14 अब्ज डॉलर्सचा 'क्रिप्टो स्कॅम', पडद्यामागचा 'मास्टरमाइंड' नेमका कोण?
BBC Marathi October 25, 2025 10:45 PM
Prince Group/Getty images कंबोडियाचा गूढ उद्योगपती चेन झीवर तब्बल 14 अब्ज डॉलर्सच्या क्रिप्टो आणि ऑनलाइन फसवणुकीच्या घोटाळ्याचा आरोप आहे.

कंबोडियाचा गूढ उद्योगपती चेन झी याच्यावर तब्बल 14 अब्ज डॉलर्सच्या क्रिप्टो आणि ऑनलाइन फसवणुकीच्या घोटाळ्याचा आरोप आहे.

अमेरिका आणि ब्रिटनने त्याच्यासह प्रिन्स ग्रुपशी संबंधित कंपन्या आणि लोकांवर कडक निर्बंध घातले आहेत.

कंबोडियात प्रॉपर्टी, कॅसिनो, एअरलाइन आणि बँकिंगसह अनेक व्यवसाय विस्तारणारा हा उद्योगपती आता अचानक गायब झाला आहे.

जगभराच्या तपास यंत्रणा आणि सरकारांचं लक्ष त्याच्यावर केंद्रित झालं आहे.

अवघ्या 37 वर्षांच्या चेन झीवर मोठ्या सायबर फसवणुकीच्या साम्राज्याचा सूत्रधार असल्याचा आरोप आहे. या गुन्ह्यामुळे अनेक लोक अडचणीत आले आहेत.

हनुवटीवर छोटीशी दाढी आणि लहान मुलांसारखा चेहरा असलेला चेन झी आपल्या वयापेक्षा खूपच लहान दिसतो. तो खूप लवकर प्रचंड श्रीमंत झालेला व्यक्ती आहे.

मागील आठवड्यात अमेरिकेच्या न्याय विभागाने चेन झीवर कंबोडियामध्ये फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. या फसवणुकीत जगभरातील लोकांची अब्जावधी डॉलरची क्रिप्टोकरन्सी लुटली गेली.

अमेरिकेच्या अर्थ मंत्रालयाने सुमारे 14 अब्ज डॉलर किमतीचे बिटकॉइन जप्त केले आहेत.

हे बिटकॉइन चेन झीशी संबंधित असल्याचा अमेरिकेचा दावा आहे. या विभागाने ही आतापर्यंतची सर्वात मोठी क्रिप्टोकरन्सी जप्ती असल्याचं म्हटलं आहे.

चेन झीची कंपनी 'कंबोडियन प्रिन्स ग्रुप' आपल्या वेबसाइटवर त्याचं वर्णन 'आदरणीय उद्योजक' म्हणून करते.

वेबसाइटनुसार, 'चेन हा एक असा उद्योजक आहे, ज्यानं 'प्रिन्स ग्रुप'ला कंबोडियातील एक आघाडीचा व्यावसायिक समूह म्हणून उभा केलं आहे.'

बीबीसीनं प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी प्रिन्स ग्रुपशी संपर्क साधला आहे.

प्रश्न असा आहे की, या घोटाळ्यामागचा रहस्यमयी व्यक्ती चेन झीबद्दल किती माहिती आहे?

अचानक उंच भरारी

दक्षिण-पूर्व (आग्नेय) चीनच्या फुजियान प्रांतात जन्म झालेल्या चेनने सर्वात आधी एक इंटरनेट गेमिंग कंपनी सुरू केली. 2010 किंवा 2011च्या अखेरीस तो कंबोडियात गेला आणि तिथे त्याने प्रॉपर्टीच्या व्यवसायात प्रवेश केला.

जेव्हा तो कंबोडियात आला, तेव्हा तेथील प्रॉपर्टी बाजारात तेजीचा काळ सुरू होता. शक्तिशाली आणि राजकीय प्रभावशाली लोक आणि चिनी भांडवलदारांनी त्याला आणखी प्रोत्साहन दिलं.

यातील काही भांडवल शी जिनपिंग यांच्या 'बेल्ट अँड रोड इनिशिएटिव'च्या शेवटच्या टप्प्यात तयार होणाऱ्या पायाभूत सुविधांच्या निर्यातीसाठी येत होते.

आणि काही पैसे चिनी गुंतवणूकदार आणत होते. कारण चीनमधील प्रॉपर्टी बाजारातील वाढत्या किमतींमुळे ते स्वस्त पर्याय शोधत होते. कंबोडियात येणाऱ्या चिनी पर्यटकांची संख्यासुद्धा झपाट्याने वाढत होती.

राजधानी नोम पेन्ह झपाट्याने बदलत होती. पिवळसर रंगाच्या फ्रेंच वसाहतींच्या वाड्यांच्या जागा काचेच्या आणि स्टीलच्या टॉवर्सनी घेतली होती.

