Jaykumar Gore : '...तर पंतप्रधान मोदींसोबत चहा पिण्याची संधी मिळणार'; मंत्री जयकुमार गोरेंनी सांगितलं 'हे' खास कारण
esakal October 25, 2025 10:45 PM

दहिवडी : भारताच्या इतिहासात आजपर्यंत ग्रामपंचायतीला कधीही दिलं नव्हतं तेवढं म्हणजे पाच कोटी रुपयांचे बक्षीस मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानातील (CM Samruddha Panchayatraj Abhiyan) विजेत्या ग्रामपंचायतीला मिळणार आहे. महत्त्वाचे म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्यासोबत चहा पिण्याची संधी मिळणार आहे. या अभियानात पहिल्या क्रमांकाचं गाव म्हणून आंधळीचं नाव पुकारल्यावर मला जास्त आनंद होईल, असे प्रतिपादन ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांनी केले.

आंधळी (ता. माण) येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत ग्रामस्थांशी संवाद साधताना ते बोलत होते. या वेळी माजी जिल्हा परिषद सदस्य अर्जुन काळे व डी. एस. काळे, आंधळीचे सरपंच दादासाहेब काळे, संतोष काळे, सदस्य, अधिकारी, कर्मचारी यांच्यासह मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.

'महागठबंधन'मध्ये मुकेश साहनींना उपमुख्यमंत्रीपद देण्यामागं नेमकं कारण काय? काँग्रेससारख्या मोठ्या पक्षाला वगळून साहनींवर का विश्वास ठेवला?

गोरे म्हणाले, ‘‘शासनाच्या सर्व योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी, यासाठी हे अभियान सुरू केले आहे. अभियानाला सुरुवात झाली अन् दुर्दैवाने मोठं संकट महाराष्ट्रावर आलं. अतिवृष्टीने मोठे नुकसान झाले. त्यामुळे अभियान रखडले. आता पुन्हा नव्याने अभियान वेग घेईल. त्यातही आता निवडणुका येत आहेत. मात्र हे अभियान थांबणार नाही.’’ सर्व दाखले गावातच उपलब्ध होईल, अशी व्यवस्था लवकरच करतोय.

गावातील शाळा सक्षम व सुसज्ज असल्या पाहिजेत. आपलं घर, शाळा, मंदिर पर्यायाने आपलं गाव स्वच्छ असलं पाहिजे. गावातील विविध विभागांच्या सर्व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी ठरवलं, तरी गाव समृद्ध होऊ शकते. प्रत्येकाने गावाच्या विकासात योगदान द्या. मी स्वतः इथं श्रमदानासाठी येणार आहे. जे गाव या अभियानात चांगलं काम करेल त्या गावाला परत जास्त काम करावं लागणार नाही, असेही श्री. गोरे यांनी सांगितले.

अभियानाची मुदत वाढणार महाराष्ट्रावर आलेले अतिवृष्टीचे संकट व सर्व परिस्थिती पाहता मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाची मुदत ४५ दिवस वाढवली जाऊ शकते, अशी शक्यता मंत्री श्री. गोरे यांनी व्यक्त केली.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.