासह अनेक शिवभक्त उपस्थित होते. कार्यक्रमाला स्थानिकांचे सहकार्य लाभले.
.....................
२०० पणत्या, ५१ मशालींची रोषणाई
किल्ले विजयदुर्गच्या मुख्य प्रवेशद्वाराला तोरण बांधले होते. सुमारे २०० पणत्या आणि ५१ मशाली प्रज्वलित करून रोषणाई करण्यात आली होती. यामुळे रात्रीच्या अंधारात मशालींच्या प्रकाशात किल्याची तटबंदी ऐतिहासिक काळात रमली होती.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.