एकेकाळी शांत समुद्रकिनारी रिसॉर्ट असलेलं सिहानोकविल पूर्णपणे बदलत होतं. तिथे फक्त चिनी पर्यटक आणि प्रॉपर्टी डीलरच नाही, तर जुगार खेळणारे लोकही येत होते.

नवीन कॅसिनो उघडले गेले, तसेच आलिशान हॉटेल्स आणि अपार्टमेंट्सही तयार झाले. इथे भरपूर पैसे कमावण्याची संधी निर्माण झाली होती.

एवढं सगळं असूनही, चेनची झेप आश्चर्यकारक होती.

Getty Images कंबोडियातील प्रिन्स इंटरनॅशनल प्लाझा

2014 मध्ये त्याने आपलं चिनी नागरिकत्व सोडून कंबोडियाचं नागरिकत्व घेतलं. यामुळे त्याला स्वतःच्या नावावर जमीन खरेदी करण्याची परवानगी मिळाली. पण त्यासाठी किमान 2.5 लाख डॉलर्सची गुंतवणूक किंवा सरकारला देणगी देणं गरजेचं होतं.

चेन झीकडे एवढा पैसा कुठून आला हे अजूनही स्पष्ट झालेलं नाही.

2019 मध्ये आयल ऑफ मॅनमध्ये बँक खातं उघडण्यासाठी अर्ज करताना, त्यानं आपल्या एक काकाच्या नावाचा उल्लेख केला होता. त्या काकाने त्याला 2011 मध्ये त्याला पहिली प्रॉपर्टी कंपनी सुरू करण्यासाठी 20 लाख डॉलर दिले होते.

परंतु, चेनने याचे कोणतेही पुरावे दिले नव्हते.

चेन झीने 2015 मध्ये प्रिन्स ग्रुपची स्थापना केली होती. त्यावेळी तो केवळ 27 वर्षांचा होता.

त्याने 2018 मध्ये प्रिन्स बँक सुरू करण्यासाठी व्यावसायिक बँकिंग परवाना मिळवला.

त्याच वर्षी त्याने सायप्रसचा पासपोर्ट घेतला. त्याबदल्यात त्याने किमान 25 लाख डॉलरची गुंतवणूक केली.

आता त्याला युरोपियन युनियनमध्ये सहज प्रवेश मिळाला. नंतर त्याने वानुआतूचे नागरिकत्वही घेतले.

त्याने कंबोडियाची तिसरी एअरलाइन (विमानसेवा) सुरू केली आणि 2020 मध्ये चौथी एअरलाइन चालवण्याचा परवाना मिळवला.

त्याच्या कंपनीने नोम पेन्हमध्ये आलिशान मॉल तयार केले. त्याचबरोबर सिहानोकविलमध्ये पंचतारांकित हॉटेल उभारले.

तिथे त्याने 'बे ऑफ लाइट्स' नावाची 16 अब्ज डॉलर्सची 'इको-सिटी' उभारण्याच्या महत्वाकांक्षी योजनेवरही काम सुरू केलं.

Getty Images प्रॉपर्टी मार्केटमधील तेजीमुळे सिहानोकविल सारख्या भागांचं स्वरूपच बदललं आहे.

2020 मध्ये चेन झीला कंबोडियाच्या राजा कडून सर्वोच्च सन्मान, 'नेक ओकन्हा' देण्यात आला.

या सन्मान मिळवण्यासाठी सरकारला किमान पाच लाख डॉलर देणगी देणं आवश्यक असतं.

2017 पासूनच त्याला कंबोडियाचे गृहमंत्री सर खेंग यांचे अधिकृत सल्लागार म्हणून नेमण्यात आलं होतं.

चेन झी, सर सोखा यांचा व्यावसायिक भागीदार होता आणि कंबोडियाचे सर्वात प्रभावशाली नेते हुन सेन यांचा अधिकृत सल्लागार सुद्धा होता.

नंतर हुन सेन यांचा मुलगा हुन मानेट देशाचा पंतप्रधान झाला. चेन झी त्यांचाही सल्लागार झाला.

स्थानिक माध्यमांनी चेन झीची प्रशंसा केली. तो एक परोपकारी व्यक्ती म्हणून ओळखला जाऊ लागला.

त्याने कमी उत्पन्न असलेल्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती दिली, कंबोडियाला कोविड महामारीशी लढण्यास मदत करण्यासाठी भरपूर देणगी दिली.

तरीही तो नेहमीच चर्चेपासून दूर राहणारा आणि फार कमी सार्वजनिक वक्तव्यं करणारा रहस्यमय व्यक्ती म्हणून राहिला.

