दिवाळीतच चिपळूण शहरात पाणीटंचाई
esakal October 25, 2025 01:45 PM

दिवाळीतच चिपळूण शहरात पाणीटंचाई
वीजनिर्मिती न झाल्याचा परिणाम; कमी दाबाने मिळाले पुरवठा
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २४ : दिवाळीच्या पहिल्याच दिवशी चिपळूण शहरात पाणीटंचाईची झळ जाणवली. कोळकेवाडी धरणातून वाशिष्टी नदीत पुरेसे पाणी सोडण्यात आले नाही. त्यामुळे अभ्यंगस्नानाला शहरात पाणीटंचाईची झळ सोसावी लागल्याने शहरातील नागरिकांनी प्रशासनाच्या कारभाराविषयी नाराजी व्यक्त केली.
चिपळूण शहराला वाशिष्टी नदीतून पाणीपुरवठा केला जातो. त्यासाठी नदीत खेर्डी आणि गोवळकोट येथे जॅकवेल बांधण्यात आले आहेत. कोयना प्रकल्पात वीजनिर्मिती झाल्यानंतर कोळकेवाडी धरणात पाणी साठवले जाते. धरणाच्या पायथ्याशी असलेल्या तिसऱ्या टप्प्यात वीजनिर्मिती झाल्यानंतरचे पाणी अवजल कालव्यामार्फत वाशिष्टी नदीत सोडले जाते. हे पाणी पिण्यासाठी चिपळूण पालिका उचलते. यावर्षी दिवाळीत विजेची मागणी आहे. तरीही कोयना प्रकल्पातून वीजनिर्मिती केली जात नव्हती. त्यामुळे कोळकेवाडी धरणातून वाशिष्टी नदीकडे पाणी सोडले जात नव्हते. त्याचा परिणाम चिपळूण शहराच्या पाणीपुरवठा योजनेवर झाला. निम्म्यापेक्षा जास्त भागाला दिवाळीच्या पहिल्या दिवशी पाणीटंचाईला सामोरे जावे लागले तर काही भागात अत्यंत कमी दाबाने पाणीपुरवठा होत होता.
दिवाळीच्या पुढील हंगामात पाणी मिळेल किंवा नाही, याची शाश्वती नसल्यामुळे नागरिकांनी पिंपात पाणी साठवून ठेवले. पिण्यासाठी विकतचे जार मागवण्याची वेळ नागरिकांवर आली. चिपळूण शहराची एकूण पाण्याची मागणी सुमारे दहा लाख लिटर आहे. पालिका शहरातील नागरिकांना दोनवेळा पाणी पुरवते. दिवाळीच्या दिवशी पाण्याचा खप जास्त असणार, हे माहिती असून सुद्धा पाणीपुरवठ्याकडे लक्ष दिले गेले नाही. विशेष म्हणजे पालिकेतील प्रमुख अधिकारी दिवाळीचा सण साजरा करण्यासाठी गावी गेले होते. अशा स्थितीत पाण्याची ओरड झाल्यानंतर काहींना परत चिपळूणला यावे लागले.
---
कोट
शहराच्या पाणीपुरवठ्यामध्ये सुधारणा करण्यासाठी अनेक उपक्रम सुरू आहेत, ज्यामध्ये पाईप नेटवर्क विस्तारणे आणि दुरुस्तीची कामे यांचा समावेश आहे. शहराला पाणीपुरवठ्यासाठी वाशिष्टी नदीच्या जलस्रोतांवर अवलंबून राहावे लागते. पाणीपुरवठ्याच्या समस्यांवर मात करण्यासाठी जलवाहिन्यांची दुरुस्ती करणे आवश्यक आहे. ज्या भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होतो त्या भागातील गळती शोधून पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे काम सुरू आहे.
- रोहित खाडे, पाणीपुरवठा अधिकारी, चिपळूण पालिका
--
चौकट
पालकमंत्र्यांकडून कार्यवाही
चिपळूण शहराला कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याची तक्रार समोर आल्यानंतर माजी नगरसेवक उमेश सकपाळ यांनी पालकमंत्री उदय सामंत यांच्या कानावर ही गोष्ट घातली. पालकमंत्री सामंत यांनी कोयना प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवर चर्चा केली आणि तत्काळ वीजनिर्मिती सुरू करण्याचे आदेश दिले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.