Islampur New Name : इस्लामपूरचे नामकरण ईश्वरपूर करण्याची प्रदीर्घ काळापासून सुरू असलेली मागणी आज पूर्ण झाली असून, यासाठीच्या प्रस्तावाला केंद्र शासनाने अंतिम मंजुरी दिली आहे. केंद्राच्या अध्यादेशमुळे यापुढे सर्व शासकीय कार्यालये, दस्तऐवज, पोस्ट खाते आणि रेल्वेच्या नोंदीमध्येही शहराचा उल्लेख ईश्वरपूर असा होणार आहे. या निर्णयामुळे सर्व हिंदुत्ववादी संघटनांसह शहरवासीयांमधे उत्साहचे वातावरण आहे.
राज्य शासनाने १८ जुलै २०२५ रोजी इस्लामपूर शहराचे ‘ईश्वरपूर’ असे नामांतरण करण्याच्या नगरपालिकेच्या प्रस्तावास विधिमंडळात मंजुरी दिली होती. तो प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी केंद्र शासनाकडे पाठवला होता. १४ ऑक्टोबर २०२५ रोजी केंद्र शासनाच्या भारतीय सर्वेक्षण विभागाने ‘ईश्वरपूर’ या नामांतरणास मंजुरी देत तसा शासकीय अध्यादेश काढला आहे. याबरोबरच, भारतीय डाक विभाग आणि भारतीय रेल्वे खात्यालाही त्यांच्या दप्तरी शहराचे नाव बदलण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. केंद्र सरकारने यावर शिक्कामोर्तब केल्यामुळे नामांतराची प्रक्रिया अधिकृतपणे पूर्ण झाली आहे. लवकरच राज्य शासनाच्या नगरविकास विभागाकडून अंमलबजावणी करण्यात येईल.
इस्लामपूरचे ईश्वरपूर असे नामकरण व्हावे, अशी मागणी सर्व प्रथम १९७३ साली तत्कालीन नगरसेवक पंत सबनीस यांनी सर्व प्रथम केली होती. त्यावेळी त्यांनी शहरात ईश्वरपूर नावाचे फलक लावले होते. त्यानंतर १९८६ साली शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी येथील यल्लामा चौकातील जाहीर सभेत आजपासून या शहराला कोणी इस्लामपूर म्हणायचे नाही. मी त्याचे ईश्वरपूर हे नाव जाहीर करतो, अशी घोषणा केली होती.
यानंतरच्या काळात अनेक संघटनांनी राजकीय पक्षांनी याबाबत लढा दिला, मोर्चे काढले. याला आज यश आले आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी केलेल्या ईश्वरपूर नामांतराच्या घोषणेपासून शिवसेना व हिंदू संघटनांनी इस्लामपूर शहाराचे नाव ईश्वरपूर करा, अशी मागणी केली होती. या मागणीसाठी संघटनांनी शहरात मोर्चे, आंदोलने केला. त्याबाबतची निवेदने तहसीलदारांपासून मंत्रालयापर्यंत अनेक वेळा दिली होते. त्याचा पाठपुरावा सुरू होता. २०१४ साली इस्लामपूरचे ईश्वरपूर नामकरण समितीही स्थापन करण्यात आली.
राज्यात शिवसेना-भाजपचे सरकार स्थापन झाल्यावर या मागणीने परत एकदा उचल खाल्ली. डिसेंबर २०२१ ला शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आनंदराव पवार यांनी शहरात मोर्चा काढत ‘इस्लामपूरचे ईश्वरपूर करा’, अशी मागणी केली. याबरोबरच त्यांनी सह्यांची मोहीमही राबविली. याला शहारातून जोरदार पाठिंबा मिळाला. तत्कालीन नागराध्यक्ष निशिकांत पाटील यांनी १६ डिसेंबर रोजी नगरपालिकेची विशेष सभा बोलावली होती. यावेळी आनंदराव पवार यांनी ३३ हजार सह्यांचे निवेदन भगव्या कापडात गुंडाळून जोरदार शक्तिप्रदर्शन करत घोषणाबाजी करत पालिकेवर धडक मारली.
मात्र, अनेक नगरसेवकांनी याला दांडी मारल्याने यात कोणतीही कार्यवाही झाली नाही. तरीही शिवसेना भाजपा, शिव प्रतिष्ठान, रयत क्रांती संघटनायांच्या नामांतरासाठी निवेदन व शासकीय दरबारी हेलपाटे सुरूच होते. त्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी इस्लामपूर येथे झालेल्या जाहीर सभेत राज्य शासनाच्या वतीने दोन महिन्यांपूर्वी नगर पालिकेकडे याबाबतचा प्रस्ताव मागितला होता. तो प्रस्ताव नगरपालिकेने दिला.
Islampur Crime: इस्लामपूरमध्ये हाणामारी; चौघे जखमी, दांडिया खेळताना माईकवर नाव न घेतल्याचा रागआमदार सदाभाऊ खोत यांनीही विधिमंडळाच्या सभागृहात इस्लामपूरचे ईश्वरपूर नामकरण करा, अशी मागणी केली. त्याला सभागृहाने मान्यता दिली. मान्यतेचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठवत असल्याची घोषणा मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली होती.
दरम्यान, ईश्वरपूरच्या मागणीला आज मूर्त स्वरूप मिळाले. भाजपचे जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक यांनी आज प्रसिद्धी पत्रकाद्वारे सरकारचे आभार मानले; तर आमदार सदाभाऊ खोत यांनी गोपीचंद पडळकर यांच्यासमवेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांचे पुष्पगुच्छ देऊन आभार मानले.