जॅक ॲडमोविच डेव्हिस हे पत्रकार आहेत. त्यांनी तीन वर्षे चेन झीबद्दल संशोधन केलं आहे. मागील वर्षी त्यांचा अहवाल रेडिओ फ्री आशियात प्रसिद्ध झाला आहे.

जॅक ॲडमोविच सांगतात, "मी अशा व्यक्तींशी बोललो, ज्यांनी त्याच्यासोबत थेट काम केलं किंवा त्याच्यासोबत एकाच खोलीत राहिले. त्यांनी त्याचं खूप नम्र, शांत आणि संतुलित व्यक्ती म्हणून वर्णन केलं आहे."

"मला वाटतं की त्याला वर्तमानपत्रात बातम्या येतात अशा प्रकारचा दिखाऊ माणूस व्हायचं नव्हतं. हे त्याचं शहाणपण होतं. ज्यांना पूर्वी त्याच्याशी संबंध ठेवायची इच्छा नव्हती, तेही त्याच्यामुळे प्रभावित झाले होते."

पण एवढा पैसा आणि ताकद आली कुठून?

आंतरराष्ट्रीय गुन्ह्यांची यादी

2019 मध्ये सिहानोकविलमध्ये प्रॉपर्टी मार्केटचा फुगा फुटला.

ऑनलाइन जुगार व्यवसायामुळे चिनी गुन्हेगारी टोळ्यांना आकर्षित केलं, ज्यांचा नंतर एकमेकांशी हिंसक संघर्ष सुरू झाला. त्यामुळे पर्यटक सुद्धा घाबरले होते.

चीनच्या दबावाखाली, त्याच वर्षी ऑगस्टमध्ये तत्कालीन पंतप्रधान हुन सेन यांनी ऑनलाइन जुगारावर बंदी घातली होती.

मुख्य व्यवसाय ठप्प झाल्यामुळे जवळपास साडेचार लाख चिनी लोकांनी शहर सोडलं. प्रिन्स ग्रुपचे अनेक फ्लॅट्स रिकामे झाले.

तरीही चेन झीने आपले व्यावसायिक हित वाढवणं आणि मोठ्या प्रमाणावर खर्च करणं सुरू ठेवलं.

ब्रिटिश अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 2019 मध्ये त्याने उत्तर लंडनमध्ये 1.2 कोटी पाउंडचा एक मोठा बंगला आणि 9.5 कोटी पाउंडची ऑफिस इमारत खरेदी केली.

अमेरिकेचा दावा आहे की, त्याने आणि त्याच्या सहकाऱ्यांनी न्यूयॉर्कमध्ये मालमत्ता, खासगी जेट आणि सुपरयॉट, तसेच पिकासोचं एक पेंटिंग देखील खरेदी केलं.

AFP via Getty Images इतर व्यवसायांव्यतिरिक्त चेन झी एक बँक देखील चालवत होता.

चेनकडे हे पैसे ऑनलाइन फसवणूक, मानवी तस्करी आणि मनी लाँड्रिंगमधून आले असल्याचा अमेरिकेचा आरोप आहे.

अमेरिका आणि ब्रिटनने चेन झी आणि प्रिन्स ग्रुपशी संबंधित 128 कंपन्यांवर आणि सात वेगवेगळ्या देशातील 17 लोकांवर बंदी घालली आहे. त्यांच्यावर चेन झीच्या घोटाळ्याचे साम्राज्य चालवण्यात मदत केल्याचा आरोप आहे.

आता अमेरिका आणि ब्रिटनमध्ये चेन झीशी संबंधित मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत.

बंदीच्या घोषणेत बनावट कंपन्या आणि क्रिप्टोकरन्सी वॉलेट्सच्या मोठ्या जाळ्याची माहिती दिली गेली आहे.

यात पैसे त्यांचे मूळ स्रोत लपवण्यासाठी इतर ठिकाणी हस्तांतरित करण्यात आले होते.

बंदीच्या आदेशात म्हटलं आहे की, "प्रिन्स ग्रुपच्या आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी संघटनेला विविध आंतरराष्ट्रीय गुन्ह्यांमधून नफा मिळतो. यामध्ये सेक्सटॉर्शन, मनी लाँड्रिंग, फसवणूक आणि बेकायदेशीर ऑनलाइन जुगार यांचा समावेश आहे.

तसेच हा गट कंबोडियात किमान 10 घोटाळ्यांच्या अड्ड्यांचे काम करण्यासाठी जबरदस्तीने काम करणाऱ्या मजुरांची (गुलाम) औद्योगिक पातळीवर तस्करी, छळ आणि जबरदस्तीने पैसे घेणे यामध्येही सामील आहे."

'घोटाळ्यांचे साम्राज्य'

चीनसुद्धा 2020 पासून प्रिन्स ग्रुपची चौकशी करत होता. कंपनीवर ऑनलाइन फसवणुकीच्या योजना चालवण्याचा आरोप करून अनेक खटले दाखल करण्यात आले आहेत.

