वुमन्स वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील 25व्या सामन्यात पाकिस्तान आणि श्रीलंका आमनेसामने आले होते. श्रीलंकेचा साखळी फेरीतील शेवटचा सामना होता आणि भारताप्रमाणे 6 गुण मिळवण्याची शेवटची संधी होती. त्यामुळे पाकिस्तानला पराभूत करून 6 गुण मिळवून उपांत्य फेरीच्या आशा जिवंत ठेवण्याची त्यातल्या त्यात संधी होती. पण आता त्या आशाही मावळल्या आहेत. कारण पावसामुळे हा सामना रद्द झाला आहे. दोन्ही संघांना प्रत्येकी 1 गुण वाटून दिला आहे. उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलिया, दक्षिण अफ्रिका, इंग्लंड आणि भारत या संघांनी धडक मारली आहे. भारताचे 6 गुण आणि नेट रनरेट हा +0.628 इतका आहे. त्यामुळे भारताला उपांत्य फेरीचं तिकीट मिळालं होतं. पण चमत्कारीकरित्या श्रीलंकेने पाकिस्तानला मोठ्या फरकाने पराभूत केलं असतं तर 2 गुण मिळाले असते आणि नेट रनरेटमध्येही फरक पडला असता. त्यात भारताने बांगलादेशविरुद्धचा सामना मोठ्या फरकाने गमावला असता तर कदाचित संधीही मिळू शकली असती. हे सर्व गणित जर तरचं होतं. पण आता श्रीलंकेचा पत्ता अधिकृतरित्या स्पर्धेतून कट झाला आहे.
श्रीलंकेने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. सामन्याला उशिराने सुरुवात झाली. श्रीलंकेने 4.2 षटकं टाकली आणि पाकिस्तानने एकही गडी न गमावता 18 धावा केल्या होत्या. मात्र पावसाने पुन्हा हजेरी लावली आणि नंतर उसंत घेतली नाही. त्यामुळे वेळ जशी पुढे गेली तसा हा सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला गेला. त्यामुळे दोन्ही संघांचा या स्पर्धेतील प्रवास थांबला. श्रीलंकेने 7 सामन्यापैकी 1 सामना जिंकला, 3 सामन्यात पराभव आणि 3 सामना पावसामुळे रद्द झाले. त्यामुळे 5 गुण आणि -1.035 नेट रनरेटसह पाचव्या स्थानावर समाधान मानावं लागलं. तर पाकिस्तानचा संघ 7 सामन्यापैकी सामन्यात पराभूत झाला आणि तीन सामना पावसामुळे झालेच नाहीत. त्यामुळे 3 गुण आणि -2.651 नेट रनरेटसह सातव्या स्थानावर प्रवास संपला.
श्रीलंकेची कर्णधार चमारी अट्टापट्टू म्हणाली की, ‘, या विश्वचषकात आल्यावर अपेक्षा जास्त असतात. दुर्दैवाने, आम्ही भारताविरुद्ध पहिला सामना आणि इंग्लंडविरुद्ध दुसरा सामना गमावला. मैदानात, फलंदाजी युनिट म्हणून आणि गोलंदाजी युनिट म्हणून आम्ही खूप चुका केल्या आहेत. दुर्दैवाने, आम्हाला असे खेळायचे नाही, परंतु आम्ही भविष्यात काय चांगले करू शकतो यावर लक्ष केंद्रित करत आहोत.’
पाकिस्तानची कर्णधार फातिमा सना म्हणाली की, ‘पुढच्या वर्षी टी20 विश्वचषक देखील आहे. आशा आहे की आम्हाला खूप क्रिकेट मिळेल आणि मोठ्या स्पर्धांसाठी स्वतःला तयार करू. पीसीबी आमच्यासाठी काय व्यवस्था करते ते पाहूया, कारण यानंतर पुढच्या वर्षी आमच्याकडे दोन मालिका आहेत. तर, आम्ही वाट पाहत आहोत. यानंतर काय होईल ते पाहूया.’