बीजिंग म्युनिसिपल पब्लिक सिक्युरिटी ब्युरोने कंबोडियात असलेल्या आंतरराष्ट्रीय ऑनलाइन जुगार सिंडिकेट प्रिन्स ग्रुपची तपासणी करण्यासाठी एक टास्क फोर्स तयार केला आहे.

अमेरिका आणि ब्रिटनचा आरोप आहे की, या व्यवसायाच्या केंद्रस्थानी 'गोल्डन फॉर्च्यून सायन्स अँड टेक्नोलॉजी पार्क' सारखे व्यवसाय होते, जो प्रिन्स ग्रुपने व्हिएतनामच्या सीमेजवळ क्रे थॉममध्ये तयार केलेला एक परिसर आहे.

यापूर्वी प्रिन्स ग्रुपने या घोटाळ्यांमध्ये कोणत्याही प्रकारचा सहभाग नाकारला होता. त्याचबरोबर त्यांचा आता गोल्डन फॉर्च्यूनशी काहीही संबंध नसल्याचेही सांगितले होते.

पण अमेरिका आणि ब्रिटनच्या तपासकर्त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांच्यात अजूनही स्पष्ट व्यावसायिक संबंध आहेत.

पत्रकार अॅडमोविच डेव्हिस यांनी चेन झी प्रकरणाची तपासणी करण्यासाठी गोल्डन फॉर्च्यूनच्या आसपास राहणाऱ्या आणि काम करणाऱ्या अनेक लोकांची मुलाखत घेतली आहे.

त्यांनी सांगितलं की, या परिसरातून पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या चिनी, व्हिएतनामी आणि मलेशियन लोकांना बेदम मारहाण करण्यात आली. या लोकांना ऑनलाइन फसवणूक करण्यास जबरदस्तीने भाग पाडलं गेलं.

ॲडमोविच डेव्हिस सांगतात, "मला वाटतं चेन झी फार मोठा व्यवसाय चालवतो. त्याने सिंगापूर, लंडन किंवा अमेरिकेत या मालमत्ता घ्यायला नको होत्या. वकील, बँकर्स, रिअल इस्टेट एजंट सर्वांनी पाहून म्हणायला हवं होतं- थांबा, हे बरोबर नाही. पण त्याला कुणीही थांबवलं नाही."

आता, अमेरिका आणि ब्रिटनच्या बंदीमुळे, सर्वजण प्रिन्स ग्रुपपासून स्वतःला वेगळं करण्यात गुंतले आहेत.

लोक प्रिन्स बँकेतून आपले पैसे काढू शकतील, असं कंबोडियाच्या सेंट्रल बँकेने घोषणा केली आहे.

US District Court EDNY चेन झी फोनच्या माध्यमातूनच फसवणुकीचे जाळे पसरवत होता.

दक्षिण कोरियाच्या अधिकाऱ्यांनी कोरियन बँकांमध्ये जमा 64 दशलक्ष डॉलर जप्त केले आहेत.

सिंगापूर आणि थायलंड त्यांच्या अधिकार क्षेत्रातील प्रिन्सच्या सहाय्यक कंपन्यांची चौकशी करण्याचे आश्वासन देत आहेत. अमेरिका आणि ब्रिटनच्या देखरेखीखाली असलेल्या 18 लोकांपैकी तिघे सिंगापूरचे आहेत.

कंबोडियाने अमेरिका आणि ब्रिटनच्या अधिकाऱ्यांना त्यांच्याकडे आपले आरोप सिद्ध करण्यासाठी पुरेसे पुरावे असल्याची खात्री करण्यास सांगितले आहे.

पण इतकी वर्षे चेन झीबरोबर राहिल्यानंतर, कंबोडियाच्या सत्ताधारी वर्गासाठी त्याच्यापासून अंतर ठेवणं कठीण होईल.

आधीच कंबोडिया घोटाळेबाज व्यवसायांवर कडक कारवाई करत नसल्याच्या कारणामुळे वाढत्या दबावाचा सामना करत होता.

आता चेन झी कुठं आहे?

गेल्या आठवड्यात बंदी जाहीर झाल्यानंतर त्याच्याबद्दल काहीही ऐकलं किंवा पाहिलं गेलेलं नाही. एकेकाळी कंबोडियाच्या सर्वात प्रभावशाली लोकांपैकी एक असलेला हा रहस्यमय उद्योगपती आता गायब झाला आहे.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.

  • शेअर मार्केट गुंतवणुकीचा 'स्मार्ट स्कॅम'; 160 जणांची फसवणूक, एका संशयाने घोटाळा उघडकीस
  • PNB स्कॅम : कसा झाला 11,360 कोटींचा घोटाळा?
  • बार्शीतला शेअर मार्केट स्कॅम आहे तरी काय?
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.